संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या पंचवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आज राजा ययातिची कथा येते.

 

नारदा राजा नामे ययाति। दोन भार्या त्याप्रति। देवयानी शर्मिष्ठा सती। त्यात शुक्रकन्या देवयानी।।
देवयानीचे ठायी जाण। राजासी पुत्र दोन। यदु तुर्वसु म्हणून। पुरु अनु द्रह्यु शर्मिष्ठेचे।।
एकदा देवयानीने। आणिले पित्यापाशी गाऱ्हाणे। की माझा पति मजकारणे। कपटनीतिने वागवी।।
माझ्या सवतीस पुत्र तीन। आणि दोन का मजलागून। मी आचार्यकन्या असून। काय उपयोग तयाचा।।

अशी कन्येने जावयाची केलेली तक्रार ऐकून शुक्राचार्यांनी जावयाला म्हणजे ययातिला पाचारण केले. त्याला शाप दिला की ‘तू वृद्ध होशील’ तेव्हा ययाति म्हणाला,‘आपण सर्वज्ञ असूनही असा शाप कसा देवू शकता?’ तेव्हा आचार्यांनी आत्मचिंतन करताच त्यांना याबाबतीत ययाति निर्दोष दिसला. तेव्हा त्यांनी उःशाप दिला की जर ‘राजाच्या पाच पुत्रांपैकी कोणी राजाचे वृद्धत्व घेईल तर राजाला पुन्हा तारुण्य लाभेल!’ याबाबतीत देवयानीच्या मुलांनी असमर्थतता व्यक्त केली, पण शर्मिष्ठेच्या पुरुने राजाचे वार्धक्य स्वीकारले आणि राजा पुन्हा तरुण झाला. पुढे बऱ्याच वर्षांनी राजाला उपरती झाली आणि त्याने पुरुला सांगितले की,‘माझी जरा मला दे आणि तुझे तारुण्य तू घे’ तेव्हा पुरु म्हणाला,‘आता वार्धक्य तुम्हाला सुखदायी ठरणार नाही तेव्हा या जरेचे काय करायचे मी पाहतो.’ स्वतःच्या कुटुंबासहीत पुरु गौतमीच्या दक्षिण तटी आला. त्याने शिवाची उपासना करुन गौतमीस्नान केले आणि शिवकृपेने तो पुन्हा तरूण झाला.

पुरुतीर्थ कालंजरतीर्थ। नाहुषतीर्थ शौक्रतीर्थ। शर्मिष्ठातीर्थ ऐशी तेथ। तीर्थे आहेत नारदा।।

आता विश्वामित्र ऋषींची कथा येते. महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचे एकच ध्येय होते ते म्हणजे त्यांना महर्षी वसिष्ठांसारखे व्हायचे होते. पण काहीतरी असे घडायचे आणि ते वसिष्ठांपेक्षा कमी लेखले जायचे! एकदा हिमालयीन गंगद्वारी तप करत असताना स्वर्गीय मेनकेने त्यांचे तपोभंग केले आणि पुढे शकुंतलेचा जन्म झाला. यामुळे स्वतःवरच रागवलेले विश्वामित्रऋषी गंगातीर सोडून तडक दंडकारण्यी गोदामाईकडे आले. पुन्हा ‘गंभीरा’ आणि ‘अतिगंभीरा’ नावाच्या दोन नृत्यकलानिपुण अप्सरा त्यांचे तपोभंग करण्यास आल्या. पण गोदाकाठच्या प्रासादिक वातावरणात ऋषीवर्य ज्ञान-भक्तिरसात न्हाऊन निघालेले पाहताच त्यांना पश्चात्ताप झाला आणि आपल्याकडून झालेल्या चुकीचे प्रायश्चित ऋषींना विचारु लागल्या तेव्हा विश्वामित्रांनी त्यांना गौतमीत स्नान केल्याने त्या शुद्ध होतील, असा आशिर्वाद दिला. पुढे गौतमीला मिळणाऱ्या दोन नद्यांना गंभीरा, अतिगंभीरा अशी नावे देण्यात आली.

ही कालंजरपुरुतीर्थे भली। कल्लोळ गावाचिये जवळी। येथे स्नान केल्या मुळी। पापताप दैन्य नुरे।।

याच कल्लोळ गावाच्या पूर्वेला गोदामाईत एक कोटीतीर्थ आहे. या ठिकाणी एकदा कण्वऋषींचा पुत्र बाल्हिक हा यज्ञात आहुती देत होता. एक आहुती देऊन, दुसरी देईपर्यंत अचानक अग्नि शांत झाला त्याने बाल्हिकाला खुप दुःख झाले. कारण असे पूर्वी कधीच घडले नव्हते. तेवढयात आकाशवाणी झाली की, ‘बाल्हिका, त्या अर्धजळालेल्या काष्ठींमधे आहुती दे, कारण यज्ञकुंडात अग्नि दिसत नसला तरी त्यापासून निर्मित अग्न्योंश आहे. त्यामुळे अग्नी संतुष्टच होणार आहे.’ बाल्हिकाने तसे करुन कार्यपूर्ती केली.

