आज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय….

काल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत.

ब्राह्मी गौतमी गोदावरी। सामावणार सागरी। ऐकता भूवरी। आनंद झाला सर्वत्र।।

आणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू…

गौतम वसिष्ठ गालव। जाबाली याज्ञवल्क्य वामदेव। अंगिरस मरिचि भार्गव। शौनकादि अवघे ऋषी।।
शांता भृगु अगस्ति। कौशिक धूतपाप सन्मति। मार्कंड देवरात अत्रि। अग्निवेश्य मनु पर्वत।
पिप्पलादादि धरामर। येते झाले होऊन आतुर। प्रत्येक ऋषीने पुष्पहार। कंठी धारण केला असे।।

अशी उपस्थितांची नावे घेतल्यावर महाराज त्यांच्या वेषभूषेचे वर्णन करतात की,काहीनी रुद्राक्षमाळा घातल्या,तर काहीनी भस्मविलेपन केले,काहींनी आपल्याबरोबर पोथ्या आणल्यात तर काही मुखाने वेदमंत्र म्हणतायेत असे सर्वांचे वर्णन करून पूढे सर्व ऋषीपत्नी,देवता,देवस्त्रिया आल्याचे सांगतात तसेच ऋषीपत्न्या गोदागौरवार्थ ओव्या गात होत्या असेही सांगतात. पूढील दोन ओवी पहा, हृदयस्पर्शी आहेत…

ऋषीसमुदाय पादचारी। चालत असता भूमीवरी। मध्यभागी गोदावरी। शोभू लागली जननीसम।।
वाटे कन्यापूत्र घेऊन। नातवंडे सुना आदिकरून। तीर्थजननी करी गमन। समुद्रस्नानाकारणे।।

अशाप्रकारे गोदामाई समुद्रासमीप पोहोचली आहे..

गोदामाहात्म्य सांगतांना महाराजांनी वारंवार सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. या दोन प्रातिनिधीक ओव्या पहा…

भूमिपाल लोकपाल। भैरव वसु ग्रह सकल। येते झाले एकमेळ। करुन तेथे नारदा।
श्रोते करा विचार। त्या काली भूमीवर। होता अवघ्यांचा एक विचार। म्हणून ऐसे घडले असे।।

आणि आता तो क्षण आलाय!!!चला!!!

सर्व मंडळी जमल्यावर। अवघे करिती जयजयकार। गोदावरीस जोडून कर। पूजन अवघ्यांनी आरंभले।।
इमं मे गंगे मंत्रांनी। अभिषेक केला ब्राह्मणांनी। वस्त्राभरणे दिवौकसांनी। अर्पण केली गोदेस।
खण नारळ घालोनी। ओट्या भरिती सुवांसिनी। अष्टदिक्पाळ येवोनी। नैवेद्य अर्पिते जाहले।।
मंत्र-पुष्प झाल्यावर। दक्षिणा ठेवी कुबेर। अवघे काढून उच्च स्वर। स्तोत्र गाऊ लागले।।
अवघ्यांनी स्तुती केली। गंगा सागरा मिळाली। त्रिभुवनात गर्जना झाली। गोदावरीच्या नावाची।।

आता विविध प्रकारे गोदेचा महिमा सांगतायेत. पण आपले मन संगमस्थळावरुन मागे फिरत नाही, हो ना! मग येथेच थांबू, हो पण काही क्षणच, कारण तीर्थांचा कळसाध्याय हाच अध्याय होता पण गोदामाहात्म्याचा कळसाध्याय मात्र आता सुरू होतोय तेव्हा चला, गोदामाहात्म्याचे सारग्रहण करुयात…

आता आपण शेवटच्या अध्यायाकडे वळतोय… तीसांवा अध्याय हा तीर्थांचा कळसाध्याय होता आणि हा अध्याय संपूर्ण गोदामाहात्म्याचा कळसाध्याय आहे… सुरूवातीलाच दासगणु महाराज म्हणतात,

