संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या तेवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजची कथा लक्ष्मी आणि दरिद्रा यांच्या वादविवादाने होते. लक्ष्मी म्हणते,

माझ्या परी श्रेष्ठत्व। नाही दरिद्रे तुजप्रत। तु फकीर भिकार गोसाव्याप्रत। सेवुनी सर्वदा तुष्ट राही।।
तू सेविसी ज्या ते गोसावीही। माझी आस करिती पाही। एकही जगी तयार नाही। तुला सदने ठेवावया।।

लक्ष्मीचे बोल ऐकल्यावर दरिद्रा ही तावातावाने बोलू लागली.

दरिद्रा बोलली त्यावर। लक्ष्मी न करी चरचर। अवघे दुर्गुणांचे माहेरघर। तू आहेस जगामध्ये।।
चोऱ्या खून तुझ्यामुळे। मद्यपान व्यभिचार तुझ्यामुळे। ओंगळ असून करिशी चाळे। चट्टी पट्टी वरवरी।।

आणि मग स्वतःच्या समर्थनार्थ सांगते की,

मी ज्याच्या घरात राहते। त्याला मोक्षेच्छा उत्पन्न होते। तुझ्यामुळे पडळ पडते। अवघ्या अपरोक्ष ज्ञानावर।।

असे लक्ष्मी आणि दरिद्रेचे वाद म्हणजेच लक्ष्मीवान व दरिद्री मानवाचे वाद ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की, हा वाद गोदामाईच सोडवू शकेल तेव्हा मंडळी गोदेकाठी आली आणि आता जे गोदामाई बोलणार आहे. ते वाचले की,आपल्याला कळेल की दासगणु महाराजांचा माईवर किती दुर्दम्य विश्वास आहे ते..

ऐसे वदली गोदावरी। की लक्ष्मी श्रेष्ठ भूमीवरी। अर्धांगी जाऊन बसली खरी। ती भगवान विष्णूच्या।।
तू किती केले तरी दासी। त्या लक्ष्मीस शोभसी। गरीबांनी थोरांशी। स्पर्धा करणे बरे नव्हे।।
माझ्या उभयतटाला। स्थान न मिळे तुला। थोडकेही रहावयाला। काळे करी येथूनी।।
ज्यांची निष्ठा मजवरी पूर्ण। ऐसे मद्भक्त जे जे जन। ते ते राहून संपन्न। दुर्घटसा मोक्ष भोगतील।।
माझे ठायी न निष्ठा ज्यांची। ती ती स्थाने तुज रहावयाची। होतील अशुभ ओंगळ साची। यावच्चंद्रदिवाकर।।

आता हा सर्व संवाद कुठे घडला तर सांगतात की,

ही गोष्ट झाली जेथ। तेच नारदा लक्ष्मीतीर्थ। हे मोगऱ्याच्या पूर्वेस सत्य। थारवांगी जवळकी।।

आता मल्लिकार्जुन स्थानाविषयी सांगत आहेत.

गोलकासूर नावाचा एक असुर खुप उन्मत्त झाला होता. खुप प्रयत्न करूनही तो आटोक्यात येत नव्हता. साक्षात विष्णुं सुध्दा या असुरापुढे निष्प्रभ झाले होते तेव्हा महादेवांनी सांगितले की, ‘याचा अंतइंद्रपत्नी इंद्रायणीच करु शकेल’ त्याप्रमाणे देवांनी  इंद्रायणीकडे प्रार्थना केली, पण जेव्हा ती आली तेव्हा प्रथमदर्शनी गोलकासूर जिंकला, असे सर्वांना वाटले. पण युध्दकलानिपुण इंद्रायणीने त्याच्या गोटात शिरुन त्याच्या रणनीतीच्या चिंधड्या उडवल्या आणि शिवास प्रार्थना केली की, देवा या असुरनीतीवर चालणारा शेवटचा माणूस जोवर संपत नाही तोवर आपण येथेच रहावे.’

ते शिवाने मानिले। मल्लिकार्जुन रुपे तेथे राहिले। निज परिवारासह भले। गोदेच्या उत्तरतटी।।

पुढे सांगतात की, दारिद्रयाला कटाळलेला पैलुष आपल्या पित्याला म्हणजे कवषाला दारिद्रय नावारणाचा मार्ग विचारतो. तेव्हा तो मुलाला गौतमीतटी जावून शिवाला प्रसन्न करून शिवाकडे ‘ज्ञानखड्ग’ मागण्यास सांगतो. दंडकारण्यी येवून जेथे पैलुषाला ‘ज्ञानखड्ग’ मिळते ते ठिकाण म्हणजे ‘खड्गतीर्थ’ जे कान्हेगावासमीप आहे. पुढे अत्रिनंदन इंद्राचे वैभव पाहून विकारवश होतो. आता त्याच्यासाठी काय अशक्य? तो इंद्रापेक्षाही वैभववान होतो पण, लवकरच त्याला या भौतिक सुखाचे क्षणभंगुरत्व कळते व आत्मिक सुखाचे महत्त्व कळते. तो पुन्हा स्वतःचे पूर्वजीवन स्वीकारतो. हे सर्व गौतमीतटी घडते. एवढे सांगून हा अध्याय येथेच थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.