आता भगवान नृसिंहांविषयी असे सांगतात की, हिरण्यकशिपुला ठार केल्यावर नृसिंहांनी स्वर्ग आणि पाताळात विचरण करून कुणी दुष्ट उरलाय का हे शोधले. त्यानंतर त्यांनी गोदेच्या उभयतटी, अगदी गंगाद्वारापासून ते पूर्वसागरापर्यंत भ्रमण केले. कारण प्रल्हादाप्रमाणेच भगवान नृसिंहानांही गोदावरी अतिप्रिय! त्यामुळे गोदेकाठी त्यांची असंख्य मंदिरे आहेत. असो!

आता शुनःशेपाची कथा आपण पाहीली आहेच. या शुनःशेपाला त्याच्या पित्याने,अजीगर्ताने विकलेले आपणास माहीत आहे.त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून अजीगर्ताला पिशाचयोनी प्राप्त होते..त्यातून त्याची सुटका व्हावी म्हणून शुनःशेप गोदाजलाने पितृतर्पण करतो तेव्हा अजीगर्ताला मुक्ती मिळते.

तेच हे पिशाचतीर्थ। विष्णुपुरीच्या पश्चिमेस सत्य। तेथे स्नानकर्त्याप्रत। दुर्गति ना कदापि।।

पुढे पुरुरव्याच्या कुळातील ऐल राजाविषयी सांगतात. हा ऐल राजा उर्वशीबरोबर राहात होता. अखंड वासनेच्या आहारी गेलेल्या राजाबरोबर राहाणे उर्वशीला असह्य झाले आणि ती त्याला सोडून निघाली तेव्हा ऐलाने तिची खूप मनधरणी केली पण त्याच्या विकृतीची किळस येवून ती निघून गेली. राजावर मोठा आघात झाला. तो जळीस्थळी काष्ठीपाषाणी तिला शोधू लागला, तेव्हा त्या वासनांध ऐल राजाला वसिष्ठ ऋषी भेटले आणि त्यांनी त्याला उपदेश करून त्याच्या जीवनाला दिशा दिली आणि म्हणाले…

जा असाच गौतमीतीरी। हरीहरांचे चिंतन करी। गोदावरीचे पवित्र वारि। पालटवील चित्त तुझे।।

आणि तसेच झाले. गोदामाईच्या पवित्र वातावरणात ऐल राजा वासना विकारातून मुक्त झाला.

हे निम्न उर्वशी-ऐलतीर्थ। नांदेडाच्या पश्चिमेस। येथे स्नानकर्त्याप्रत। उत्तम लोक मिळतसे।।

यापुढे चंद्राकडून गुरुपत्नीगमनाचे पातक झाल्याचे सांगतात. एकदा चंद्र बृहस्पतींच्या घरी गुरूपूजनास गेला. तेथे त्यांच्या सुंदर पत्नीला, ताराला पाहून स्वतःचे संस्कार विसरला आणि तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तारेने त्याला धिक्कारले. हे जेव्हा बृहस्पतींनी पाहिले, तेव्हा त्यांनी चंद्राची निर्भत्सना केली पण चंद्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मग बृहस्पतीने चंद्राशी युद्ध केले त्यात चंद्र विजयी झाला आणि त्याने तारेला पळवून नेले. बृहस्पती केविलवाणा पृथ्वीवर हिंडू लागला. त्याने ही गोष्ट आपल्या मित्राला शुक्राचार्याला सांगितली. दोघेजण गौतमीतीरी आणि त्यांनी कठोर तप केले आणि सिद्धी प्राप्त होताच शुक्राचार्यांनी चंद्राला शाप दिला की, त्याला कोड फुटेल. अर्थातच दोन्ही तपस्वींनी गोदेकाठी आरंभलेले कार्य पूर्ण झाले. आता तारा जरी चंद्राने पळवून नेली तरी ती स्वतः निर्दोष होती तेव्हा तारा आणि बृहस्पतिंनी गोदास्नान करून, पशुपतिनाथाचे पूजन करून नवीन आयुष्याला सुरुवात केली ते तीर्थ म्हणजे नंदीतटतीर्थ! आता याच नांदेड विषयी सांगतात…

हेच नांदेड नामे नगर। येथे शिखांचे गुरुद्वार। गुरुगोविंद साधुवर। यांची समाधि ती असे।।
जैसा राजा शिवाजी। तैसाच गुरूगोविंद वीरगाजी। ज्याने हिंदूंची राखिली बाजी। यवनसत्र करुन।
परमामृताचा कर्ता। मुकुंदराज तत्वता। तो याच गावीचा होता। शेष आडनाव जयाचे।।
येथे कबिरापरी। झाले एक साक्षात्कारी। यवनवंशमाझारी। शहासाहेब म्हणून।।
नारायणाश्रम स्वामीचा। मठ सिध्द पुरुषाचा। याच गावी आहे साचा। कमळाकर कवि येथेच झाले।।

असा नांदेडचा महिमा सांगून हा अध्याय येथेच थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.