आता श्रोते सावधान। स्थिर करुनिया मन। या कळसाध्यायालागून। आदरेसी श्रवण करा।।

आता प्रथमाध्यायापासून सुरुवात करुया. पहिल्या अध्यायात मंगलाचरण म्हणून, देवांना, गुरूंना वंदन करून नारद-ब्रह्मदेव संवाद रुपाने कथारंभ होतो. दुसऱ्या अध्यायात साक्षात शिवाचा विवाह -सोहळा तसेच सृष्टीकर्त्या ब्रह्माचे मन विचलित झाल्याने शिवाकडून ब्रह्मदेवांस ‘गंगेची’ अनुपम भेट मिळण्याचा प्रसंग वर्णिला आहे. तृतीय अध्यायात वामनरुपी विष्णूचे पादप्रक्षालन ब्रह्मदेव यांच गंगेने करतात ते कथानक आहे. त्या जलाचे चार ओघ होतात पैकी एक शिवजटेत विराजमान होतो जो बाहेर काढण्यासाठी गणपती, जया आणि पार्वती प्रयत्न करतात.

चौथ्या अध्यायात गंगा ही ‘गौतमी, गोदावरी’ असे नाव धारण करून ब्रह्मगिरीवर अवतीर्ण झाल्याचे कथानक आहे. तसेच गंगेचा द्वितीय ओघ भागिरथाने आणल्याचे तसेच गौतमीतटी साडेतीन कोटी तीर्थे असल्याचे शिवाने ब्रह्माला सांगितले आहे. हेच कथानक पाचव्या अध्यायी पुढे जावून सगरपुत्रांचा उध्दार या अध्यायी आहे. पुढे सहाव्या अध्यायात सिंधुसेनाच्या संहाराचे कथानक आले आहे शिवाय लुब्धकाचा उध्दार आणि कुशावर्ती कपोत-कपोतीचे स्वर्गारोहण इ. कथा आल्या आहेत. सातव्या अध्यायात कुमारतीर्थ, कृत्तिकातीर्थ, दशाश्वमेधतीर्थ, तसेच अद्रिका-अंजनीच्या उध्दाराचे स्थान असलेले पिशाच्चतीर्थ, कण्वऋषींच्या क्षुधेचे निरसन करणारे क्षुधातीर्थ इ. कथा आल्या आहेत.

आता आठव्या अध्यायात गौतम-अहिल्येच्या आयुष्यात आलेला कठीण प्रसंग, जनक आणि याज्ञवल्क्यांनी जनस्थानी केलेला यज्ञ तसेच यमाचे तप सुरू असतांना विष्णुंनी चक्राद्वारे केलेले यमाचे रक्षण ई. प्रसंग आहेत. नवव्या अध्यायी पंचवटीतीर्थाची कथा आहे शिवाय मणिनागाला बंदी करणाऱ्या गरुडाच्या अहंकारनाशाची कथा आहे तसेच नंदीने गोधनाला मान मिळवून देण्यासाठी जे कर्तृत्व केले त्याचे कथानक आहे. दहाव्या अध्यायात धूतपापतीर्थाचे महत्त्व आले आहे. अकराव्या अध्यायात विश्वामित्र ऋषींच्या सृष्टीप्रेमाची कथा आहे ज्यात दुष्काळ निवारण्यासाठी विश्वामित्रांनी इंद्राला श्वानमांसाचा हवि दिला जो खाण्याच्या भितीने इंद्राने गोदेकाठी पाऊस पाडून सुबत्ता केली. आता बाराव्या अध्यायी श्वेततीर्थाची कथा येते. यमाने हरीहराच्या भक्तांना हात लावू नये असे सांगून खुद्द यमालाच गोदाजलाने जिवंत केले जाते. शुक्लतीर्थाचे विवरणही याच अध्यायात आहे तसेच शुक्राचार्यांच्या संजीवनीविद्येच्या सिद्धीविषयीही सांगितले आहे. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निरसन, गार्दा-नार्दा संगम आणि दांभिक रघुनाथराव पेशव्यांना पाहून गोदेचा झालेला संताप याच अध्यायी आहे.

