‘नदी’: प्रत्येक महिलेची ‘सखी’

जागतिक महिला दिन… आज समस्त महिलावर्ग आनंदात आहे कारण आजचा दिवस हा विशेषतः महिलांचा दिवस आहे जिकडे पहावे तिकडे महिलांचे कोडकौतुक होताना दिसत आहे. त्यातही समाजासाठी किंवा वैयक्तिक जीवनात ज्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला त्या महिला आज ठिकठिकाणी उत्सवमूर्ति म्हणून वावरतांना दिसतील आणि ते नैसर्गिकच आहे.त्याचबरोबर काही अशा कर्तृत्ववान महिला ज्या आज हयात नाहीत त्यांचेही आज स्मरण करुन त्यांच्या कर्तृत्वाला नमस्कार केला जाईल.मला मात्र आज एक वेगळीच महान ‘महिला’ आकर्षित करते आहे जी अनादिकालापासून ते आजतागायत अस्तित्वात आहे मात्र भविष्यात तिचे अस्तित्व आबाधित राहणार आहे की नाही हे वर्तमानातील महिला ठरवणार आहे असे मला वाटते.

कोण बरं हि महिला?जी प्रत्येक महिलेची ‘सखी’ आहे!आता आपली उत्सुकता अधिक न ताणता मीच सांगते ती महान महिला म्हणजे आपआपल्या परिसरातील “नदी”!
मी गोदेकाठी राहते म्हणून माझ्यासमोर ‘गोदामाई’येते तरीपण प्रत्येक नदी ही तितकीच श्रेष्ठ आहे आणि कुठल्याही स्त्रीला ती जिव्हाळ्याची आहे हे माझेच काय कुठल्याही भावना आणि बुद्धीप्रधान माणसाचे मत असायला हरकत नसावी.

या नदीला ‘माता’ मानणाऱ्या संस्कृतीत आपला जन्म झाला आणि माता म्हटल्यावर तीला आपण स्त्रीत्व बहाल केलयं हे तर आलेच!म्हणून आजच्या महिला दिनी नदीसोबत स्त्री कशी जोडलेली आहे हे पाहूया,. माझे आजोळ तीन नद्यांच्या संगमस्थळी वसलेले गाव आहे १)नांदणी२)चांदणी३)वटफळी ही त्या नद्यांची नावे!अहमदनगर सारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या जिल्ह्यातील नदीसौंदर्याने नटलेले हे गाव!या गावात मी स्त्री ,पुरुष आणि मुले कशी वेगवेगळ्या भावाने नदीशी जोडलेली असतात हे पाहिले. पुरुष उपयुक्ततेने तसेच नदीकाठी मिळणाऱ्या शांततेने प्रभावित होतात. मुले मनसोक्त पाण्यात खेळायला मिळते,लहानश्या मासळींचे बागडणे पहायला गम्मत वाटते म्हणून नदीप्रेमात पडतात तर स्त्रिया मात्र भावनिक नात्याने नदीशी जोडलेल्या मी पाहिल्यात!

७१ते८०चे दशक!स्त्रिया नदीवर पाणी भरायला,धुणी धुवायला तर जातच असत पण त्याबरोबरच रोजच्या कष्टमय आणि त्याच त्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारख्या जीवनातून घटकाभराचा विरंगुळा म्हणून नदीकाठी जाण्याची ओढ प्रत्येक स्त्री ला असायची.त्यातही नदीवर आपल्या मैत्रीणी भेटल्या तर धुण्याबरोबर सासूरवासाचे दुःखही धुतले जायचे!नदीच्या स्वच्छ चमकदार वाळूतच धुणं सुकवण्याचा महिलांचा कल असायचा आणि ते सुकेपर्यंत धुणं धुतलेल्या दगडावर बसून एका खरखरीत दगडाने हातपाय घासण्याचा कार्यक्रम व्हायचा!नदीवर येतांना मणभर दुःखाचे ओझे घेऊन आलेली महिला नदीवरुन जातांना हजार हत्तीचे बळ घेऊन जायची!असे हे वाहते पाणी मनावरील मळभ घेऊन जाते आणि प्रसन्न ऊर्जा देवून जाते! या नद्यांमध्ये ठिकठिकाणी अप्सरांची स्थाने दाखवतात.अप्सरांना बोली भाषेत ‘आसरा’म्हणतात. या आसरामाता नद्यातील खडकांवर असतात.आसरा म्हणजे ‘जलदेवता’!असे म्हणतात की या अप्सरांना स्वर्गलोकी शाप मिळाल्याने त्या पृथ्वीवर आल्यात. मग त्या स्वर्गीय अप्सरा कुठे राहणार?तर पवित्र अशा नदीत किंवा जेथे पाण्याचे जीवंत झरे आहेत अशा विहीरी अथवा कुंडामध्ये!’आप’म्हणजे पाणी आणि ‘सर’ म्हणजेही पाणी!पण येथे पाण्यात वास्तव्य असलेल्या त्या ‘अप्सरा’!अर्थात ‘आसरा’!या देवतेशी स्त्रीचा विशेष संबंध दिसतो.प्रत्येक शुभप्रसंगी आसरांचे पूजन करून ,त्यांना नैवेद्य व ओटी अर्पण केली जाते..नदीमधील या स्थानाचा उल्लेख काही स्त्रिया ‘माहेर’असा करतात.त्या नदीवर आसरांच्या दर्शनाला जातांना ‘माहेरी चालले’असे म्हणतात!एखादी स्त्री आजारपण अथवा काही कारणाने नदीवर जावू शकत नसेल तर ती घरातूनच नदीच्या दिशेने हात जोडते आणि आपला नमस्कार आसरामाईला पोहचला असा ठाम विश्वास बाळगते..या जलदेवता नदीरक्षणासाठी आणि नदीवर प्रेम करणाऱ्याच्या रक्षणासाठी कटीबध्द असल्याची श्रध्दा अबालवृध्द बाळगतात!

राजस्थानी समाजातील एक प्रथा फार विचार करायला लावणारी आहे..या प्रथेनुसार बाळांतिण स्त्री ला चाळीस दिवस बाहेर जावू देत नाहीत(वैद्यकीय गरजेनुसार बाळ-बाळाची आई बाहेर पडतात तो भाग वेगळा)चाळीसाव्या दिवशी बाळाचे बारसे होते त्या विधीला ‘जळवापूजन’ म्हणतात..काय असतो हा विधी?तर सर्व स्त्रिया बाळांतिणीला सजवून मिरवत मिरवत,अगदी ताशा वगैरे वाजवत नदीवर अथवा पाण्याचे जिवंत झरे असलेल्या विहीरीवर नेतात.तिथे ती ‘जलपूजन’ करते आणि नदी अथवा विहीरीतील जिवंत झऱ्याला विनंती करते की “जसे तुम्ही अखंड वाहता आणि आमची तृष्णा भागवता तसेच माझ्या बाळासाठी माझे दूध वाहते राहू द्या आणि बाळाचे पोषण होऊ द्या!”त्यानंतर तिच्या दूधाचे काही थेंब वाहत्या नदीला अर्पण केले जातात आणि जलकलश भरुन घरी आणला जातो..या चाळीस दिवसात बाळांतिणीने कुणालाही नमस्कार करायचा नसतो..पहिला नमस्कार जलदेवतेला करून मगच इतर देवतांना तसेच घरातील जेष्ठांना करायचा असतो!असे का?असा प्रश्न मी राजस्थानी रितीरिवाजाच्या अभ्यासिका श्रीमती कमलाबाई जोशी यांना विचारला तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे होते. त्या म्हणाल्या “मातेच्या गर्भात बाळ हे पाण्यातच असते..पाणी कमी झाले तर बाळाला धोका असतो.आपला नारायण आपण पाण्यातच दाखवतो ना?हा मातेच्या गर्भात पाण्यात राहणारा नारायणच असतो.एरवी नाकातोंडात पाणी गेले तर आपण गुदमरतो पण तेच पाणी आईच्या कुशीत जीवन देणारे ठरते..गर्भाशयात जलदेवतेने जीवाला सांभाळले म्हणून पहिला नमस्कार जलदेवतेला!”किती समर्पक उत्तर आहे हे!आहे ना आपली संस्कृती महान!

अशी स्त्री भाव आणि बुद्धी दोन्हीनी नदीबरोबर जोडलेली आहे.माझ्या लहानपणी मी पाहीले आहे स्त्रिया गंगेवर आंघोळ करतांना साबण वापरत नसत!का?तर आपणास शुद्ध करण्यास एकटी गंगामाई भक्कम आहे त्यामुळे वेगळ्या अवडंबराची गरज नाही.आजही पावसाळ्यात पहिले पाणी येते तेव्हा स्त्रिया नदीची ओटी भरतात आणि तिचे स्वागत करतात.त्रिपूरीपौर्णिमेला दिपदान करुन नदीमातांना नमस्कार करतात.. नदीने स्त्रीला सर्व प्रकारची सुबत्ता,सौख्य,मांगल्य सर्वकाही दिले..पण आजची स्त्री तिला जे काही देते ते पुरेसे आहे का?अहं…आज या प्रश्नाकडे वळायला नको…येत्या चौदा तारखेला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस ‘येतोय ना तेव्हा पुन्हा या प्रश्नाचे उत्तर शोधायला भेटूच! तोपर्यंत महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !

-मधुमालती जोशी

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

1 thought on “‘नदी’: प्रत्येक महिलेची ‘सखी’

  1. Aprteem lekh.javala poojan cha arth aaj kalala.Aani lekhika kiti sadhya aani sopya paddhatine Nadi varache prem krutadnayata aani of course dnyan poavtahet.tyanchya ya karyala mazya manpurvak shubhecchha.keep it up Madhumalati Joshiji.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.