संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठ्ठावीस आणि एकोणतीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजच्या अध्यायाची सुरुवात चक्षुतीर्थाने होते. वृद्धकौशिक ऋषींचा गौतम नामक पुत्र असतो. ऋषीपुत्र असुनही त्याच्या जीवनात धर्मश्रध्देला जराही स्थान नसते. त्याचा मणिकुंडल नावाचा एक वैश्यकुलीन मित्र होता. ऋषीपुत्र गौतमाची अशी धारणा होती की, जो धर्मपालन करतो त्याच्याकडे लक्ष्मी जातच नाही. अधार्मिक माणूसच धनवान होऊ शकतो. त्याउलट वैश्यपुत्र मणिकुंडल म्हणे, अधर्माने लक्ष्मी येत नाही आणि चुकून आली तर ती नाश पावते. दोन्ही मित्र आपआपल्या मुद्यावर ठाम होते. अखेर दोघेही स्वतःच्या तत्त्वांसह द्रव्यार्जन करायला निघाले.

मणिकुंडल वैश्य असल्याने द्रव्य मिळविण्यात यशस्वी होत होता, तेच धन गौतम त्याच्याकडून कपटाने मिळवत होता. दिवसेंदिवस गौतम इतका हीन झाला की, त्याने ईर्षेपोटी मणिकुंडलाचे दोन्ही डोळे फोडले, एक हात तोडला आणि सर्व धन घेऊन पसार झाला. मणिकुंडल असाच अरण्यात भटकत राहिला. तोच एका शुद्ध पक्षाच्या एकादशीला बिभिषण आपल्या सुहृदांबरोबर शिवपूजन करण्यासाठी त्याच अरण्यात आला. त्याला मणिकुंडलाची हकीकत कळली. बिभिषणाने त्याला धीर देऊन म्हटले, ‘चल माझ्याबरोबर!या पर्वतावर, पहा मी काय करतो!’ मणिकुंडलाला पर्वतावर नेऊन बिभिषणाने एक औषधी वनस्पती उगाळून लावली आणि त्याचे नेत्र व हात दोन्ही पूर्ववत झाले. त्याने ईश्वराचे आणि बिभिषणाचे खूप आभार मानले आणि तेथून निघाला. ते महाबल राजाचे राज्य होते. या महाबलाची तरुण कन्या अंध होती. मणिकुंडल राजाला म्हणाला की,‘मी तुझ्या कन्येचे नेत्र ठीक करु शकतो.’ त्याने ती वनस्पती कुणालाही उपयोगी पडेल म्हणून जवळ ठेवलीच होती.

त्वरित उगाळून राजकन्येच्या नेत्रांना लावताच तिला दृष्टी आली. महाबल राजाने आपली कन्या राजासह मणिकुंडलास दिली. तेव्हा त्याला वाटले की, धर्माच्या मार्गावर चालल्यावर काय होते हे गौतमाला सांगायला हवे. इकडे गौतम सर्व धन जुगारात हरला होता आणि दीनवाणे भटकत असता त्याला मणिकुंडल भेटला. तेव्हा गौतमाने त्याची माफी मागितली आणि स्वतःची चूक कबूल केली तसेच धर्ममार्गाचे श्रेष्ठत्वही मान्य केले आणि आत्तापर्यंत झालेल्या पापाचे क्षालन कसे होईल, असे विचारले असता मणिकुंडल त्याला गौतमीतीरी घेऊन आला आणि अर्थातच माईने त्याला शुद्ध  केले.

