संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या विसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजच्या अध्यायाची सुरवात पुत्रतीर्थाने होते. महर्षी कश्यपांच्या दोन पत्नी, दिती आणि अदिती! एकदा दितीने अदितीला विचारले की ‘माझी मुले का वाचत नाहीत?’ तेव्हा अदिती म्हणाली की, हा प्रश्न तिने कश्यपांना विचारावा आणि दितीने तसे विचारल्यावर कश्यपांनी तिला काही नियम घालून दिले.

उत्तरेस डोके करुन। कदा न करावे शयन। उखळामुसळा ओलांडून। जाऊ नये केव्हाही।।
अस्तमानाचे समयी। निद्रावश होऊ नाही। सूर्य उदयास येई जयी। तेव्हा निजणे बरे नव्हे ।।

हे सर्व ऐकून दितीने त्याप्रमाणे अनुसरण केले…कालांतराने ती गर्भवती राहीली. ही बातमी मयासुराकडून इंद्राला कळली

इंद्राने संधी साधून तिच्या गर्भाचे सात तुकडे केले. ते सातही जण त्याच्याशी भांडू लागले. तेव्हा इंद्राने त्या सातांचे सात भाग केले आणि असे ते एकोणपन्नास झाले. पुढे हेच मरुद्गण झाले. पण दितीला या सर्वाचा खुप त्रास झाला. तिने इंद्राला शाप दिला. त्यावेळी ती अगस्ति आश्रमात होती म्हणून अगस्ति ऋषींनीही इंद्राला शाप दिला आणि जेव्हा ही गोष्ट कश्यपांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनीही इंद्राला खुप सुनावले. आता यातील रुपक उलगडून पाहूया. मरुद्गण हे देवांचे सैनिक आहेत आणि इंद्र हा देवांचा राजा. शिवाय कथेनुसार इंद्राची व मरुद्गणांची मैत्री पण दाखवली आहे. म्हणजेच इंद्राने दितीच्या एकाच मुलावर सात जबाबदाऱ्या टाकल्या आणि पुढे त्याने एकेका जबाबदारीसाठी आणखी सात-सात जणांची नेमणूक केली. असा तो बौध्दिक दृष्ट्या एकोणपन्नास विभागात विभागला गेला पण याचा माता-पिता म्हणून कश्यप-दितीला खुप त्रास झाला म्हणून त्यांनी इंद्राला बोल लावला.

पुढे इंद्र ब्रह्मदेवांच्या आज्ञेने गौतमी  तटी येवून गौतमीस्नान करून शिवाला प्रसन्न करुन घेतो. शिवाय मरुद्गणांनांही देवत्व मिळते. हे सर्व जेथे घडते ते पुत्रतीर्थ. महाराज म्हणतात,

श्रोते हे पुत्रतीर्थ। राजापूर भोगगावासमीप सत्य। मंगरूळ गावी मित्र-तीर्थ। दितीसंगम जवळ्याजवळी।।
ग्राम एक राजेटाकळी। शुक्रतीर्थ तेथेच जवळी। येथे स्नान केल्या निजकुळी। कुलोध्दारक पुत्र होय।।

असे या पुत्रतीर्थाचे माहात्म्य सांगून पुढे यमतीर्थ व अग्नितीर्था विषयी सांगतात. 

गोदावरीच्या दक्षिण तटावर एक अनु-हाद नावाचा एक कपोत राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव होते ‘हेती’. तसेच गोदेच्या उत्तरतटी उलूक राहात होते. हे कपोत आणि उलूक एकमेकांचे हाडवैरी होते. या अनु-हादाने यमापासून पाशदंड मिळवला. तर उलुकाने त्रिनेत्रापासून अग्नीअस्त्र मिळवले उलूकाने अग्निअस्त्र अनु-हादावर सोडले तेव्हा हैतीने अग्निला प्रार्थना करून अनु-हादाला वाचविले तरअनु-हादाने उलूकावर सोडलेल्या पाशदंडा पासून उलूकाला वाचविण्यासाठी उलूकीने यमाजवळ प्रार्थना केली.

