संत दासगणु महाराजांची शुक्रवार, आज दीडशेवी जयंती. यानिमित्त मधुमालती जोशी, कोपरगाव या आपल्याला संत दासगणु कोण होते याची माहिती या लेखातून करून देणार आहेत.

गोदाप्रेमी-गोदाभक्त-गोदापूत्र : संतकवी दासगणु महाराज

बंधु-भगिनीनोआज पौष शुद्ध एकादशी! गोदामाईवर निस्सिम प्रेम करणाऱ्या आणि तिचे माहात्म्य पहिल्यांदा मराठीत सांगणाऱ्या श्री संत दासगणु महाराजांची आज दीडशेवी जयंती! आपल्या महाराष्ट्राला थोर संतपरपंरा लाभली आहे. ज्ञानेश्वर माऊलीपासून साईबाबांपर्यंतच्या संतमंडळींनी भक्तीमार्गाची बीजं माणसाच्या मनात रोवली! अशा या संतमंडळींचे संतपण घराघरात पोहोचवणारे संत म्हणजे श्री संत दासगणु महाराज!

अहमदनगरच्या पावन भूमीवर अकोळनेर नावाचे गाव आहे. या अकोळनेरमध्ये एक समृद्ध कुटुंब रहात होतं. आडनाव दाभोळकर. कुटुंब प्रमुखाचे नाव अप्पाजी दाभोळकर‘. यांच्याकडे यांची सावित्री ही लेक बाळांतपणासाठी आली होती. अप्पाजींची ही मुलगी करकुंभच्या एकनाथपंत सहस्त्रबुद्धेंच्या मुलाला म्हणजेच दत्तात्रयला दिलेली होती. अशी ही लाडकी लेक बाळांतपणाला आलेली! ते वर्ष होतं इ.स. १८६८ आणि तो दिवस उगवला. पौष शुद्ध एकादशी! सावित्रीने एका गोड बाळाला जन्म दिला. दोन्ही कुटुंबात आनंदीआनंद! बाराव्या दिवशी बारसं झालं आणि अप्पाजींनी नातवाचे नाव ठेवले नारायण‘!

यथावकाश बाळ-बाळांतींण आपल्या घरी म्हणजे दाभोळकरांकडून सहस्त्रबुद्धेंकडे रवाना झाले. बाळ नारायणाला त्याच्या आजोबांनी म्हणजे एकनाथपंतांनीं पाहिले आणि ते म्हणाले, बाळाचे कान गणपतीसारखे आहेत. पोटही गणपतीसारखेच आहे. त्यामुळे त्याचे नाव नारायण ऐवजी गणपतीच बरे! अशा प्रकारे बाळाचे नाव नारायणाचे गणपती. गणपतीचे गणेश आणि गणेशचे “गणु”झाले! पुढील काळात सहस्त्रबुद्धे कुटुंब नगरलाच स्थायिक झाले. गणु नऊ वर्षांचा झाला. त्याची मुंजही झाली. आता त्याने विद्याभ्यास करणे अपेक्षित होते, पण गणुला अभ्यासात अजिबात रुची नव्हती. सावित्रीबाईंना काळजी वाटू लागली. माहेरी अकोळनेरला गेल्यावर त्या त्यांच्या वडिलांमार्फत गणुवर धार्मिक संस्कार करत होत्या पण शालेय अभ्यासात गणुचे मन रमले नाही. जेमतेम इंग्रजी चौथी करून गणुने शाळेला रामराम ठोकला! जरी त्याचे मन शाळेत रमले नाही तरी बुध्दी मात्र अतिशय तल्लख होती. काही लहानमोठी कामे करीत असता तो श्रीगोंद्याला गेला आणि पुढे पोलिसात भरती झाला! त्याचकाळात त्याची ओळख काही शाहीरतमासगीर आदी लोककलावंतांशी झाली आणि त्याच्या मनात आले आपणही अशा रसप्रधान काव्यरचना करू शकतो अन् गणुतील कवी जन्मास आला. त्याच्या रचना लोकांना आवडू लागल्या एकीकडे पोलिस खात्याची कठोर नोकरी आणि दुसरीकडे कविकडे आवश्यक असणारे हळवे मनदोन्ही गोष्टी तो मनःपूर्वक सांभाळत होता.

१८९६ उजाडले ते पोलिस शिपाई गणेश सहस्त्रबुद्धेंच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठीच! मद्रासमध्ये मोठ्या हुद्यावर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले वामनशास्त्री इस्लामपूरकर‘ श्रीगोंद्यास काही संस्कृत दस्तऐवज शोधण्यासाठी आले. त्यांचा आणि सहस्त्रबुद्धेंचा जवळून संबंध आला. वामनशास्त्रींचे नामजप करते वेळीचे भक्तीरसांत डुंबून जाणे गणेशांच्या अंतःकरणावर संस्कार करते झाले आणि त्यांनी शास्त्रींचे पाय धरले आणि त्यांच्याकडे अनुग्रह मागितला! वामनशास्त्रींना हे सर्व अनपेक्षित होते पण गणेशांची योग्यता पाहून त्यांनी त्यांना शिवमंत्राचा उपदेश दिला आणि वर्षातून किमान एकदा पंढरपूरी पांडुरंगाचे दर्शनासाठी जाण्याचे वचन घेतले!

एके दिवशी वामनशास्त्रींनी गणेशांना बोलावून घेतले आणि सांगितले,‘आता मला काशीला जायचे आहे तेव्हा तु शिर्डीला जा. तेथे साईबाबा आहेत ते माझेच रुप आहे असे समज’ गणेश काय समजायचे ते समजले आणि जड अंतःकरणाने गुरुवर्यांना निरोप दिला. त्यानंतर त्यांनी शिर्डी गाठली.

जेव्हा ते साईंसमोर उभे राहिले तेव्हा साईबाबांनी त्यांना गणु‘ अशी हाक मारली आणि त्या दिवसापासून गणेश सहस्त्रबुद्धे दासगणु‘ झाले. स्वतःची नोकरी सांभाळत ते वारंवार साईचरणाजवळ येत. दरम्यानच्या काळात नारायण रानडे यांची कन्या सरस्वतीशी ते विवाहबध्दही झाले होते. अशी तिहेरी कसरत करीत त्यांच्यातील कवी अभंग रचना करु लागला. ज्ञानेश्वरतुकारामसावतामाळीनामदेवएकनाथ इत्यादी अनेक संतांवर आख्याने रचून सादर करू लागला. लोक त्यांची रसाळवाणी ऐकू लागले. पुढे साईबाबांच्या प्रेरणेने त्यांनी शेगावच्या गजानन महाराजांचे चरित्र लिहिले जे आजही घराघरात वाचले जाते. कुठलाही विषय ते पूर्ण अभ्यासल्याशिवाय लिहीत नसत. त्यामुळे त्यांचे लेखन जनमानसाच्या जवळ जाई! पुढील काळात संत साईबाबांनी त्यांना नोकरी सोडून नांदेड येथे स्थायिक व्हायला लावले. दासगणु महाराजांचे गोदामाईवर विशेष प्रेम असल्याने त्यांनी नगर जिल्हा सोडावा लागल्याचे दुःख बाजूला ठेवले कारण जितकी गोदामाई जिव्हाळ्याची तितकाच नगर जिल्हाही जिव्हाळ्याचा! अहिल्याबाई आख्यानात एक ठिकाणी ते अहमदनगर जिल्ह्याची महती गातांना म्हणतात.

वा तो जिल्हा गमत प्रतिमा साच शंकराची।

एकलाचि जगती न च योग्यता हो तयाचि।।

दुर्भिक्षाचि धवल-विभूति विष दुष्काळ कंठा।

शीर्षी गंगा शिवद सकला नाही नाही करंटा।।

हे जे शीर्षी गंगा’ म्हटलयं ते अर्थातच गोदामाईला उद्देशून म्हटलयं! शिर्डीला असताना महाराज पुणतांबा किंवा कोपरगाव यापैकी जमेल तिथे गोदास्नानासाठी येत.

१९१८…दसरा दोन दिवसावरमहाराज पंढरपूरला होते आणि पहाटे दृष्टान्त झाला… साईबाबा बोलावतायेत… म्हणतायेत, ‘मशिद ढासळतेय… खुप फुलं घेऊन येमहाराज हादरले… मिळेल त्या साधनाने शिर्डी गाठली… बाबांच्या भोवती रडारड सुरू होती… त्यासाठीच तर फुलं मागवली ना!! आता कळत होते नांदेडला का पाठवले ते… बुद्धीला सर्वकाही कळत होते पण, मनाला काही समजूनच घ्यायचे नव्हते! अशा अशांत मनाची समजूत घालायला केवळ एकच शक्ती अस्तित्वात होती…. गोदामाई! मग काय?

महर्षी व्यासरचित ब्रम्हपुराण उघडले आणि गौतमी-गोदामाईकडे गुरूवियोगाचे दुःख पचविण्याची शक्ती मागितली! आता रात्रंदिवस अभ्यास सुरू झाला गौतमी-गोदावरीचातिच्या काठच्या कथांचा… इतिहासाचा… पण फक्त पुस्तकी अभ्यासाने थांबतील तर ते श्री संत दासगणु महाराज कोणतेगोदामाईचे वर्तमान जाणून घेण्यासाठी त्यांनी गोदा-परिक्रमा आखली आणि ब्रम्हपुराणात अडकून बसलेली गोदामाई गोदामहात्म्यच्या माध्यमातून वाहती केली!

।। श्री गोदार्पणमस्तु।।

(संत दासगणु महाराज यांनी लिहिलेल्या गोदामाहात्म्यातील अध्याय शनिवारपासून दररोज वाचयला मिळतील.)

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.