संत दासगणु महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजचा सहाव्या अध्यायाला नमस्कार करुयात.

आजच्या अध्यायापासून आपल्याला संतकवी श्री दासगणु महाराज गोदाकाठचे आगळेवेगळे दर्शन घडविणार आहेत. तेव्हा चला जावूया त्र्यंबकेश्वरी!

नारदासी म्हणे चतुरानन। गंगा ब्रम्हगिरी पासून।
पूर्वाभिमुख होऊन। वाहती झाली महीवरी।।

…आणि अशी वाहती झालेली माई आपल्याला प्रथम भेटते ती गंगाद्वारी! या गंगाद्वारीचा इतिहास सांगताना महाराज म्हणतात,

प्रथमतः त्र्यंबक क्षेत्र। जे परम पवित्र।
यालाच म्हणती वराह तीर्थ। याचा इतिहास ऐसा असे।।

आता वराहतीर्थाची कथा येते. सिंधुसेन नावाचा एक बलवान असुर होता. त्याने रसातळात एक यज्ञ आरंभिला ज्याचा हेतू अर्थातच शुद्ध नव्हता. त्यामुळे श्रीविष्णुना रसातळात जाऊन सिंधुसेनाचा पराभव करून यज्ञसंस्था त्याच्या ताब्यातून सोडवावी लागली. हे कार्य करताना विष्णुंनी वराहवेष धारण केला होता. रसातळातून सोबत आणलेल्या यज्ञकुंडाची स्थापना त्यानी ब्रह्मगिरीवर केल्याने

ब्रह्मगिरीवरी भली। त्या कुंडाची स्थापना केली।
जेणे यज्ञरुप अवघी झाली। अनायसे गोदावरी।।
वेषाचे करून विसर्जन। गोदावरीत केले स्नान।
देवास म्हणे नारायण। या क्षेत्रीचे महात्म्य ऐका।।
जो जो वराहक्षेत्रांतरी। स्नान करील गोदातीरी।
तो तो अंती वैकुंठपुरी। येवून बैसेल मजजवळ।

…आणि हे वराहक्षेत्र नक्की कुठे आहे.

हे वराहक्षेत्र। गंगाद्वारासमीप सत्य।
जेथे गंडिकेची तिष्ठत। मूर्तिरुपे गोदावरी।।

आता पूढे ब्रह्मगिरीवर नाथपंथीय गुरू मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आदिंनी घोर तपाचरण केल्याचे सांगतात. तर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वरांचे गुरू संत निवृत्तीनाथ समाधिस्त झाल्याचे सांगतात.

शिवांश श्री निवृत्तीनाथ। म्हणूनी शिवक्षेत्रात।
येऊन झाले समाधिस्थ। उत्तरायणी पौष मासी।।

आता आपण कुशावर्ती निघालोय. ही कथा गोदाकाठचे मानवच काय तर पशुपक्षीही संस्कारी आहेत हे दर्शविणारी आहे. या कथेत कबुतर पक्षाची जोडी एकमेकांवर प्रेम तर करतेच पण एका शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी स्वतःहून प्राणाची आहुती देते. तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो! हे पाहून शिकारी पश्चात्तापदग्ध होतो आणि त्या पक्षीद्वयाला विचारतो,

तुम्ही पक्षीअसून। गेलात की उध्दरुन।
ऐशीच युक्ती मजलागुन। सांग काही खगवर्या।।
कपोत म्हणे व्याधाला। तू स्नान करावे गौतमीला।
ती तुझ्या पातकाला। हरण करील सर्वस्वी।।
नारदा ते ऐकून। लुब्धकाने केले स्नान।
कुशावर्ता लागून। प्रार्थना करून गंगेची।।

असे कुशावर्ताचे पौराणिक महत्त्व सांगून दासगणु महाराज इतिहासाकडे येतात आणि म्हणतात,

हे कुशावर्त तीर्थ। बांधिते झाले श्रीमंत।
जे होते प्रधानपंत। सम्राट छत्रपतींचे।

असे कुशावर्ताचे वर्णन करुन हा अध्याय येथे थांबतो. उद्याच्या अध्यायात आपण गौतमीसह आणखी पुढे जावू. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *