संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या बाराव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

काल आपण दारणासंगमापर्यंत आलो होतो. तेव्हा आज गोदामाई आणि महाराजांसह पुढचा प्रवास सुरू करूयात. आता श्वेततीर्थाची कथा पाहू!

ब्रम्हदेव म्हणे नारदांसी। आता श्वेततीर्थ परियेसी। गौतमीच्या उत्तर तटाकासी। विप्र एक राहत असे।।
नाम जयाचे असे श्वेत। जो गौतमाचा परम भक्त। सच्चिदानंद उमानाथ। हृदयी ज्याने साठविला।।

अशा या श्वेत ब्राह्मणाच्या आयुष्याचा अंतिम क्षण जवळ आला पण, त्याला नेण्याची हिम्मत काही यमदूत करेना. कारण तो शिवभक्त होता. निसर्ग नियमाप्रमाणे श्वेताचा मृत्यू अटळ होता. म्हणून स्वतः यम त्याला आणण्यास गेला पण, नंदीने त्याला आडवले आणि यम-नंदीचे भांडण जुंपले. नंदीच्या बाजूने कार्तिकेय आणि शिवगण तर यमाच्या बाजूने यमदूत, असे घनघोर युद्ध झाले आणि साक्षात यम मृत्यूमुखी पडला. सूर्यपुत्र यमाचा मृत्यू पाहून सर्व देवता गौतमीतटी दाखल झाले. सर्वांनी महादेवांना आर्त साद घातली की, हे घडले ते सृष्टीच्या नियमाविरुध्द घडले. श्वेतविप्र क्षीणायु झाला म्हणून यमधर्म त्याला नेण्यास आला त्यावर महादेवांनी सांगितले की, जे शिव-विष्णुचे भक्त आहेत त्यांची व्यवस्था मी स्वतः लावेल. यमाने त्यांना हात लावू नये. देवांनी ते मान्य केले! पुढे

हे देवांनी कबूल केले। शिवे नंदीस बोलविले। यमास उठवावया सांगितले। गौतमी जलसिंचने।।

 

आणि अर्थातच यम सचेतन झाला. शंभुमहादेवांना नमस्कार करून स्वस्थानी गेला आणि आता हे श्वेततीर्थ कोठे आहे, हे महाराज आपल्याला सांगतायेत.

या श्वेततीर्थाशेजारी। नांदुर मध्यमेश्वर नगरी। एथे सांप्रत गोदावरी। बंधा-याने आडविलीसे।।

आता दासगणु महाराज पौराणिक कालातून सरळ तत्कालीन वर्तमानात आले आहेत.

श्रोते या बंधा-यामुळे। दुष्काळ भय थोडे निमाले। हे पुण्य कृत्य खचित केले। जनहितास्तव इंग्रजांनी।।

कटोरे करंजगाव चांदोरी। तारु खेरडे माळ साकोरी। ही श्वेततीर्थाच्या संनिध खरी। तीर्थे आहेत पश्चिमेला।। 

आता गोदामाईच्या दक्षिण तीराकडे जावूया

तैसे गोदेच्या दक्षिणतीरी। श्वेततीर्थाच्या पुढारी। करंजी नामे एक नगरी। आहे की विबुध हो।।
या करंजी गावाला। तुकाजी होळकर जन्मा आला। गोदाप्रसादे राजा झाला। इंदुर शहराकारणे।।

 

या तुकोजी होळकरांनी करंजी गावी महादेव मंदिर बांधल्याचे महाराज सांगतात. त्याबरोबरच अहिल्याबाई होळकरांचे गुणगाण करतात.

धन्य धन्य अहिल्याबाई। आता तिच्यासम स्त्री होणे नाही। जिच्या नावाने ठायी ठायी। मूर्ति शिवाच्या स्थापिल्या।।

 

पुढे महाराज…  शुक्रतीर्थाकडे वळतात. अंगिरस आणि भृगु हे दोन ऋषी सर्वविख्यात असे होऊन गेले. अंगिरसाच्या मुलाचे नाव जीव आणि भृगुपुत्राचे नाव शुक्र.भृगुऋषींनी शुक्राला विद्याग्रहणासाठी अंगिरस ऋषींकडे पाठविले. जीव आणि कवी (शुक्राचेच एक नाव) एकत्र अध्ययन करु लागले. पण कवीला असे वाटू लागले की,अंगिरस त्याला नीट शिकवत नाहीत. तेव्हा तो तडक विद्याध्ययनासाठी वृद्ध गौतमाकडे आला.

पण शुक्र अतिशय बुद्धिमान असल्याने वृद्ध गौतमाने त्याला साक्षात महादेवाकडूनच ज्ञान मिळविण्याचे सुचवले. शुक्राने ते मान्य करून गोदामाईच्या उत्तरतटी तपाचरण सुरू केले आणि अर्थातच महादेव प्रसन्न झाले. त्यांनी शुक्राला वर मागण्याचे सांगितले.