आता तेराव्या अध्यायात धनतीर्थाचा इतिहास, कुबेरावर झालेली शिवकृपा, कद्रु-सुपर्णासंगमतीर्थ या कथा आहेत. चौदाव्या अध्यायात पुरुराजाच्या बौध्दिक अधःपतनाची कथा, श्रध्दा-मेधा-सावित्री-सरस्वती आणि गायत्री अशा पंचतीर्थांची कथा तसेच शुनःशेपाला विश्वामित्राने पुत्र मानल्याच्या प्रसंगाचे वर्णन येते. पंधराव्यात सोमतीर्थाचे वर्णन तसेच प्रवरासंगमी मोहिनीरुप विष्णुंनी राहुचा वध केल्याचा प्रसंग येतो. सोळाव्या अध्यायी वृध्दा-इला संगम, ऐलराजाने गोदेकाठी काळेश्वराची स्थापना केल्याचे वर्णन, चक्रतीर्थ, वडवासंगमतीर्थ आणि पिप्पलादाला महादेव प्रसन्न झाल्याचे कथानक येते. सतराव्यात नागतीर्थाचा वृत्तांत आणि मातृकांना पैठणात मिळालेली प्रतिष्ठा वर्णिली आहे. अठराव्यात ब्रह्माचे मुखहनन, ब्रह्मतीर्थाचे निरुपण आणिअविघ्नतीर्थाची कथा येते.

पुढे एकोणिसाव्यांत शनिदेवाने पिप्पल आणि अश्वत्थ या राक्षसांचा संहार केला तसेच सोमराजाचे लग्न, औषधींचे गुणगान, विदर्भासंगम, पूर्णतीर्थ, इंद्रतीर्थ आणि प्रभू रामचंद्रांनी दशरथांना पिंडदान केल्याने मुक्ती मिळण्याचा प्रसंग इ. वर्णन आहे, नंतर पुत्रतीर्थ, मरुद्गणांचे जन्म, इंद्राचे तप करणे, अर्ष्टिषेणाची कथा, आणि सुवर्ण-सुवर्णा या अग्नि अपत्यांचे कथानक इ. गोष्टी विसाव्या अध्यायात आहेत. आता एकवीसांव्या अध्यायात सिंधुफेनाने नमुचीचा वध, गोदावरीच्या जलातून अब्जक देवाचे प्रकट होणे, महाशनिला मारणे, हनुमंताची उपमाता मार्जारीचा उध्दार मंजरथ या ठिकाणी होणे, मंजरथ हे गोदेचे हृदयस्थान आहे, आपस्तंबतीर्थ कथन आणि यमकिंकरी सरमेचा उध्दार, विश्ववसूची हकीकत, भारद्वाजांनी हव्यघ्नाला गोदाजलाने उध्दरणे इ. कथा येतात. आता बावीसांव्यात शंभरासुराचा वध, वाणीसंगमतीर्थ, मौद्गल्य ऋषींवर विष्णूंचे प्रसन्न होणे, इ. कथा येतात. पूढे तेवीसांव्या अध्यायात लक्ष्मी-दरिद्रासंवाद, इंद्रायणी कडून गोलकासुराचा वध, राजा शर्याति आणि पुरोहित मधुच्छंदाची कथा, भानुतीर्थ, खङगतीर्थ, आत्रेयतीर्थ, इ. कथा आहेत. आता चोवीसांव्यात वेन राजा, पृथुची कथा, देवतीर्थ, मेघहासाचे मुक्त होणे, रावणाचे शिवाला प्रसन्न करून घेणे, पयोष्णीसंगमतीर्थ आणि ब्रह्मवृदांची मार्कंड आश्रमातील कथा इ. गोष्टी येतात.