हे कृत्य झाले जेथ। तेच नारदा चक्षुतीर्थ।

मृतसंजीवनी तेथ। तीर्थ दुसरे असे की।।

हे राजमहेंद्रीच्या सान्निध्यासी। आहे निबिडतर कांतारासी।

येथे स्नानकर्त्यासी। महा पुण्य लाभतसे।।

आता उर्वशीतीर्थाची कथा येते. एक प्रमति नावाचा शूर, वीर, पराक्रमी आणि सत्यप्रतिज्ञ राजा असतो. त्याने आठही दिशांना विजय मिळवलेला असतो. त्यामुळे पृथ्वीवर त्याच्या नावाचा दबदबा असतो. असा हा सर्वगुणसंपन्न राजा एकदा इंद्रलोकी गेला तेव्हा इंद्र द्युतक्रिडेत मग्न होता. त्याने राजाला पाहिले, त्याचे आदरातिथ्य केले आणि द्युत खेळण्यासाठी राजाचे मन वळविले. त्याला उर्वशीबरोबर द्युत खेळायला बसविले आणि सांगितले की, दोघांपैकी जो हरेल त्याने दुसऱ्याचे दास्यत्व पत्करायचे! दोघांनी ते मान्य करून खेळायला सुरुवात केली आणि राजा प्रमति जिंकला, उर्वशी हरली. ठरल्याप्रमाणे ती राजाचे दास्यत्व पत्करणार तेथे हजर असलेला गंधर्वांचा राजा चित्रसेन भडकला. स्वर्गीय उर्वशीचे हरणे चित्रसेनाला आवडले नाही. त्याने प्रमतिला द्युतासाठी आव्हान दिले. पुन्हा खेळ सुरु. शर्त तीच… आणि यावेळी प्रमति हरला. चित्रसेनाने प्रमतिला बंदी बनवून गंधर्वलोकी नेले. इकडे राजा प्रमतिचा मुलगा सुमति आपल्या पित्याला शोधत होता. तेव्हा त्याची भेट विश्वामित्रांच्या मुलाशी म्हणजे मधुच्छंदाशी झाली. त्रिकालज्ञानी मधुच्छंदाला त्याने आपल्या पित्याविषयी विचारले, तेव्हा त्याने राजा प्रमति गंधर्वलोकी बंदिवासात असल्याचे सांगितले, यावर सुमति म्हणाला की, ‘माझ्या पित्याला सोडविण्यासाठी काय करावे लागेल?’ तेव्हा तो ऋषीपुत्र म्हणाला,

त्याची मुक्तता होण्यासाठी। त्वा जावे गौतमीतटी।

तेथे विष्णू आणि घूर्जटी। प्रसन्न करून घेई तपे।।

म्हणजे हरिहरप्रसादे करून। पिता होईल मुक्त जाण।

आणि तूही होशील उत्तीर्ण। पितृऋणामधूनी।।

आणि मधुच्छंदाने सांगितले. तसेच सुमतिने केले. हरिहरांनी राजा प्रमतिला गंधर्वलोकीहून सोडवून आणले आणि पुन्हा राज्यावर बसविले.

ही गोष्ट झाली जेथ। ते हे नारदा उर्वशीतीर्थ।

येथेच आहे सांप्रत। पुरी राजमहेंद्री।

महेंद्राची महेंद्री। उर्वशी अप्सरा एक खरी।

ती राजासह गोदातीरी। गेली असे उध्दरुन।।

म्हणून या शहराप्रत। राजमहेंद्री म्हणतात।

येथे स्नान केल्या गोदेत। गतवैभव प्राप्त होई।।

 

असे सांगून जाताजाता हेही सांगितले की, याच राजमहेंद्रीत विष्णुशर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्याला वैश्यकन्या कनकेश्वरी बरोबर विवाह करण्याची इच्छा होती, पण आपल्या ज्ञातीचा मान म्हणून कनकेश्वरीने कुंडात उडी टाकून वैश्यधर्माचे पालन केले, असा वैश्य पुराणात उल्लेख आहे. शिवाय कनकेश्वरीला कोमटी लोक आदिमाता मानतात, असा उल्लेख आहे.

 

आता हा अध्याय येथे थांबतो पण आपण येथे न थांबता पुढील अध्यायाला नमस्कार करु.. एकोणतीसाव्वा अध्याय आपल्याला थेट समुद्रसंगमी नेतोय म्हणजेच आपण कळसाध्यायाच्या दिशेने निघालोय. गोदामाई समुद्रसंगमी पोहोचणार आहे. त्यामुळे समुद्राला आनंदाने भरती आलेली आहे. तो आईसाहेबांना सामोरे जाण्यासाठी बराच पुढे आलेला आहे. आता तो आईसाहेबांचे स्वागत कसे करेल. याप्रसंगी नक्की त्याला काय वाटतयं हे दासगणु महाराज सांगतायेत. संतकवी दासगणु महाराज सच्चे गोदापुत्र आहेत. समुद्राच्या भावना या दासगणु महाराजाच्या भावना आहेत. समुद्रातर्फे महाराज आईच्या स्वागताला उभे आहेत. तेव्हा पुढील ओव्यांचा आहे तशाच स्वरूपात आनंद घेऊ! या ओव्या स्वर्गीय वृक्ष पारिजातकाच्या फुलासारख्या आहेत. पवित्र आणि सुंदर, जलप्रदूषणाच्या काळात सुखेनैव जगणाऱ्या आपल्यासारख्यांनी या ओव्यांना हाताळले तर त्या कोमेजतील, मळतील. म्हणून महाराजांच्या भावनांना जसाच्या तसा नमस्कार करु!

गंगा गौतमी गोदेप्रती। सामोरा आला अंपापति।

सागराच्या आनंद चित्ती। बहुत झाला नारदा।।

सागर म्हणे मी धन्य धन्य। गंगा करावया मज पावन।

आपुल्या पवित्र तोये करून। आली केवढी भाग्य माझे।।

सागर पश्चिमाभिमुख होवोनी। जोडी उभय गंगेस पाणि।

आपल्या मधुर वाणींनी। स्तवन मांडिले तियेचे।।

हे गौतमी गंगे गोदे। विष्णुपादसमुद्भवे।

कल्याणी मानिनी अंबे। तीर्थमाते शुभे शिवे।।

दंडकारण्यवासिनी। पापतापविमोचनी।

सह्याद्रितनये देवी। सर्व सौभाग्यदायिनी।।

चारुशीले चारुगात्रे। वृध्दे मगरवाहिनी।

मंदहास्ये पद्मनेत्रे। कंबुकंठे सुभाषिणी।।

सर्ववंद्ये सुसलिले। मुनिगौतमप्रार्थिते।

महाराष्ट्रस्थिते भद्रे। शिवमस्तकमंडिते।।

ज्ञानविज्ञान दायिनी। मायामलविनाशके।

क्षमस्व अंब सर्वस्वी। गणू हे लेकरु निके।।

अशी सागराकडून प्रार्थना होताच प्रकट झालेल्या गोदामाईचे वर्णन करतायेत.

ऐसी प्रार्थना करिता क्षणी। गोदा प्रकटली तया स्थानी।

मगरावरी बैसोनी। आली वरती जलाच्या।।

चतुर्भुज मनोहर। मुख जेवी रोहिणीवर।

परिधान केले अंबर। पीत पैठणी जरीची।।

कुरुळकेश मस्तकावरी। शुकनासिका बिंबाधरी।

रत्नखचित होता करी। कमंडलु तो गोदेच्या।।

अशी नानालंकार परिधान केलेली गोदामाई सागराला म्हणते की,‘हे सागरा तुझा या पृथ्वीवर जयजयकार असो, पण तु असा हात जोडून का उभा आहेस?’ तेव्हा सागर म्हणतो…

