संत दासगणु महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजचा तिसरा अध्यायाला नमस्कार करूयात.

कालच्या अध्यायात जलयुक्त कमंडलु घेऊन ब्रह्मदेव ब्रह्मलोकी आलेले होते. ही ब्रह्मलोकी आलेली गंगा महादेवांकडे कशी गेली हे सांगण्यासाठी ब्रम्हदेवांनी नारदांना बलीराजाची कथा सांगायला सुरूवात केली.

प्रल्हाद आद्य भागवत। बलि त्याचा  नातू सत्य।
विंध्यावली जयाप्रत। कांता महा पतिव्रता।।
बलिने अगणित यज्ञ केले। तै इंद्रादि देव चिंतावले।
मग अवघे मिळून जाते झाले। शरण श्रीहरीला।।

इंद्राला इंद्रपद एक मन्वतरासाठी मिळालेले असताना बलीचा प्रभाव वाढला तर त्याचे इंद्रपद धोक्यात येईल म्हणून चिंतीत झालेल्या इंद्राला विष्णूने अभय दिले आणि पूढे वामन अवतार झाला.

पुढे कश्यपाचे उदरी। धरिता झाला अवतार हरि।
वामन होऊन बलीचे द्वारी।आला याचना करावया।।

या वामनरुपी विष्णुने बलिकडे जी त्रिपाद भूमी मागितली ती म्हणजे त्याचे त्रैलोक्याचे राज्य मागितले आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बलीने दानाचा संकल्प सोडला. बली जरी दानशूर होता तरी तो दांभिक होता. त्यामुळे वामनाचे हे कार्य संस्कृती टिकविण्यासाठी मोलाचे ठरले आणि ब्रह्मदेवांनी स्वतःजवळील गंगाजलाने श्रीविष्णुंचे पादप्रक्षालन केले.

ब्रह्मदेव म्हणतात,

हरीच्या पदी गंगा घालिता। ती आली मेरुपर्वता।
तेथे चार ओघ तत्त्वता। नारदा तिचे जाहले।।
दक्षिणेकडील ओघ भला। शंकराच्या जटेत गेला।
पश्चिमेकडील माझ्या आला। पुन्हा कमंडलु मध्ये।।

आता नारदांचा प्रश्न पुन्हा मुळ पदावर की, गंगा पृथ्वीवर कशी आली?’ यावर ब्रह्मदेव म्हणतात,

ब्रह्मदेव म्हणे त्यावरी। गंगा दोन प्रकारी।
येती झाली भूवरी। शंकराच्या जटेतून।।
एक भाग गौतमे आणिला। दुसरा भागिरथे आणिला।
आता गौतमाच्या इतिहासाला।ऐक सांगतो प्रथमतः।।

अशा प्रकारे गौतमी-गोदावरीच्या आगमनाची तयारी सुरू झाली.

पुढील कथा सर्वांच्या ओळखीची आहे. महादेवांच्या जटेत स्थान प्राप्त झालेल्या गंगेबद्दल पार्वतीला मत्सर वाटणे आणि मग गणपतीमाता पार्वती आणि तिची सखी जया यांच्या संगनमताने गंगेचे पृथ्वीवर येणे. अर्थात हेही रुपकच आहेमानवाच्या भल्यासाठी गोदावतरण ही ईश्वरीयोजना होती तसेच महान कर्मयोगी गौतमऋषींच्या कर्माचे फलित म्हणून गौतमीचे येणे अटळ होते.

गौतमांचा आश्रम ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी होता. त्यांच्या निष्काम कर्माचा सौरभ सर्वदूर पसरलेला असतांना गणपतीने जयाला सांगितले

तु धेनु होऊन तेथे जावे। मुनि हैक म्हणताची मरावे।
मग अवघे मुनी ठेवतील नावे। त्या महाभाग गौतमाला।।
मग मी प्रगटून तेथ। युक्ती सांगेन गौतमाप्रत।
की, तु गंगा आणिल्या मृत्यूलोकात। गोहत्या जाय तुझी।।

म्हणजे ईशशक्तीच आतूर झाली होती पृथ्वीवर येण्यासाठी आणि निमित्त केले गोहत्येच्या पातकांतून गौतमऋषींना मुक्त करण्याचेआता आपले महर्षी गौतम तपःश्चर्या करतील आणि उद्या गोदामाई ब्रम्हगिरीवर अवतरणार.

इतक्या सुरेख पद्धतीने संत दासगणुंनी गोदाअवतरणाचे वर्णन केले आहे. गोदा आता अवतरणार आहे या सोहळा पाहून उद्याच्या विवेचनात..!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.