आता पंचवीसाव्या अध्यायात राजा ययाति आणि त्याचा पुत्र पुरु यांची कथा येते तसेच विश्वामित्राचे तपाचरण, बाल्हिकाचे अग्न्याधान, अंबरासूराचा नाश, उर्वशीतीर्थ, तारातीर्थ याच अध्यायी येतात. सव्वीसांव्यात बर्हि राजाची कथा, रामचंद्र आणि लवकुशांची भेट, सूर्याचे अंगिरसांना पृथ्वीदान, गोदामाईच्या नाभिस्थानाचे म्हणजे शंखतीर्थाचे महिमान, व्यासतीर्थ, राहेर कथा, वंजरासंगम कथा, देवागमतीर्थाचा इतिहास, प्रणितासंगमाचा महिमा, मन्युतीर्थ, सरस्वतीतीर्थ आणि सरस्वतीचे बासरला राहणे इ. कथा येतात. सत्ताविसाव्या अध्यायात चिच्चिकाला तृप्त करणारे गदाधरतीर्थ, भद्रतीर्थ, जटायु-संपातीची कथा, विप्रनारायणतीर्थ, अभिष्ठुताकडून होणारा हयमेधयज्ञ आणि व्याधतीर्थ इ. घटनाक्रम येतात. अठ्ठावीसांव्या अध्यायात चक्षुतीर्थ, मृतसंजीवनीतीर्थ आणि उर्वशीतीर्थ येतात. एकोणतीसाव्या अध्यायात अतिपवित्र सामुद्रतीर्थ येते जेथे गोदामाई सप्तमुखी होते आणि तिसाव्या अध्यायात गंगासंगमतीर्थ येते. येथपर्यंत गोदामाहात्म्याचे सांरांश कथन करून दासगणु महाराज म्हणतात की, गोदावरीची अष्टांग प्रदक्षिणा जरूर करावी.

अष्टांगाची प्रदक्षिणा। केल्या अति उत्तम जाणा। ती न झाल्या नाभिस्थाना। पर्यंत तरी करावी।।
शिर प्रदक्षिणा ब्रह्मगिरी। मुख प्रदक्षिणा पुणतांबे नगरी। कंठ प्रदक्षिणा होय पुरी। पैठणक्षेत्रा जवळी हो।।
मंजरथ हृदयस्थान। शंखतीर्थ नाभि जाण। कटी होय मंथन। जानु ती धर्मपुरी।।
आठवे अंग जे चरण। ते राजमहेंद्री स्थान। गोदासरिता धन्य धन्य।।

पुढे गोदेचे वर्णन करता महाराजांची लेखणी थकत नाही की मन भरत नाही. ते माईला वेदांचा रस, पुराणाचे रहस्य तर स्मृतींंचा सारांश म्हणतात! गोदामाईच कर्म, तीच ज्ञान, तीच भक्ती, तीच धर्म आणि धर्माची विजय पताकाही तीच अर्थात सर्वकाही गौतमी-गोदावरीच आहे असं म्हणतात! पूढे ते पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचे आवाहन करतात…

गोदावरीच्या ठायी।भेदबुध्दी मुळी नाही।
ती अवघ्यात सुखदायी।अवघीच लेकरे तिची।

महाराजांनी गोदा-परिक्रमा सत्याण्णव वर्षांपूर्वी केली आहे तेव्हा इंग्रजी राजवट होती. काही ओव्या त्या दृष्टिकोनातून पहा

१) म्हणून जातिमत्सर। शत्रू करा हा ठार। स्वधर्म-सत्तेचे नीर। भरा धर्मरुप गोदेचे।।
२) तुम्ही गोदा अवमानिली। म्हणून विपन्न दशा आली। दास्यत्वाने घातिली। माळ तुमच्या गळ्यात।।
३) जे तुम्ही या गोदातीरी। नांदत होता धन्यापरी। तेथेच वेळ आली खरी। गुलाम होऊन राहण्याची।।
४) घरात एकी असल्या पाही। दुसऱ्याच्या न प्रवेश होई। ताटे न राहती पेंढीठायी। आळा तिचा सुटल्यावर।।
५) निदान इंग्रज सरकारला। परदुःखाचा कनवाळा। येवो म्हणजे आम्हाला। सुख होईल मातुःश्री।।