तै समुद्र म्हणे गौतमीसी। तू स्वर्गातून महीसी।

आलीस पापाब्धि उध्दारावयासी। म्हणून सामोरा आलो तुज।।

मलाही करा पावन। आपुल्या पवित्र सलिले करुन।

म्हणजे माझे मोठेपण। कायम राहील महीवरी।।

मी नाना रत्नी मंडित। मी लक्ष्मीचा जनक सत्य।।

परी तीर्थपति या नावाप्रत। पावेन तुझ्या जलाने।।

गंगे पवित्रपणाची। माझ्या ठायी उणीव साची।

पूर्तता कराया तयाची। आहे तुझी अपेक्षा।।

पवित्रतेवाचून। हे माझे मोठेपण।

जेवी विगतधवेचे वदन। अशुभ एका कुंकवामुळे।।

यास्तव हे गोदावरी। आपण चलावे माझे घरी।

नृपागमने झोपडी खरी। समत्व पावे महालाचे।।

गंगे माझे हीनपण। तुला न होय बाधक जाण।

जेवी अहिभस्मकौपिन। शिवा न आणिती लघुत्व।।

मात्र एक्याच ओघांनी। त्वा न यावे मम सदनी।

का की तो माझ्याच्यांनी। सहन गोदे न करवेल।।

धारारूपे वर्षे धन। म्हणून मही ला होत सहन।

तोच एकवटून। पडल्या नाश महीचा।।

म्हणून गंगे प्रार्थना। केली मी ही आणी मना।

बहुत मुखांनी माझ्या सदना। यावे आपण मातुःश्री।।

असे सागराकडून स्वागत झाल्यावर गोदामाई म्हणते, ‘जा! सप्तऋषींना सहकुटुंब घेऊन ये!’   आणि समुद्र सप्तऋषींना सहकुटुंब घेऊन येतो आणि मग सप्तर्षी सहकुंटुंब गोदामाईचे पूजन करतात. त्यावेळी महर्षी वसिष्ठ विनोदाने माईला म्हणतात की,‘माई,तुझे फक्त गौतमांवरच प्रेम आहे म्हणून तू त्यांचे नाव धारण केलेस.’ त्यावर गोदामाईने दिलेले उत्तर जिज्ञासूंनी जरुर वाचावे म्हणजे दासगणु महाराजांचे दृष्टेपण माहीत होईल. त्यांनी गोदावरी नदी आणि तिच्या काठी नांदणारी संस्कृती यांतील साम्य सांगितले आहे. त्याचबरोबर भविष्यातील मानव (आजच्या काळातील) जातीभेद, वर्णभेद यांच्या विळख्यात अडकला तर एवढ्या मोठ्या, भव्य नदीकाठी राहूनही कोरडाच राहील म्हणून बाकी काही होवो पण, सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असे बजावत आहेत. असो!

आता गोदामाई सप्तधारात विभागली जाणार आहे तेव्हा तो वृत्तांत पाहू…

गोदा सप्तमुखी पाहूनी। ऋषी आनंदले मनी।

नारदा त्या पवित्र स्थानी। यज्ञ त्यांनी आरंभिला।।

नारदा वसिष्ठ-गोदावरी। दक्षिणेचा ओघ निर्धारी।

विश्वामित्र-गोदावरी। म्हणती उत्तरेच्या ओघास।।

मुख्य गौतम-गोदावरी। ती अवघ्यांच्या मध्यंतरी।

जेवी अवघ्या भूषणामाझारी। वैजयंती कंठी असे।।

हे तीन ओघ सांगितले। आता उर्वरित चार राहिले।

तेही ऐक सांगतो वहिले। मुनिसत्तमा नारदा।

भरद्वाज गोदावरी जमदग्नि गोदावरी।

वामदेव गोदावरी अत्रि गोदावरी।

हे सप्तओघ निर्धारी। झाले एका गोदेचे।।

येथे सर्व ऋषींनी एका महान यज्ञाचे आयोजन केले. तेथे विश्वरुप नावाचा राक्षसकुलीन पण स्वतः सभ्य असलेला मानव आला. त्याने ऋषींना सांगितले की, त्याला बलवान पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. त्यासाठी त्याने तपाचरण केले पण उपयोग झाला नाही. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्याला त्याच्या जटांचे हवन करून भीमेश्वराचे दर्शन घेण्यास लावले आणि भविष्यात त्याची इच्छा पूर्ण झाली. गोदामाई जिथे सप्तधारांत विभाजित झाली तेच सामुद्रतीर्थ!

आज येथेच थांबून उद्या माईसोबतच पूर्वसागरी जावू.. तेव्हा उद्या भेटूच!!

– मधुमालती जोशी

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.