संत दासगणुकृत गोदामाहात्म्यातील सातव्या अध्यायाला आज आपण नमस्कार करुयात,

आपण आजही त्र्यंबकेश्वरीच राहणार आहोत. कारण ब्रह्मपुराणात गौतमी-गोदावरीचा प्रत्येक जलबिंदू आणि त्या जलधारेस धारण करणारी भूमी किती पवित्र आहे. हे सांगताना महर्षी व्यासांची लेखणी थकत नाही. तसेच दासगणु महाराजही प्रत्येक तीर्थांस नमस्कार करूनच पूढे जातायेत. तेव्हा आपणही या तीर्थांना नमस्कार करूनच पुढे जावूया!

प्रथम आहे ‘कुमारतीर्थ’. साक्षात शिवपार्वतीचा पुत्र असलेल्या कुमार कार्तिकेयाने तारकासुराचा पराभव करून त्याला ठार केले. तेव्हा माता पार्वतीने त्याला श्रमपरिहारार्थ पृथ्वीवर पाठवले आणि पृथ्वीवर आल्याने पृथ्वीवासियांप्रमाणे त्यालाही सुखोपभोग आवडू लागले. जरी पार्वती मातेने त्याला फिरायला पाठवले तरी तिचे त्याच्यावर लक्ष होतेच. चाणाक्ष जगन्मातेने कार्तिकेयाचे मतपरिवर्तन केले आणि त्याला प्रत्येक स्त्री माता पार्वतीसमान भासू लागली. तरीपण स्वतःकडून झालेल्या चुकीचे प्रायश्चित घेण्यासाठी तो गौतमीतटी आला आणि ध्यानस्थ झाला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला ‘काही वर माग’, असे म्हणताच तो म्हणाला,

श्री गौतमीच्या स्नाने मला। हा वैराग्याचा लाभ झाला।
तो तू टिकवी दयाळा। कृपा करून माझेवरी।।
आणि मी ज्या ठिकाणी। केले गौतमी स्नान जाणी।
ते कुमारतीर्थ म्हणूनी। त्रिभुवनी या ख्यात असो।।

असे कुमारतीर्थाचे महत्त्व सांगितल्यावर महाराज कृत्तिकातीर्थाची कथा सांगतायेत… एकदा शिव-शक्ती काही चर्चा करीत होते. त्यावेळेला अग्नि शिवतत्वाकडे भिक्षा मागण्यास आला. तेव्हा तेजस्वी अग्नीला शिवाने त्याला स्वतःचा तेजांश भिक्षा म्हणून दिला. तो प्राप्त झाल्यावर अग्नी आणखीच दैदिप्यमान झाला. त्याला पाहून सप्तर्षींचा सात पत्नींपैकी अरुंधती सोडून उर्वरित सहा जणींच्या मनात विकार आला. जो त्यांना शोभणारा नव्हता. जरी आपले शरीर शुद्ध आहे, तरी आपले मन मलिन झाले हा सल काही केल्या त्यांना स्वस्थ बसू देईना. शेवटी अशांत आणि मलिन मनाला शुद्ध करण्यासाठी त्या गौतमीतटी आले. सहाही जणींनी स्वतःचे मानसिक पातक गोदामाईकडे प्रामाणिकपणे उघड केले असता षण्मुख कार्तिकेय प्रकट झाला. त्याने ऋषीपत्नींना गौतमीतटी तप करण्यास सांगितले.

शिवकृपे करूनी। कृत्तिका गेल्या देवभुवनी।
त्यांच्या तपस्थानालागूनी। कृत्तिका तीर्थ म्हणतात ।।

असे कृत्तिका तीर्थाचे महत्त्व सांगून महाराज दशाश्वमेध तीर्थाविषयी सांगतात…

आता दशाश्वमेध तीर्थाचा। इतिहास हा ऐक साचा।
पणतु विश्वकर्म्याचा। भौवन नामे नृप होता।

…या भौवन राजाला दशाश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. जी त्याने स्वतःचे गुरू कश्यप यांच्याकडे व्यक्त केली. गुरूंना अर्थातच आनंद झाला व त्यांनी या यज्ञकार्यासाठी देवक्षेत्राची निवड केली आणि यज्ञारंभ झाला. सर्व विधी शास्त्राच्या आधारे सुरू असतांनाही यज्ञ काही पूर्णत्वास जाईना. त्यात अनंत विघ्ने येवू लागली.

