संत दासगणु महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजचा पाचव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

कालच्या अध्यायात गोदावतरण झालेले आहे. आता गंगेच्या द्वितीय ओघाचा इतिहास ऐकण्याची नारदांना जिज्ञासा आहे आणि अर्थात आपल्यालाही! तेव्हा पाहूया ब्रम्हदेव काय म्हणतात…!

नारदाचा प्रश्न ऐकिला। आणि विधाता बोलता झाला।
सगरपुत्राचे उध्दाराला। आणिली गंगा भागिरथे।।

येथे भगीरथ राजाची कथा येते. हा भगीरथ राजा इक्ष्वाकु कुळातील होता याच्या पूर्वजांची कथा येथे आहे. या इक्ष्वाकु कुळात सगर नावाचा राजा होता. त्याला दोन पत्याहोत्या. पण संतती मात्र नव्हती. राजाने गुरू वसिष्ठांच्या सांगण्याने ऋषीपूजन, दानधर्म केले आणि त्याला साठहजार पुत्र झाले आणि एका पत्नीला एक पुत्र झाला. पुराणातील साठहजार हा आकडा रुपकात्मक आहे. ही पुत्रवत प्रजाजनांची संख्या असू शकते!

पुढे या सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि यज्ञीय अश्वाच्या रक्षणासाठी या साठहजार पुत्रांना पाठवले.

तो अश्व यज्ञाचा। इंद्रे चोरुनिया साचा।
नेऊन बांधला कपिलाचा। आश्रम पाताळी पाहून।।

इकडे  सगरपुत्र अश्वाला शोधून कंटाळले आणि त्यांना आकाशवाणी मार्फत कळले की, अश्व पाताळात कपिलाश्रमात आहे. चिडलेले सगरपुत्र पाताळात गेले आणि कपिलमुनींना लाथ मारून अश्व ताब्यात घेतला. पण, या सर्वात कपिलांचा काहीच दोष नसल्याने ते क्रोधीत झाले. त्यांनी शाप देवून सगरपुत्र भस्म केले. इकडे सगर राजाची चिंता पाहून त्याचा नातू अंशुमान पाताळात गेला आणि कपिलांना शरण जावून, यज्ञीय अश्व सोडवून घेऊन आला; मात्र त्याबरोबर तो सगरपुत्रांच्या मृत्यूची बातमी घेऊन आला. दुःखी राजाने औपचारिकता म्हणून यज्ञ पूर्ण केला. पण, त्यानंतर त्याला राज्योपभोग विषवत वाटू लागले.

पुढे महाराज म्हणतात,

अंशुमानाकारण। दिलीप नामे पुत्र जाण।
त्या दिलीपापासुन। जन्म झाला भगीरथा।।

या भगीरथाने घडलेला इतिहास जाणून घेतला. पुढे त्याने कपिलांची सेवा करून त्यांना प्रसन्न केले आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग विचारला.

कपिल म्हणे भगीरथा। तुवा प्रार्थून उमानाथा।
पूर्वजांच्या उध्दाराकरिता। जटस्थ गंगा आणावी।।

आणि भगीरथाने कठोर तप करुन महादेवांना प्रसन्न केले आणि

भोलानाथ प्रसन्न झाला। तात्काळ दिले गंगेला।
हाच द्वितीय ओघ भला। उरला होता जटेत।।

अशाप्रकारे पहिला ओघ गौतमांना आणि द्वितीय ओघ भगीरथाला मिळाला. हे सांगताना महाराज म्हणतात,

म्हणून गौतमीकारण। वृद्धा म्हणू लागले जन।
नारदा हिचे श्रेष्ठपण। मान्य जगत्रयाला।।

आणि हा अध्याय येथे थांबतो. उद्याच्या अध्यायापासून आपल्याला गौतमी-गोदावरीबरोबर प्रवासाला निघायचे आहे तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.