संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या  दहाव्या आणि अकराव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

विविध पापातून मुक्त करणाऱ्या गोदामाईसह आज आपण नाशिकहून पुढे निघालो आहोत. आता गालवमुनींच्या आश्रमात घडलेली कथा महाराज सांगतात. धृतव्रत ब्राह्मणाला मुलगा होतो. त्याचे नाव सनज्जात. हे मुल जन्मास येते आणि पिता धृतव्रत मरण पावतो. बाळाची आई ‘मही’ ही जेमतेम सोळा वर्षाची… आपल्या बाळाला घेऊन गोदातटी असलेल्या गालवमुनींच्या आश्रमी आश्रयाला आली. गालवमुनींनी तिला सात्विक विधवेचे जीवन जगण्याच्या अटीवर आश्रमात प्रवेश मिळेल अन्यथा तिने बाळाला आश्रमात ठेवून निघून जाण्यास सांगितले. तिने दुसरा पर्याय स्वीकारला आणि बाळाला मुनींच्या हवाली करून निघून गेली. पुढे तिला समाजाने स्वीकारले नाही. त्यामुळे…

मही झाली स्वैरिणी। कामविकारे करूनी। जनस्थानी येवूनी। पाल तिने मांडिले।।
इकडे गालवाश्रमी सनज्जात। झाला वेदविद्या पारंगत। परी मातृदोषे तयाप्रत। विषयेच्छा उदेली।।

त्यामुळे त्याने गालवांचा आश्रम सोडला. आसपासच्या गावात भिक्षुकी करु लागला. विद्वत्ता लाभलेला पण वाट चुकलेला असा हा तरुण होता. फिरत फिरत तो जनस्थानी आला आणि अघटित घडले. तो महीबरोबर राहू लागला. कालांतराने ते असेच गौतमीतटाने फिरताना गालव आश्रमाजवळ आले. सकाळी मुनीवर जेथे स्नानसंध्या करीत तेथेच सनज्जात स्नानास आला आणि तपोनिधी गालवमुनी जे पाहिले ते अनाकलनीय होते.

स्नानास येता सनज्जात। रक्तपितीने असे व्याप्त। तोच स्नान केल्या सत्य। दिसे बालकापरी।।
ही दोन्ही रुपे तयाची। गालव प्रत्यही पाही साची। परि गति न चाले बुध्दीची। कारण त्याचे शोधावया।।
अखेर याचे कारण। विचारी सनज्जातालागून। 
ऐसे घोर पाप तुझ्या हातून। प्रत्यही घडे कोणचे?।।
की ज्या पापे निश्चिती। प्रत्यही फुटे रक्तपिती। तीच स्नान केल्यावरती। नाहीशी होते हे काय?।।

यावर काही न बोलता तो घरी गेला आणि स्वतःचा भूतकाळ महीला सांगितला. तिचा भूतकाळ विचारला. जे समोर आले त्याने उभयतांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांनी धावत जावून मुनींसमोर लोटांगण घातले. नकळत घडलेल्या पापाला प्रायश्चित विचारले तेव्हा गालवांनी सांगितले.

हे सुजाण सनज्जाता। पश्चात्तापे शुद्धता। झाली तुझी सर्वथा। आता न करणे शोकासी।।
एक्या पश्चात्तापापुढे । इतर प्रायश्चित बापुडे । गरुडापुढे कोंबडे । कोठून पावे गौरवा ।।
तुझी दोन रूपे होण्याचे । कारण आज उमगले साचे ।  पहा मातृगमनाचे ।  पाप केवढे भयंकर ।।
जा आता गोदेवरी। अलोट श्रध्देने स्नान करी। सर्व पापाची बोहरी। होई स्नाने गोदेच्या।। 

असे मुनींनी आश्वासन पश्चात्तापदग्ध सनज्जात आणि महीने गौतमीस्नान केले. त्या ठिकाणाविषयी महाराज म्हणतात,

ही दोघे ज्या ठिकाणाहून। गेली पावन होऊन। तया तीर्थालागून। धूतपाप नाम असे।।
हे धूतपापक्षेत्र। ओढ्याचिया सन्निध सत्य। पचता घोर पापात। सनज्जात ओढिला मागे।।
एकलहरे दक्षिण तीरी। येथे मही उध्दरली खरी। हिच्या विषयसुखाच्या लहरी। पश्चातापे निमाल्या।।

ओढा येथील ब्रह्मपुराणांतर्गत प्रसंग सांगितल्यावर महाराज इतिहासाकडे वळतात आणि म्हणतात,

श्रोते या ओढ्यात। मोरोबादादा फडनीस सत्य। पावले पंचत्वाप्रत। तीर्थ महात्म्य लक्षूनी।।
पुण्यात फडनिशी केली खरी। श्रीमंत पेशव्यांच्या पदरी। तलवार गाजवून भूमीवरी। अपार लौकिक मिळविला।।
परी जेव्हा मरणकाळ आला। तेव्हा न भुलले त्या वैभवाला। गोदावरीचाच आश्रय केला। निज धर्माच्या महतीस्तव।।

 

अशी गोदामाईची महती सांगत हा अध्याय येथे थांबतो!

अध्याय अकरावा

आता आपण अकाराव्या अध्यायाला नमस्कार करतोय.. या अध्यायात महाराज काय सांगतात ते पाहूया…

एकदा तीर्थाटन करताना महर्षी विश्वामित्र गोदाकिनारी आले होते. त्यावेळेला याठिकाणी भयंकर दुष्काळ पडलेला होता. शेती नापेर, पर्वत उघडेबोडखे,पशुधन मरणपंथाला लागलेले, सर्वत्र उपासमारीचे संकट घोंघावत होते. नेमके अशा परिस्थितीत विश्वामित्र त्यांच्या काही शिष्यांसह आलेले होते. मध्यान्ह टळून गेले होते. डोक्यावर रणरणते ऊन, पोटात भडकलेली भूक, अशी शिष्यांची अवस्था असतानाच,

ऐशा भयंकर समयासी। बोलले विश्वामित्र ऋषी। शिष्य हो वेगे खावयासी। घेऊनि या कहीतरी।।
ऐसे ऐकता गुरूवचन। शिष्य बोलिले कर जोडून। आम्ही गेलो कंटाळून। शोध करिता भक्ष्याचा।।
फक्त एक श्वान मृत। पडला आहे पंथात। आज्ञा झाल्यास तयाप्रत। येतो महाराज घेऊनी।।

हे ऐकून विश्वामित्रांनी त्या मृत श्वानाला घेऊन येण्याची आज्ञा केली. शिष्यांनी आज्ञापालन केले. पुढे…

श्वानाचे मांस शिजवले। विश्वामित्र ऋषी बोलले।
आता पंचमहायज्ञ भले। यानेच साधू शिष्यहो।।

हे ऐकून शिष्यांना धक्का बसला. त्यांनी गुरूंना विनवले की, आपण हे मांस खाणे योग्य नव्हे. त्यावर महर्षींनी जे उत्तर दिले ते अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एक ऋषीच सृष्टीवर इतके प्रेम करु शकतो. आपण ते महाराजांच्या शब्दातच पाहू..

मी आणिल्या मनात। आपणापुरते धान्य येथ। उत्पन्न करीन क्षणात। माझ्या तपोबलाने।।
परी वर्ग कृषीवलांचा। अन्नावीण मरतो साचा। हा दुर्धर प्रसंग तयाचा। वारायासी युक्ती ही।।
श्वानमांसेकरुन। केल्या पंचमहायज्ञ। 
ते इंद्रादिदेवालागून। सेवणे भाग येईल की।।
आणि त्यावेळी जे घडेल। ते अवघे तुम्हा कळेल। जा जा नका करु वेळ। श्वानमांस शिजवावया।।
हविष्यान्न मांसाचे। देवा देणे ठरविले साचे। 
तेणे वैश्वानराचे। गेले धाबे दणाणूण।।
इंद्रलोका येऊन अग्नि। बोलला देवालागुनी।
तुमचे दुर्भाग्य आज दिनी। उदय पावू पाहाते।
देव हो विश्वामित्र ऋषी। आला गौतमी तटासी।
तो श्वानमांस तुम्हांसी। आहे खावया घालणार।।
ऐसे कथिता वैश्वानर। युक्ती योजून पुरंदर।
भली मोठी होऊन घार। मांसपात्र उचलिले।।

इंद्राची ही चलाखी पाहून संतापलेले विश्वामित्र ऋषी शापवाणी उच्चारायला उभे राहिले. घाबरलेला इंद्र हातात अमृत घेऊन समोर उभा राहिला. महर्षी हे श्वानमांस आपण भक्षण करू नये…

ऋषि म्हणाले त्यावरी। तू अवर्षण पाडिले भूमीवरी। तेणे दुनिया बिचारी। मरु लागल्या पुरंदरा।।
त्यांचे दैन्य पाहून। द्रवते झाले माझे मन। शिक्षा द्यावया तुजलागून। श्वानमांस पचविले।।
कृषीवलाच्या सुखासाठी। आम्ही बैसलो कपाटी। समाजाचे हाल दृष्टी। तापसाने पाहू नयेत।।

 

आणखी बरेच काही इंद्राला सुनावले. मग काय!

ऋषीस करुन वंदन। गेला इंद्र निघून।
तात्काळ पाडिला पर्जन्य। अवर्षण घालविले।।

 

असे हे विश्वामित्रतीर्थ दारणासंगमी आहे. ज्याच्या आसमंतात चेहेडी, जोगली, पाडळी ही गावे आहेत. असो!

विश्वामित्रतीर्थाची महती सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या नवीन अध्यायासह भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *