आजपासून आपण गोदामहात्म्यच्या निमित्ताने रोज भेटणार आहोत. ‘गोदामाहात्म्य’ नावावरुनच कळते की, हे गोदामाईचे माहात्म्य किंवा महत्त्व सांगितले असावे. मात्र त्याची रचना ही पद्यात्मक किंवा पोथी स्वरूपात आहे. त्यामुळे हे धार्मिक साहित्यही वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुद्धिवादी माणूस या साहित्याला धार्मिक समजून यापासून दूर गेलेला दिसतो पण गोदामाहात्म्य तसे नाही. संत दासगणुंनी एका वेगळ्या अंगाने याची मांडणी केली आहे. त्यामुळे त्याला समजून घेण्याची गरज आहे. म्हणूनच आजपासून आपण एका विशिष्ट दृष्टिकोनातून गोदामाहात्म्य अनुभवणार आहोत.
संत दासगणु महाराजांनी लिहीलेले ‘साईचरित्र’ किंवा ‘गजाननविजय’ घराघरात पोहोचले कारण लोकांनी ते पुण्यप्राप्ती किंवा मनोकामना पूर्तीसाठी वाचले पण त्यात उपरोक्त संतांचा जीवनपटच साकारलेला होता. तसेच गोदामहात्म्यात गोदेकाठचे पौराणिक संदर्भ, ऐतिहासिक घटना आणि तत्कालीन वर्तमान इ. चा सामावेश आहे.पौराणिक कथा रुपकात्मक पध्दतीने सांगितलेल्या असतात. ती रुपके उलगडण्याचा प्रयत्न करु आणि दासगणु महाराजांकडून हेही शिकण्याचा प्रयत्न करु की,माणसाचे नदीवर किती पराकोटीचे प्रेम असले पाहिजे. त्याचा नद्यांशी, निसर्गाशी कसे घट्ट नाते असले पाहीजे!
पहिला अध्याय
संत दासगणुंनी गोदामाहात्म्यात अध्यायाच्या सुरूवातीस सर्व देवांना नमस्कार केलेला आहे. त्यात सर्वप्रथम गणपती व नंतर अनुक्रमे सरस्वती, गुरुवर्य, गोदामाई, ब्रम्हा,विष्णु, महेश इत्यादींना नमस्कार केला आहे. त्यानंतर याच देवांना ‘हे गौतमीमाहात्म्य पूर्णत्वास जावे’ म्हणून आशीर्वाद मागितले आहे आणि जरी या दैवीशक्तींना वेगवेगळ्या नावाने पुकारले असले तरीही त्या एकच आहेत हेही सांगितले आहे. या ओळी पहा…
ब्रम्हा होऊन सृष्टी रचिसी। रुद्र होऊन संहारिसी।
विष्णु होऊन प्रतिपाळिसी। तूच ब्रम्हांडाकारण।।
यावरून स्पष्टपणे दिसते की, आमची संतमंडळी हेच मानतात की, ‘ईश्वर एकच आहे’ पण तो कार्य वेगवेगळी करतो आणि त्याप्रमाणे वेगवेगळी नावे धारण करतो. पुढे महादेवाला आवाहन करताना महाराज म्हणतात की,
जी पतितपावन गोदावरी। त्वा धारण केली निजशिरी।
जी गौतमाने भूमीवरी । जगदुध्दा
महात्म्य त्या गौतमीचे। मी ये ग्रंथी वर्णीन साचे।
हे कोड माझ्या मनीचे। आपण पूर्ण करावे।।
येथे महाराजांनी स्वतःची इच्छा पूर्ण करण्याची मागणी महादेवांकडे केली आहे. नंतर दत्तात्रय, महालक्ष्मी, तुळजाभवानी, दुर्गा इ. स्वरूपात ईश्वराला पुकारले आहे. आता पुढे ते ग्रंथाची ओळख करुन देत आहेत.