शुक्र म्हणाला,

ऐसी विद्या द्यावी मशी। की जी अवगत ना कवणासी। देवऋषी मानवांसी। वा यक्षराक्षसांकारणे।।
तै तथास्तु वदला भगवान। मृतसंजीवनीचे दान। केले शुक्रालागून। गोदातटी सदाशिवे।।
याच विद्येकरुन भला। शुक्र राक्षसा गुरू झाला। हीच विद्या कचाला। शुक्रापासून मिळाली ।।

जिथे शुक्राचार्यांना संजिवनी विद्या प्राप्त झाली ते स्थान कोपरगाव येथे आहे. तर इतर तीर्थांविषयी सांगतात,

अंगिरस तीर्थ वडगावासी। भृगु बक्तरपुरासी। धारणगाव कुंभारीसी। स्थान वृद्ध गौतमाचे।।

 

ही पौराणिक पार्श्वभूमी सांगून महाराज इतिहासाकडे येतात.

गौतमेश्वराचे मंदिर। कुंभारीसी महा थोर। जे हेमाद्रीने साचार। बांधिले बुधहो पूर्वकाली।।

 

आता इतिहासातून तत्कालीन वर्तमानात येऊन म्हणतात.

हल्ली  त्या मंदिरात। लागे न नुसती सांजवात। याची हिंदू समाजाप्रत। लाज वाटली पाहिजे।।

असो शुक्रतीर्थ उत्तरतीरी। होते ते हल्ली दक्षिणतीरी। झाले का की गोदावरी। वाहू लागली पलीकडून।।

या ठिकाणी गोदामाईच्या प्रवाहाने मार्ग बदलला आहे. या घटनेला कारणीभूत जर कोणी असेल तर ते रघुनाथराव पेशवे आहेत, असे महाराजांनी म्हटले आहे. तो इतिहास असा, नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे रघुनाथरावांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावतात. हताश रघुनाथराव पापक्षालनार्थ गौतमीतटी कोपरगावी वास्तव्यास येतात. रोज गोदास्नान, दानधर्म, अशी नित्यकर्म करीत आयुष्य घालवतात. दरम्यानच्या काळात येथील मंदिरांची डागडुजी, नवीन विष्णुमंदिराचे बांधकाम तसेच गोदापात्राला घाट इ. तथाकथित सत्कर्मे करतात. त्यांचा दासगणु महाराज जोरदार निषेध करतात. इतका की या पाप्यामुळे गोदेने थेट विष्णुंना दम दिलाकी, मी चालले ब्रह्मलोकी आणि मग विष्णुंनी कसे तिला थांबवले. महाराजांचे गोदामाईवर अतिशय प्रेम असल्याने तिच्यावर पापीजनांची सावली पडू नये, असे त्यांना वाटते. हा सर्व प्रसंग त्यांच्याच शब्दात वाचण्यासारखा आहे. जिज्ञासुंनी जरुर वाचावा.

असो,

पुढे दासगणु महाराज इंद्रतीर्थाविषयी सांगतात. वृत्रासुराचा वध केल्याने इंद्राला ब्रह्म हत्येचे पातक लागले होते. आता तो कुठेही गेला तरी त्याच पातकाची चर्चा. त्यामुळे काही काळासाठी तो भूमीगत झाला. शेवटी ब्रह्मदेवांनी मार्ग काढला की, इंद्राला गोदाजलाचा अभिषेक करावा. त्याप्रमाणे त्याला गोदेकाठी आणले पण ब्रह्महत्यारा इंद्राला गोदास्नान करण्यास गौतमांनी स्पष्ट मनाई केली.

मग?

द्विजगंगा गोदावरी । तैशी वैश्यगंगा नर्मदा खरी। क्षत्रियगंगा निर्धारी। हिमोद्भवा भागीरथी।। 

असा विचार करुन मंडळी नर्मदेकाठी आली. तेथे मांडव्य ऋषींनी हरकत घेतली. मात्र गयावया करून मांडव्य ऋषींनी नर्मदा स्नानास परवानगी दिली. तेव्हा स्वतः नर्मदामाईने गोदामाईचे वर्णन केले.

अभिषेक करता इंद्राप्रत। नर्मदा ऐसी वदली तेथ। गोदादकाविण खचित। पद न इंद्राचे इंद्रा मिळे।।
माझ्या जलाचे महिमान। श्रेष्ठ न गोदावरीहून। अवघ्या तीर्थाचे शिरोभूषण। वृद्ध गोदा भूमीवरी ।।

जा आता झडकर। तया वृद्ध गोदेवर। नयनी पाहता तिचे नीर। स्नान येईल फळाते।।

साक्षात नर्मदामाईने असे सांगितल्यावर देवादिकांसमवेत इंद्र गोदेकाठी आला.

मग सर्वांच्या साक्षीने ब्रम्हदेवांनी गोदाजलाने कमंडलु भरून इंद्राच्या शिरोभागी ओतला. प्रत्यक्ष ब्रम्हदेवांनी ओतलेल्या जलामुळे तेथे दोन नद्या निर्माण झाल्या. ज्या अर्थातच गोदेला मिळाल्या. सिक्ता व पुण्या, असे या नद्यांना नाव दिले गेले. या स्थानाविषयी दासगणु महाराज म्हणतात…

बुध हो हे इंद्रतीर्थ संवत्सरा संनिध सत्य। सिक्ता पुण्या या सरिताप्रत। गार्दा नार्दा नाव हल्ली।।

 

अशाप्रकारे आजआपण संवत्सरी येवून थांबत आहोत. आता उद्या भेटूच !!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.