या योगे ऐसे झाले। दोघाही ना भय उरले। शत्रु असून मित्र बनले। एकमेकाचे नारदा।।
ही गोष्ट घडली जेथ। तेथेच आहे यमतीर्थ। काळेगावासंनिध सत्य। अग्नितीर्थ गुंजेजवळी।।
तेथे जे स्नान करती। त्यांचे शत्रु ही मित्र बनती। अवघ्या सिध्दी प्राप्त होती। तया स्नानकर्त्यास।।

पुढे एकदा ऋषींची चर्चा सुरू होती की, कोण श्रेष्ठ? अग्नी, भूमी, वायु की पाणी? चर्चेतून काही निष्कर्ष निघेना, अगदी चर्चेचे रुपांतर वादात झाले. तेव्हा मंडळी गोदेकाठी आली आणि येथे येताच पाणीच श्रेष्ठ यावर एकमत झाले. हे जेथे घडले त्या तीर्थाचेनाव तपतीर्थ! जे ‘चांगर्तपुरी’च्या पश्चिमेस आहे.

आता अर्ष्टिषेणाची कथा येते. या अर्ष्टिषेण राजाने आपल्या ‘भर’ नावाच्या पुत्राला राज्यगादीवर बसवून, राजपुरोहीताला बरोबर घेऊन सरस्वतीकाठी हयमेध यज्ञ करण्यासाठी निघून गेला. यज्ञाला आरंभ करताच ‘मिथू’ नावाच्या दैत्याने येवून यज्ञाचा विध्वंस तर केलाच शिवाय राजाला व पुरोहिताला पाताळात कैद करुन घेऊन गेला. इकडे पुरोहित पुत्र देवापीनेआपल्या मातेजवळ पित्याविषयी चौकशी केलीअसता तिने ते राजाबरोबर यज्ञ करण्यासाठी सरस्वतीकाठी गेल्याचे सांगितले. पुढे देवापीने सरस्वतीच्या काठावर जाऊन पाहिले, तेव्हा त्याला हकीकत कळली. नंतर तो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी गौतमी तटी आला, पुढे अर्थातच महादेवांनी त्याला सहाय्य केले आणि नंदीला पाताळात पाठवले. नंदीने ‘मिथू‘ दैत्याचा अंत केला आणि राजा व पुरोहिताला घेऊन आला. अशा प्रकारे देवापीच्या तपाला फळ आले आणि राजाने गौतमीतटी हयमेध यज्ञ केला.

बुध हो हे तीर्थ। आहे उक्कडगावासन्निध सत्य। तैसे अर्ष्टिषेणतीर्थ। भादलीसमोर दक्षिणतटी।।

आता पंचतीर्थांची कथा येते. एकदा अग्निसमान तेजस्वी मानवाला महादेवांच्या कृपाप्रसादे दोन अपत्ये होतात सुवर्ण आणि सुवर्णा! अत्यंत सुसंस्कारीत कुटुंबात वाढूनही ती मोठी होऊन चारित्र्यहीन निघतात. तेव्हा तो तेजस्वी दुःखी मानव दुःखाग्नित होरपळून निघतो आणि गौतमीतटी महादेवाला शरण येतो. भगवान शंभु महादेव त्याचे सांत्वन करून सर्वकाही ठीक होण्याचा आशिर्वाद देतात तोच शार्दूल नावाचा दैत्य सुवर्णेला पळवून नेतो. तेव्हा या शिव भक्ताला मदत करायला विष्णू येतात आणि स्वतःच्या चक्राने शार्दूलाचा वध करतात. 

शार्दूल वधानंतर। गोदातटाकी शार्ङ्गधर। येवून निजचक्र साचार। गंगोदके प्रक्षाळी त्या।
तेथे चक्रतीर्थ झाले। पुरुषोत्तम पुरीपाशी भले। विष्णू उभे राहिले। तेथे पुरुषोत्तमरुपाने।।
धर्म आणि अग्नि यांच्या नयनी। जे शार्दूलाच्यावधानी। आनंदाश्रू आले जाणी। त्यांच्या नद्या जाहल्या।।
जयजयकार कराया भले। जेथे देव गोळा झाले। ते गोळेगाव क्षेत्र भले। आहे गोदेच्या तटाकी।।
जयानामे देवीपाशी। गोळेगावच्या सान्निध्याशी। आनंदा मिळाली गोदेशी। नंदिनी नाथ्र्याजवळ असे।।
तैसे शार्दूलतीर्थ। सादोळ्याजवळ सत्य। काशीहून श्रेष्ठ सत्य। ही पंचतीर्थे नारदा।।

आसा पंचतीर्थांचा महिमा सांगून हा अध्याय येथे थांबतो… तेव्हा उद्या भेटूच !

News Reporter

1 thought on “संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय विसावा) – एक विवेचन…!

  1. Coincidently,150 years Anniversary of shri Dasganu Maharaj is celebrated at Gorti I am fortunate to attend ! Goddess Godawari gives you more strength vigour to carry mission I pray almighty!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.