संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सत्तावीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

नित्याप्रमाणे आजही आपण गौतमीच्या विविध कथांना जाणून घेणार आहोत. श्वेत पर्वतावर एक चिच्चिक पक्षी राहात असतो. त्याला दोन तोंडे असतात. काही दिवसांनी त्या ठिकाणी त्याला काही खाण्यास मिळत नाही, तेव्हा तो दीनवदनाने तेथून बाहेर पडतो आणि खाद्य शोधू लागतो. त्याच वेळी तेथून पवमान नावाचा राजा जात असतो. तो या विलक्षण पक्षाला पाहातो आणि त्याची दोन तोंडे पाहून विचारात पडतो की, असा कसा हा पक्षी? तेवढयात चिच्चिक पक्षी मनुष्यवाणीने बोलतो की, ‘हे राजन, या पर्वतावर सर्व कंदमुळेच आहेत. ती काढून खाण्यास मी असमर्थ आहे म्हणून माझी अशी दैना झाली आहे. तेव्हा मला कोठे खायला मिळेल ते सांग. मी पूर्वजन्मीचा ब्राह्मण आहे, पण खुप पाप केल्यामुळे हा खगदेह मिळाला आहे.” तेव्हा पवमान राजाने त्याला गौतमीतीरी असलेल्या गदाधर देवाला शरण जाण्यास सांगितले. जेणेकरून त्याची गतजन्माची पातके नष्ट होतील आणि गोदेकाठी त्याला खायला काही कमी पडणार नाही. अशाप्रकारे चिच्चिकाने पवमान राजाचे ऐकले आणि गदाधरतीर्थी जावून स्वतःचे इहपरलोकाचे कल्याण साधून घेतले.

पुढील कथानक येते ते सूर्यकन्या विष्टीचे आणि त्वष्ट्याचा पुत्र विश्वरुप यांचे! हे दोघेही अत्यंत कुरूप होते. त्यांच्याशी कुणी स्वरूपवान काय विवाह करणार? तेव्हा या उभयतांचा विवाह होतो व त्यांना गंड, अतिगंड व हर्षण असे तीन पुत्र होतात. पैकी धाकटा हर्षण एकदा कौतुकाने त्याच्या मामाच्या घरी म्हणजे यमलोकी जातो. तेव्हा तेथे तो अनेकांना दुःखी व अनंत यातना भोगतांना पाहतो आणि यमाला विचारतो की, ‘यांनी असे काय केले आहे की, हे येथे दुःखाग्नित होरपळत आहेत?’ तेव्हा यमाने सांगितले की,‘हे यांच्या कर्माची फळे भोगत आहेत. या लोकांनी मदांध होऊन पापाचरण केले. त्याची फळे भोगत आहेत.’ असे यमाने सांगताच हर्षण म्हणतो की,‘हे सर्व माझ्या वाट्याला येवू नये म्हणून मी काय करावे?’

तेव्हा यम म्हणे हे हर्षणा। तू गोदावरीच्या करी स्नाना।

आराधून उमारमणा। म्हणजे हे टळेल।।

यमाचे ऐकिले वचन। सपरिवार हर्षण।

भद्रतीर्थी येवून। स्नान करी गोदेचे।।

तेणे अवघ्यांचे भद्र झाले। म्हणून ते भद्रतीर्थ भले।

हर्षणासह अवघे गेले। अंती वैकुंठपुरीते।।

हे तीर्थ तैलंगणात। रामभद्राचल नामे सत्य।

तेथे जन्मला संतभक्त। कवि नाभाजी विबुध हो।।

पुढे जटायु आणि संपाती या दोन पक्षीकुळातील भावांची कथा येते. एकदा हे दोघे उंच उडण्याची स्पर्धा लावतात व एकमेकांना मागे टाकण्याच्या नादात सूर्याच्या खुप जवळ जातात. परिणामी त्यांचे पंख होरपळतात आणि ते उभयता एका पर्वतावर येवून पडतात. ही त्यांची अवस्था गरुड आणि अरुण पाहतात तेव्हा अरुण गरुडाला म्हणतो की,‘तु विष्णुंना सांगून जटायुला वाचव आणि मी भास्कराला सांगून संपातीला वाचवण्याचा प्रयत्न करतो’ असे म्हणून दोघेही आपआपल्या आराध्यांना शरण जातात. तेव्हा सूर्य आणि विष्णू अरूण आणि गरुडाला सांगतात की, त्यांनी जटायु-संपातीला घेऊन गोदेकाठी यावे. असे सर्वजण गौतमीकडे येतात. जटायु-संपातीला गोदाजलाने स्नान घातले जाते आणि आश्चर्य म्हणजे त्या उभतांचे पंख पूर्ववत होतात.