तेव्हा राजा ब्रम्हदेवांकडे गेला आणि यज्ञ पूर्ण करण्याचा मार्ग विचारू लागला. त्यावर ब्रम्हदेव म्हणाले,

त्या गौतमी गंगेच्या तीरा। तडीस जाय यज्ञ खरा।
त्यावीण देश दुसरा। यज्ञकर्मा योग्य नसे।।

नंतर कश्यपमुनिसह राजा भौवन गौतमीतटी गेला आणि त्याचा यज्ञ पूर्णत्वास नेला. आनंदीत झालेल्या राजाला भरपूर अन्नदान केले. हा यज्ञ जेथे संपन्न झाला त्या ठिकाणाला ‘दशाश्वतीर्थ’ म्हणतात.

पुढे पैशाच तीर्थाविषयी सांगतात…

नारदा ब्रम्हगिरीवरी। राहात होता केसरी।
जो दक्षिण समुद्रतीरी। गमन करी हमेशा।।
अद्रिका नी अंजनी। तयाच्या दोन कामिनी।
ज्या मूळच्या अप्सरा असोनि। शापे नीच योनी पावल्या।।
अद्रिका झाली मार्जारी। अंजना ती वानरी।
असो नारदा त्यांच्या घरी। अगस्ती पातले एक वेळा।।

अशा प्रकारे जेव्हा अगस्ति ऋषी आले, तेव्हा या शापित अप्सरांनी त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. ऋषी त्या दोघींना निश्चितच पुत्रप्राप्ती होईल, असा आशिर्वाद दिला. पुढे मार्जाररुपी अद्रिकेने नैर्ऋतपुत्र पिशाचराटाला जन्म दिला. तर वानरिरुपी अंजनीने पवनपुत्र मारुती अर्थात हनुमंताला जन्म दिला. आता या दोघींनाही त्यांचे मूळरुप हवे होते.

तेव्हा…

पिशाचराटे अद्रिका। हनुमंते अंजनी देखा।
घेऊन गौतमी तटाका। येते झाले शीघ्रगति।।
गौतमीचे स्नान करिता। पूर्वदेह पावल्या सर्वथा।
अद्रिका नि हनुमन्माता। ऐसे माहात्म्य गंगेचे।

या पुढची ओवी दासगणु महाराजांचे गोदामाईवरील प्रेम आणि प्रगाढ विश्वास दर्शविणारी आहे.

उध्दरल्या या जे ठायी। ते पिशाचतीर्थ पाही।
ऐशी समर्थ गंगाबाई। काय महिमा वर्णू तिचा।।

पुढे क्षुधातीर्थाचा महिमा सांगतात की, अहर्निश अडचणींनी त्रस्त असे. कण्वऋषी एकदा गौतमांच्या आश्रमी आले. येथील सुबत्ता पाहून नकळत ते व्यथित झाले. मलाच एवढ्या अडचणी का? असे काहीसे त्यांना वाटले. विचारांती त्यांना जाणवले की, ही गोदामाईची कृपा आहे. ते माईला शरण आले.

हे ब्राम्ही गौतमी गंगे। सर्वपातकनाशिनी।
गोदावरी नमस्तुभ्यम्। सर्व सौभाग्यदायिनी।।
विमले निर्मले देवि। विष्णुपाद समुद्भवे।
वैष्णवि त्र्यंबके अंबे। शिव महेश्वरी शुभे।।

पुढे अर्थातच कण्वऋषींचे दैन्य गेले आणि ज्या स्थानी तप करून ते समृद्ध झाले ते स्थान क्षुधातीर्थ म्हटले गेले.

अशाप्रकारे आज आपण गौतमीच्या  त्र्यंबकेश्वरी असलेल्या  कुमारतीर्थ, कृत्तिकातीर्थ, दशाश्वमेधतीर्थ, पिशाचतीर्थ आणि क्षुधातीर्थ या पाच तीर्थांना नमस्कार केला. आजचा अध्याय येथेच थांबतो. उद्या आपण अहिल्यासंगमी जाणार आहोत तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *