संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या नवव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आज दासगणु महाराज पंचवटीची कथा सांगतायेत! आपण मागेच पाहिले की, पुराणातील कथा रुपकात्मक असतात. ती रुपके हळुवारपणे उलगडली तर खुप काही सांगतात. आता येथे महान कर्मयोगी सुर्याची कथा येते. सुर्याचे प्रखर तेज सहन होत नाही म्हणून सुर्यपत्नी उषा स्वतःच्या पित्याकडे म्हणजेच ब्रह्मदेवांकडे निघून जाते. जाताना ती स्वतःची सावली बनून राहणाऱ्या स्वतःच्या सखीला म्हणजेच छायाला उषा बनवून जाते. पण ब्रह्मदेवांना उषेचे हे कृत्य आवडत नाही व ते तिची निर्भत्सना करतात. उषेला पित्याचा खुप राग येतो. तिला वाटते वडिलांनी आपल्याला समजून घ्यायला हवे होते. पती असा कठोर शिस्तीचा अन् ध्येयवेडा आणि पित्यालाही त्याचेच कौतुक! तिला तिचे मन अश्वासारखे चौखूर उधळू द्यायचे होते. शिस्तबद्ध दिनचर्येला कंटाळलेल्या तिच्या मनाने कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला.

काही काळ सुटीचा आनंद घेतल्यावर तिने तपाचरण सुरू केले. कारण तिचा मूळ स्वभाव स्वच्छंदी नव्हता! इकडे तोतया उषा म्हणजेच छाया हिचे मूळ रूप उघडे पडले; कारण ती उषेइतकी कर्तव्यपरायण नव्हती! सतत कर्मयोगात गुरफटलेल्या सुर्याला हे कळते तेव्हा तो उषाकडे निघतो. पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या सुर्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात केव्हातरी बदल मिळाला तर तो हवाहवासा वाटतो. हे मनोमन पटले; पण उषा मात्र त्याच्या येण्याची बातमी ऐकून सरळ गोदाकाठी दाखल झाली आणि सुर्यही पाठोपाठ येवून पोहोचला! इकडे गोदावरीच्या उत्तर तीरावर तपोनिष्ठ ऋषींची आश्रमे होती. त्यांनी उषेला आश्रमात अगत्याने प्रवेश दिला आणि तिच्यावतीने स्वतः सूर्याशी बोलणी करायला गेले. सूर्य उषेला भेटायला उतावीळ झालेला होता. त्याला तिला हे सांगायचे होते की, मी तुला गृहीत समजत गेलो; पण आता असे होणार नाही. त्याने हा निरोप ऋषींमार्फत पाठवला आणि ऋषींना वटवृक्षासारखे आयुष्यमान होण्याचा आशिर्वाद दिला. आता सूर्य आणि उषा यांचे मनोमीलन झाले आणि त्यांच्या विस्तीर्ण चर्चेतून असे फलित निघाले की, देवांनासुध्दा श्रमपरिहाररुपी औषधीची गरज असते. गौतमीतटी जेथे हे सर्व घडले ते स्थान म्हणजे पंचवटी. येथे गोदेला मिळणाऱ्या दोन नद्यांना सूर्यकन्या अरुणा-वरुणेचे नाव देण्यात आले आहे. सूर्याचे उर्वरित कुटुंबही पंचवटीत आले आणि

त्या अवघ्यांनी मिळून। गोदावरीत केले स्नान।
अवघ्याप्रती आनंद पूर्ण। झाला गोदाप्रसादे।।

…आणि मंडळी आनंदाने स्वस्थानी निघून गेली !

आता महाराजांना पंचवटीतील रामचंद्रांचे वास्तव्य आणि सीताहरण आठवले.

या पंचवटीमाझारी। राहिला होता रावणारि।
गुंफेतुन सीता सुंदरी। येथून नेली रावणाने।।

रामाच्या आठवणीतून महाराजांना थेट काळाराममंदीर आठवले…

श्रीमंत सरदार ओढेकर। यांनी बांधिले मंदिर।
काळ्या रामाचे साचार। पंचवटीमाझारी।।
ना तरी सरदार आताचे। नावालाच उरले साचे। ख्यालीखुशालीत पैशाचे। करिती वाटोळे विबुध हो।।

असे तत्कालीन परिस्थितीवर महाराज ओरखडे ओढतात.

