शक्ती माहात्म्याचा जागर..

संत दासगणु महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजचा दुसरा अध्यायाला नमस्कार करुयात. या अध्यायाची सुरूवात नारदांनी ब्रम्हदेवांना विचालेल्या प्रश्नाने होते.

नारदे विधात्याकारण। प्रश्न केला कर जोडून।
ही गंगा स्वर्गातून।आली कैशी मृत्युलोकी।।

या प्रश्नाच्या उत्तरादाखल ब्रम्हदेव एक कथा सांगतात. या कथेत शंकरपार्वतीचा विवाह प्रसंग आहे. हे रुपकात्मक लेखन आहे. विवाह म्हटल्यावर तो माणसाच्या विवाहासारखाच असतो असे नाही. मागील अध्यायातच महाराजांनी सांगितले, आठवते ना!

ब्रम्हा-विष्णु-महेश ही एकाच शक्तीची तीन नावे आहेत. त्यामुळे शंकराच्या विवाहास ब्रम्हा, विष्णु उपस्थित… हे कसे? ईशशक्तीचा विवाह म्हणजे ईशशक्तीला झालेली इच्छा! कोणती इच्छा?सृष्टीनिर्मितीची इच्छा! ही इच्छा होत नाही तोपर्यंत ईशशक्ती पूर्ण असते आणि इच्छा होताच अपूर्ण होते. हे अपूर्ण होणे म्हणजेच स्खलित होणे अर्थात विवाहित होणे होय!

आता येथे उन्मत्त तारकासूराला मारण्यासाठी शिवापासून उत्पन्न पुत्रच हवा असे म्हटले आहे. मुळात तारकासुराला ईशशक्ती स्वतः मारू शकते पण, तसे न करता ईश्वराच्या मुलाने मारणे उचित ठरेल, असे पुराणकर्त्यांना म्हणायचे आहे. हा ईश्वराचा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ‘माणूस’ आहे. मग भलेही त्याचा प्रतिनिधी कार्तिकस्वामी का असेना. हे सर्व साधण्यासाठी देवांनी सरळ ईशशक्तीला शरण जाण्याऐवजी मदनावर हे काम सोपवले आणि शिवाला क्रोध आला.

मदनाने आपुले बाण। प्रेरिले शिवावरी जाण।
त्यायोगे तो भगवान। कृध्द मनी जाहला।।
तृतीय नेत्र उघडिला। मदन तात्काळ भस्म केला।
जंबुकाच्या चेष्टेला। कोठून मानी केसरी।।

अर्थात, आता देवमंडळी ईशशक्तीला शरण आली आणि विधात्याने त्यांचे म्हणणे मान्य केले. पुढे महादेवाच्या विवाह सोहळ्यात ब्रम्हदेवाचे अर्थात सृष्टी निर्माण कर्त्या शक्तीचे स्खलित होणे म्हणजेच द्रवित होणे, आर्द्र होणे दाखवले आहे. एवढे जबाबदारीचे कार्य करत असतांना आपण आर्द्र होतो. हा ब्रम्हदेवांना अपराध वाटतो. या अपराध भावनेतुन शिव त्यांची सुटका करतात आणि जलयुक्त कमंडलु ब्रम्हांस देतात. या प्रसंगाचे वर्णन करतांना महाराज म्हणतात,

हा कमंडलु भूमीचा। कृपाजले भरिला साचा।
हा राजराजेश्वर तीर्थाचा। होईल की निश्चये।।

याचा सरळ अर्थ असा की, आपल्या नद्या, आपल्याकडे असलेली मुबलक जलसंपत्ती ही ईशशक्तीची वाहती करुणा आहे. पुढे हा गंगेने भरलेला कमंडलु घेऊन ब्रम्हदेव ब्रम्हलोकी येतात आणि हा अध्याय येथे थांबतो.

उद्याच्या अध्यायात आपल्या गोदामाईची भूमीवर येण्याची तयारी पूर्ण होईल तेव्हा उद्या तिसऱ्या अध्यायातून आपण भेटूच!

 

–  मधुमालती जोशी, गोदा अभ्यासिका

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.