संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या आठव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

काल ठरल्याप्रमाणे आपण आज अहिल्या-संगमावर जावूया. महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या ही ब्रम्हदेवांची कन्या होती. अर्थात आपण सर्वजण ब्रह्माचीच संतान आहोत. पण अहिल्येविषयी स्वतः ब्रम्हदेव सांगतात.

अहिल्यासंगमतीर्थासी। आता नारदा परियेसी।
जी अहिल्या माझे कुशी। जन्म पावली असे की।।
अहिल्या परम सुंदर। पाहता वेडावले दिवंचर।
तिचे मी मांडिले स्वयंवर। पण ऐसा करुनी।।
जो पृथ्वी प्रदक्षिणा। करुनि येईल अधिक जाणा।
त्या मी अहिल्या सुलक्षणा। अर्पण करील निश्चयेसी।।

असा, पण ऐकल्यावर गौतमांनी एका प्रसूत होणाऱ्या धेनुला मनोभावे प्रदक्षिणा घातली आणि अर्थातच ती पृथ्वी प्रदक्षिणेच्या मोलाची ठरलीतेव्हा ब्रह्मदेवांनी अहिल्येचा विवाह गौतमांशी लावला. पण, ही गोष्ट इंद्राला पटली नाही. हा सल त्याच्या मनातून जात नव्हता. एके दिवशी गौतम स्नानास गेले हे पाहून तो अहिल्येला भेटण्यास आला. अहिल्या आणि इंद्राला संभाषण करताना पाहून गौतमांना संताप झाला. कारण त्यांना इंद्राचे येणे आवडले नाही. संतापाच्या भरात त्यांनी इंद्र व अहिल्या दोघांची खुप निर्भत्सना केली.

मात्र क्रोध शांत होताच त्यांना उभयतांचे निर्दोषत्व जाणवले व रागाच्या भरात इंद्राला सहस्त्र भगे पडतील, अशी उच्चारलेली शापवाणी मागे घेऊन त्याला सहस्त्र दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीचा विचार करता येईल, असा आशिर्वाद दिला तसेच निर्दोष अहिल्येचे नाव ब्रह्मगिरीवर उगम पावलेल्या आणि गौतमीला मिळणाऱ्या नदीला देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आजही त्र्यंबकेश्वरी अहिल्या-गोदावरी संगम आपल्याला आहिल्यादेवींची आठवण करुन देतो.

पुढे महाराज आपल्याला जनस्थानाची महती सांगतात. येथे जनकराजाने वरुणाच्या सांगण्यावरून यज्ञ केल्याचे सांगतांना म्हणतात,

ते जनकाने ऐकिले। दंडकारण्यी येणे केले।
यज्ञकर्म आरंभिले। पुनीतशा गौतमीतीरा।।
नारदा हे जनस्थान। आहे विस्तृत चार योजन।
एथे करिता कोणी स्नान। प्रपंच परमार्थ साधेल की।।

आणि पुढच्या ओवीत जनस्थानाचा विस्तार सांगतायेत,

आरंभ जनस्थानाचा। तडवळ्यापासून साचा।
मुख्यभाग तो याचा। हल्लीचे जे नाशिक।।

आता महाराज चक्रतीर्थाकडे वळताना एक कथा सांगतातविश्वधर्म नावाच्या वैश्याचा तरुण मुलगा मरण पावतो. तेव्हा साहजिकच त्याचे आईवडील करुण आक्रोश करतात. ते पाहून साक्षात यमाचे काळीज द्रवित झालेत्याला स्वतःच्या कार्याची चीड आली आणि आपण आजपर्यंत अनेक जीवांना दुःखी केले, असे समजून तो गोदातीरी तप करायला बसला तेव्हा भूमीवर जीवांचा भार वाढलाभूमीने इंद्राकडे तक्रार केली की यम त्याचे कार्य करीत नाही. इंद्राने भास्कराकडे चौकशी करता कळते की, यम तप करीत आहे.

हे ऐकून इंद्राला नेहमीप्रमाणे भती वाटते की आपले स्थान जाते की काय? म्हणून इंद्र सैन्यासह यमाचे तपभंग करण्यास आला तेव्हा जे घडले ते अघटित होते.

परि झाले अघटित। जय न आला इंद्राप्रत।
यमा रक्षी रमानाथ।निज चक्र पाठवूनी।
चक्र यमाभोवती फिरे। तेणे इंद्र सैन्य झाले घाबरे।
पाठ दावून माघारे। फिरते झाले तात्काळ।।
चक्र जेथे शांत झाले। तेच चक्रतीर्थ भले।
असो इंद्रे पुढे पाठविले। तपोभंगा गणिकेला।।

आता ही जी गणिका यमासमोर आली तिच्याकडे यमाने फक्त पाहिले आणि तिचे शरमेने आणि भीतीने पाणीपाणी झाले व तिने तात्काळ गोदामाई जवळ केली. पुढे सुर्योपासक या सुर्यपुत्राचे मतपरिवर्तन झाले आणि तो स्वतःच्या निश्चित कर्माकडे वळला.

आता महाराज म्हणतात ,

बेझे ग्रामाचियापाशी। गणिका मिळाली गोदेशी।
चाको-याच्या सानिध्याशी। चक्रतीर्थ हे असे।
येथून गोदावरीचा। प्रवाह दिसे स्पष्ट साचा।
एथे उभय भाग गोदेचा। आहे परम भयंकर ।
हे तीर्थ अति खोल। नीलवर्ण आहे जल।
एथे खडकांशी अति विमल। पाऊले आहेत विष्णुची।।

 

…..आणि अशी सुंदर कथा सांगुन हा अध्याय थांबतो!तेव्हा आपणही येथेच थांबून उद्या पुन्हा भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.