हे कृत्य झाले जेथ। तेच नारदा पतत्री-तीर्थ।

हे धर्मपुरीच्या सन्निध सत्य। आहे विबुधहो तैलंगणी।।

या  तीर्थी केल्या स्नान। अवयव लुळे असल्या जाण।

तेच बलवान संपन्न। होतील हो निःसंशय।।

या धर्मपुरी माझारी। सिंहासनी नरहरि।

बैसला करावया दुरी। त्रिताप शरणागताचे।। 

असे पतत्री-तीर्थाचे माहात्म्य सांगून पुढील कथेला प्रारंभ होतो. एका वेदविद्यासंपन्न ब्राह्मणाला आसंदिव’नामक रुपगुणसंपन्न पुत्र असतो. हा मुलगा विवाहयोग्य होताच त्याला ठिकठिकाणाहून विवाहासाठी स्थळे येतात. त्याच वेळी ‘कंकालिनी’ नावाची राक्षसी विचारांची स्त्री त्याचे म्हणजे आसंदिवाचे अपहरण करते आणि त्याला तैलंगाणात घेऊन येते. गौतमीतटीचा हा भाग साळीच्या पिकामुळे लक्ष्मीसंपन्न असतो. तेथे याला आणून कंकालिनी म्हणते की,‘मी तुला पुत्र म्हणून येथे आणले आहे. लवकरच एखाद्या सुयोग्य कन्येशी तुझा विवाह लावून देईन.’ धर्मपरायण पित्याचा पुत्र असल्याने आसंदिव या भोगाने भरलेल्या वातावरणात दुःखी असतो. काही दिवसात एका सुस्वरुप ब्राह्मण कन्येशी त्याचा विवाह लावून देण्यात येतो. तरीही त्याची अस्वस्थता काही कमी होत नाही. एकदा एकांत पाहून त्याची नवपरिणित वधू त्याला त्याच्या अस्वस्थतेचे कारण विचारते. तेव्हा तो सांगतो की, तो अशा राक्षसी वातावरणात सुखी राहू शकत नाही. तेव्हा ती पत्नी म्हणते की,‘या तेलंगाणात अशा वृत्तीचे खुप लोक आहेत पण, आपण गौतमीतटी विष्णूंची आराधना केली तर ते आपले काही बिघडवू शकणार नाहीत!’ तेव्हा त्याने पत्नीचे मानले आणि गौतमीतटी राहून विष्णू-आराधना केली तेव्हा आपोआपच कंकालिनी त्यांच्या आयुष्यातून दूर गेली.

ही कथा झाली जेथ। ते विप्रनारायण तीर्थ।

नारायण धर्मपुरीत। नरसिंहरुपे राहिले।।

या विप्रनारायणतीर्थी। स्नान केल्या निश्चिती।

अवघी चिंता त्वरित गती। जाय विलयाकारणे।।

आता ‘अभिष्ठुत’ नामक राजाने जो हयमेध यज्ञ केला ती कथा येते. या यज्ञात वसिष्ठ-वामदेवादि मंडळींनी भाग घेतल्याचे सांगतात. यज्ञाच्या नियमानुसार यज्ञभूमीची आखणी ही क्षत्रियांनीच करायची असते. या हयमेध यज्ञाच्या भूमीची आखणी स्वतः सूर्यदेव करतात आणि यज्ञ सुरू होतो. या यज्ञात ब्राह्मणवेष धारण करून दैत्य येवून बसले. हे कारस्थान सूर्याचा जावई विश्वरुप याने ओळखले आणि ऋषीवरांना सांगितले. ऋषींनी अभिमंत्रित केलेले दर्भ त्या देत्यांवर फेकताच त्यांचे हनन होऊ लागले. यमानेही त्यांना याकामी सहकार्य केले आणि हयमेध यज्ञ पूर्णत्वास गेला. हे सर्व ज्या ठिकाणी घडले ते म्हणजे…

               भानुतीर्थ मन्युतीर्थ। त्वष्ट्रतीर्थ यमतीर्थ।

      इंद्रतीर्थ ऐशी बहुत। तीर्थे नारदा ते ठायी।। 

आणि ही तीर्थे धर्मपुरीच्या पूर्वेस असल्याचे सांगतात..

