संत दासगणु महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजचा चौथा अध्यायाला नमस्कार करुयात.

 

नित्याप्रमाणे श्रीगणेशाला वंदन करून दासगणु महाराज ब्रह्मदेव-नारद संवाद पुढे नेतायेत आणि गौतमांनी कठोर तप करून महादेवांना प्रसन्न केल्याचे सांगतात. साक्षात शंभु-महादेव प्रकट झालेले आहेत आणि त्यावेळेला महर्षी गौतम म्हणतायेत

आणि म्हणाला येणे रिती। हे भगवान पशुपति।
नीलकंठा प्रतापज्योति। भक्त काम-कल्प-द्रुमा।।

हे नागभूषणा मदनदहना। पंचतुंडा परम पावना।
ॐकाररुपा पार्वतीरमणा। भीमा भवहरा शूलपाणि।।

देवाआपुल्या मस्तकावरी। जी वास करी गोदावरी।
ती मदर्थ धाडी भूमीवरी। ब्रह्मगिरीकारणे।।

 

अशी महादेवांकडे गोदामाईची मागणी करून गौतमांनी माता पार्वतीचीही स्तुती केली. ती ऐकून पार्वतीमाता व गजानन सुहास्य वदनाने महादेवांकडे पाहू लागले

तेव्हा शंकर म्हणे, गौतमाला। मुने तुझ्या मागण्याला।
मान्य केले,गोदेला। जा घेऊन दिली मी।।

जगत्कल्याणासाठी। या तुझ्या खटपटी।
जो समाजहितासाठी। झटे त्याचेच महत्त्व खरे।।

तव करे जी हत्या झाली। ती मुद्दाम आहे घडविली।
गजाननाने युक्ती केली।। निज मातेस तोषवाया।।

 

हे ऐकून गौतमही आनंदाने म्हणाले, प्रभू! हे करण्यामागे गजाननांचा हेतू शुद्ध होता ना!’ मग आता…

गंगेचे अवतरण। महाराज लौकर होऊ द्या ।।

 

पुढे महर्षी गौतम गोदामाईसाठी वरदान मागतायेत…

यावच्चंद्रदिवाकर। गोदा मृत्युलोकावर।
राहो होऊन स्थिर। तीर्थरुप सर्वत्र।।

ही मागणी ऐकताच महादेव म्हणतात,

यावच्चंद्रदिवाकर  गोदा मृत्युलोकी राहील स्थिर।
सकल तीर्थांची राजराजेश्वर। होऊनिया गौतमा।।

आता अर्थातच ब्रह्मगिरीवर आनंदाचे वातावरण आहे! गोदेचे पूजन करण्यासाठी

अष्ट वसू अष्ट दिक्पाल। वैश्वानरादि देव सकळ।
गोदाचरणी ठेविण्या भाळ। बैसून आले विमानी।।

अवघ्या मिळून देवस्त्रिया। आल्या ब्रम्हगिरीठाया।
गोदावरीस ओवाळावया। रत्नदीपेकरूनी।।

 

आता महादेव आणखी आशिर्वाद देतात की,

गुरू येता सिंह राशीस। गोदावरीचे विशेष महत्त्व।
अवघे देवमुनी दिवौकस। तटी बैसती गोदेच्या।।

अशा अनंत वरदानांनी विभूषीत आपली गोदामाई भुमीवर अवतरली आहे. आजचा अख्खा अध्याय प्रासादिक आहेप्रत्येक ओवी गोदेसारखीच पावन आहे. तेव्हा तिला मनोभावे नमस्कार करून येथेच थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.