हे गोदामाहात्म्य अगोदर ब्रम्हपुराणात महर्षी व्यासांनी सांगितले आहे. महर्षी व्यासांनी अठरा पुराणे सांगितली आहेत. त्यापैकी एक ब्रम्हपुराण आहे. पुराणे ही संवादात्मक असतात म्हणजे कुणा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकाला प्रश्न विचारून मिळवलेली उत्तरे पुराणकर्ता आपल्याला सांगत असतो. येथेही असेच आहे. शौनक ऋषींनी सुतऋषींना ‘महातीर्थ’ कोणते ते सांगा असा प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल सुतऋषी ब्रम्हदेव आणि नारद यांच्यातील संवाद सांगत आहेत, ते म्हणतात..
ऐसे ऐकता म्हणती सुत। ऐका तुम्ही ऋषी समस्त।
तीर्थात तीर्थ विख्यात। गौतमी गंगा गोदावरी।।
या गोदेचे महिमान। ब्रम्हदेवे कथन ।
निजपुत्र नारदा लागून। ते मी तुम्हा सांगतो।।
म्हणजेच ब्रम्हदेव-नारद संवाद, पुढे सुत-शौनकऋषी संवाद, ब्रम्हपुराणात महर्षी व्यासांनी सांगितला. त्यात वर्तमानाची भर घालून दासगणु महाराजांनी सांगितला! आता पुढे नारद ब्रम्हदेवांना विचारतायेत की, ‘पृथ्वीलोकावर किती तीर्थक्षेत्रे आहेत हे मला सांगा’. ब्रम्हदेव म्हणतात,
ब्रम्हा बोले त्यावर। तीर्थाचे ते प्रकार चार।
दैवी राक्षसी साचार।ऋषिज आणि मानवी।।
अर्थात काही तीर्थक्षेत्रे ही देवनिर्मित आहेत. काही राक्षस निर्मित आहेत तर काही ऋषीनिर्मित आहेत तर काही मनुष्यनिर्मित आहेत. गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती आदी तीर्थे उत्तरेकडील आहेत तर तापी, पयोष्णी, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी आदी दक्षिणेकडील तीर्थे आहेत. ब्रम्हपुराण इतकेच सांगतेय, पण महाराजांची लेखणी पहा काय म्हणतेय…
या अवघ्या तीर्थात। गोदावरी श्रेष्ठ सत्य।
जैसे सुंगधी पारिजात। वा कोहिनूर हि-यामध्ये।।
…..हे आहे या गोदापुत्राचे प्रेम!
पुढे महाराज देवतीर्थे सांगताना म्हणतात, ‘अयोध्या, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी आणि पंढरपूर, बारा ज्योतिर्लिंगे ही देवक्षेत्रे आहेत. तसेच गया, प्रभास, पुष्कर,कोल्हापूर, लोणार ही असुरक्षेत्रे आहेत.
पुढे ते म्हणातात, भार्गव, अत्रि, अगस्ती, गौतम, कौंडिण्य, वसिष्ठ इत्यादी ऋषींनी जेथे निवास केला ती ऋषीक्षेत्रे आणि शृंगेरी, उडुपी, नाथद्वारा, मळखेड, आळंदी, देहू,तेर, मंगळवेढे, सज्जनगड, डोमगाव, पैठण, शिर्डी ही सारी मानवक्षेत्रे आहेत! ही माहिती ब्रम्हपुराणात नसल्याचे पुढील ओवीत सांगतात.
या क्षेत्रांच्या नावाचा। ब्रम्हपुराणी न उल्लेख साचा।
परी अर्थानुरोधे तयाचा। मी हा उल्लेख केला असे।।
आणि येथे हा अध्याय थांबतो. पुढील अध्यायात गंगावतरण सांगतो, असे महाराज म्हणतात.
उद्या आपण दुसऱ्या अध्यायासह भेटूच!
– मधुमालती जोशी, लेखिका
Awesome