हे पाहून ही संतमंडळी कसे प्रबोधन करत असे याचा अंदाज आपण लावू शकतो. आता महाराजांची दूरदृष्टी पहा…

असो श्रोते गोदातीरी। भव्य मंदिरे नानापरी। हेमाद्रीने बांधिली खरी। त्यांचा अभिमान ठेवावा।।
नव्या मंदिरांचे प्रयोजन। राहिले न तुम्हालागून। झालेलीच करा जतन। व्यवस्था त्यांची ठेवुनिया।।
जुन्याचा झाला अपमान। नवे न टिके एक क्षण। माय गेल्या मरुन। तान्हे बाळ जगे का?।।
नवी मंदिरे बांधू नका। भलभलते पंथ काढू नका। धर्माभिमानी सोडू नका। केव्हाही बंधुभगिनिनो।।

या आणि अशा कितीतरी गोष्टी महाराज सांगत आहेत… जिज्ञासूंनी जरुर वाचाव्यात!!

अवघे आता जोडा कर।गोदावरीस साचार।मुखाने करा जयजयकार।गोदावरीचे नावाचा।।
पाहि मां गौतमी गंगे वृध्दे सुखविवर्धिनी।पाहि मां मंगले देवि तापत्रयविनाशिनी।।

यापूढे महाराज स्वतःसाठी प्रार्थना करीत आहेत ती आपण त्यांच्याच शब्दांत वाचू

 

 

आता गंगे मजप्रत। शीघ्र घ्यावे पदरात। जरी मी पापी अत्यंत। परी उपेक्षा करु नको।।

पूढे म्हणतात…

अंतकालापर्यंत जाण। तुझे घडो स्नानपान। वाचेस येवो नारायण। राहून स्मृती अंतकाली।।

पूढे ग्रंथपूर्तीच्या दिवसाचा उल्लेख आहे

शके अठराशे त्रेचाळिशी।  दुर्मतिनाम संवत्सराशी। उत्तरायणी चैत्रमासी। शुद्ध पक्षात तृतीयेला।।
हे गौतमी महात्म्य झाले पूर्ण। श्रीहरीच्या कृपेकरुन। सिंहराशीत आसन। असता बृहस्पतीचे।।
वार शिवाचा सोमवार। स्थान नांदेड गौतमीतीर। उस्मानउद्दौला बहादूर। राजा असता सिंहासनी।
जो मांडलिक इंग्रजांचा। पंचम जार्ज सम्राटाचा। अधिकार भोळ्या मोगलाईचा। व्यवहाररीत्या ज्याकडे।।

अशी ग्रंथनिर्मिती काळाचे वर्णन करून पूढे स्वतःविषयी सांगतात की “मी शांडिल्य गोत्राचा असून कोकणस्थ ब्राह्मण आहे. माझे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर हे आहे. स्वतःचे आडनाव सहस्त्रबुद्धे असून आजोळ दाभोळकरांचे आहे. आम्ही पस्तीस जणांनी ही गोदा-परिक्रमा केली आहे…”

ह्या अवघ्या मिळून।तुझी प्रदक्षिणा केली जाण।गंगे तुझे अभयदान।असो ह्या अवघ्यांशी।।

आणि याबरोबरच आपण महिन्यापूर्वी सुरू केलेले गोदामाहात्म्याचे विवेचन श्रीसंत दासगणु महाराजांना आणि गोदामाईला अर्पण करु. उद्या गोदामाईचा वाढदिवस आहे तेव्हा उद्या भेटूच आणि दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी यावर विचार करु!

News Reporter