आता आपण पुन्हा पुराणकाळात जातोय आणि गरुडतीर्थाची ओळख करुन घेतो आहोत. येथे मणिनाग नावाच्या शेषपुत्राची कथा येते. या मणिनागाने तप करून शंकराला प्रसन्न केले आणि असा वर मागितला की, त्याला गरुडापासून भय नसावे आणि शंकराने तथास्तु म्हटले.निश्चिंत झालेला मणिनाग फिरत फिरत थेट गरुडाच्याच घरी आला. आता गरुडच तो! मारु शकत नसला तरी कैद तर करु शकतच होता आणि त्याने ते केले. इकडे नंदीने महादेवांना मणिनागविषयी विचारले असता महादेवाने मणिनाग गरुडाकडे कैद असून, जर नंदी वैकुंठी जावून विष्णुशी बोलला तर काही होऊ शकते, असे म्हटले. त्याप्रमाणे नंदी वैकुंठी गेला आणि नारायणाला दंडवत घालून येण्याचे कारण सांगितले. तेव्हा विष्णुंनी गरुडाला बोलावून विचारले;

हे गरुडा मणिनागासी। त्वां कां कोंडिले गृहासी। भगवान पिनाकपाणिशी। वैर करणे बरे नव्हे।।
शिवकृपेकरुन। मणिनाग झाला निर्भय जाण। द्यावे त्याला सोडून। वैर थोराशी बरे नव्हे।। 

श्रीविष्णुंचे म्हणणे न ऐकता गरुड स्वतःचेच म्हणणे खरे या अविर्भावात म्हणाला,

गरुड म्हणे केशवा। खूप उपदेश केला बरवा।
भक्ष्य जीव मी सोडावा। मग मी जगू कोण्या रीती?।।

गरुडाला स्वशक्तीचा गर्व झालेला पाहून विष्णुंनी त्याचा डोक्यावर स्वतःची करंगळी ठेवली आणि ती त्याला उचलून दाखवायला लावले पण, करंगळीच्या भाराने गरुड वाकडा झाला. गर्वहरण होऊन तो शरण आला. आता विष्णुंनी त्याला शिवाकडे पाठवले आणि शिवाने त्याला पाठवले गोदामाईकडे!

 वैनतेया म्हणे पशुपति। तु जाई गोदेप्रती।
तेथे गौतमी स्नाने निश्चिती। सरळ होशील वैनतेया।।

आता हे तीर्थ कोठे आहे? तर महाराज सांगतात,

हे तीर्थ उत्तर तीरी। गोदावरीच्या निर्धारी। गरुडेश्वर त्रिपुरारी।।
या क्षेत्रासन्निध साचे। पिंपळगाव गरुडेश्वराचे। या क्षेत्राचा महिमा वाचे। किती सांगू विबुधहो।।

आता पुढील कथा येते गोवर्धन येथील जबाली नामक शेतकऱ्याची! हा शेतकरी अतिशय लोभी होता.तो दिवसभर बैलांकडून काबाडकष्ट करून घेई. त्यांना घटकाभरही मोकळं सोडीत नसे.जे बैल कामाचे त्यांना पोटभर खायला देई आणि जे थकलेले असत त्यांच्या नशिबी उपासमार ठरलेली होती.हे पाहून कामधेनू अश्रू ढाळीत नंदीकडे गेली आणि तिने पाहिलेला प्रकार त्याला सांगितला. नंदीला दुःख झाले आणि संतापही झाला.तो महादेवांकडे गेला आणि त्याने गोधनावर होणारा अन्याय शिवाला सांगितला.. तेव्हा शिवतत्व म्हणाले

तुझ्या जातीचा चुकवावया त्रास। तूच योजी उपायास।
तेथे मी ढवळाढवळीस। न करीन कदाही।।

हे ऐकून नंदी एकूण एक गोधन हाकारत घेऊन गेला. ना दूध देण्यास गाय राहिली, ना शेतीसाठी बैल. मग देव मानव मिळून ब्रह्मदेवांकडे गेले, तेथून मंडळी शिवाकडे गेली. शिवाने सर्वांना नंदीला शरण जाण्यास लावले. अशाप्रकारे सर्व नंदीला शरण आले. त्याची स्तुती करू लागले. माफी मागू लागले तेव्हा नंदी म्हणाला,

नंदी बोलला त्यावरी। गोसव यज्ञ भूमीवरी। तुम्ही केल्यास गोदातीरी। गोधन सारे सोडीन।।
यज्ञ केला गोधन सुटले । देवऋषी आनंदले। म्हणून त्या तीर्था भले। गोवर्धन हे अभिधान।।
हे गोवर्धन क्षेत्र परियेसि। पंचवटीच्या पूर्वेसी। दसकपंचक या ग्रामापाशी। महाशिंगीच्या सन्निध।।

पुढे असेच गो-वृषभ सेवेचे महिमान सांगत हा अध्याय पूर्ण होतो. तेव्हा आपणही येथे थांबून उद्या पुन्हा भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.