पुढे गौतमीच्या दक्षिणतटी असलेल्या व्याधतीर्थाविषयी जाणून घेऊ. या ठिकाणी आदिकेश महादेवाचे स्थान आहे. या आदिकेश शिवलिंगाचे पूजन करण्यासाठी रोज एक व्याध (शिकारी,पारधी,भिल्ल) येत होता. मनापासून शिवाला पूजत होता. याच ठिकाणी वेद नावाचा सुसंस्कारी ब्राह्मणही शिवपूजनास येत असे. तो भल्या पहाटे गोदाजलात स्नान करी, सुर्योदयास ब्रह्मकर्मे करी. मग शिवपूजन करून रुद्र म्हणून अभिषेक करी आणि धूप-दीप-कर्पूरार्ती-नैवेद्य असे षोडशोपचारे पूजन करी आणि शिवास नमस्कार करून निघून जाई, पुढे भरदुपारी व्याध पूजनास येई. मनोभावे गोदास्नान करी. अत्यंत गरीब असल्याने महादेवांवर अभिषेक करण्यासाठी त्याच्याकडे पात्रही नसे त्यामुळे तो तोंडात गुळणी पकडून नेई आणि महादेवाला स्नान घालून शिकार करून आणलेल्या मांसाचा नैवेद्य दाखवी. हा त्याचा नित्यक्रम होता! कसे कोण जाणे पण वेदने हे सर्व पाहिले आणि त्याहून पुढचे आश्चर्य म्हणजे आदिकेश शिवलिंगाला व्याधाशी बोलतांना त्याने पाहिले त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकी गेली. त्याने व्याधाला जावू दिले आणि एक भलामोठा धोंडा घेऊन शिवलिंगासमोर येवून आकांडतांडव करु लागला. म्हणाला…

हे आदिकेशा ईश्वरा। तू मनाचा कपटी खरा।

व्याध अभक्त असून पुरा। तुझी कृपा त्यावर का?।।

याचे सांग कारण। नातरी हा पाषाण।

तुझ्या डोक्यात घालीन। सत्य सत्य त्रिवाचा।। 

हे ऐकल्यावर आदिकेश भगवान शांतपणे म्हणतो,‘उद्या व्याध येवून गेला की, माझ्यावर धोंडा टाक!’ वेद पाय आपटत निघून जातो. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे पूजेस येतो तेव्हा पहातो तर शिवलिंगातून रक्त वाहात असते. वेदविप्र खुप पाणी आणून ओततो पण रक्त काही थांबत नाही. तेव्हा तो महादेवाला म्हणतो,‘देवा तुझी करणी तूच जाणे.’ असे म्हणून नित्याप्रमाणे पूजा करून निघून जातो. त्यानंतर…

काही वेळ गेल्यावरी। व्याध आला मंदिरी।

खोक पाहुनी शिवाच्या शिरी। परम दुःखी जाहला।।

आणि मुखे म्हणे मजकारण। आता काय करणे वाचून।

माझा जे हे लिंग पंचप्राण। तेच फोडिले कुणीतरी।।

यापेक्षा मरून जावे। पण हे शिवाचे हाल न पहावे।

हेच मला वाटते बरवे। अन्य युक्ती न या आता।। 

आणि असे म्हणून व्याधाने स्वतःकडील शस्त्राने स्वतःवर वार केले आणि भूमीवर कोसळला. हे सर्व वेद पहात होता तोच शिवलिंगातून शिव प्रकट झाला आणि वेदाला म्हणाला,‘पाहिलीस याची भक्ती? मी भावाचा भूकेला आहे जो याच्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही!’ शिवाने नेत्रकटाक्ष टाकताच व्याध जिवंत होतो. भगवान आदिकेश त्याला हवे ते मागण्यास सांगतात तेव्हा तो शिवाचे विस्मरण कधीही न होण्याचे वरदान मागतो आणि वेदही खरी भक्ती समजून घेतो. असे व्याधतीर्थाचे महिमान सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

– मधुमालती जोशी

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.