संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या एकविसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

अध्यायाची सुरुवात गोदा-सिंदफना संगमाने होते. एक ‘नमुची’ नावाचा दैत्य होता. तो अत्यंत उन्मत्त झाला होता. कारण त्याला असा वर होता की, कुठल्याही ओल्या किंवा सुक्या वस्तुपासून त्याला मृत्यू येणार नाही. त्यामुळे तो देव आणि मानव सर्वांनाच त्रासदायक ठरत होता.

नमुचीच्या वधासाठी। देवांनी केल्या खटपटी।

विचार करुन शेवटी। युक्ति ऐशी योजिली।।

की सिंधुफेने-करुन। नमुचीचे साधु मरण।

ते शक्राने करुन मान्य। गेला नमुचीशी लढावया।

शक्रे सिंधुफेन घेऊन हाती। प्रेरिला नमुचीचेवरती।

तेणे तात्काळ महीवरती। कलेवर त्याचे पडले की।।

नमूचीचा वध झाला। गोदेच्या दक्षिण तटाला।

जो सिंधुफेन होता पडला। त्याची नदी झाली की।।

नमुचीला मारण्यासाठी वापरलेला सिंधफेन ज्या नदीत पडला तिला सिंधफणा असे नाव दिले गेले. पुढे असे सांगतात की, हनुमंताची दुसरी आई जिचे नाव मार्जारी होते. तिलाही या सिंदफणा-गोदा संगमावर स्नान करुन मुक्ती मिळाली.

आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मंजरथतीर्थाची कथा येते. या स्थानाला गोदामाईचे हृदय म्हटले जाते. एकदा महाशनी नावाचा राक्षस जो हिरण्यासुराचा पुत्र असतो त्याने इंद्राला पाताळात डांबून ठेवले आणि त्यानंतर पश्चिमेकडील वरुण राजाला जिंकण्यासाठी गेला तेव्हा वरुण राजाने युक्ती केली आणि स्वतःची कन्या वारुणी हिचे महाशनीबरोबर लग्न लावून दिले. त्यामुळे त्याचे राज्यही वाचले आणि महाशनीबरोबर त्याची मैत्रीही झाली तेव्हा देवांनी वरुणाला मध्यस्थी करायला लावून महाशनीच्या तावडीतून इंद्राला सोडवले. पण त्याला सोडताना महाशनी खुप घालूनपाडून बोलला आणि त्याने इंद्राचा करु नये इतका अपमान केला. इंद्र स्वतःच्या राजधानीत म्हणजे अमरावतीला आला पण, त्याच्या मनातून महाशनीने केलेला अपमान काही केल्या जाईना. तेव्हा त्याने मनातील सल इंद्रायणीकडे बोलून दाखवला की, ‘महाशनीचा वध केल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. तूच सांग मी काय करु?’ तेव्हा इंद्रायणीने इंद्राला गौतमीतटी जावून हरिहराची उपासना करण्यास सुचवले.

ते इंद्राने ऐकिले। हरिहरास प्रसन्न केले।

गोदातटाकी येवून भले। महाशनीच्या वधार्थ।।

नारदा हरिहरात्मक पुरुष एक। उत्पन्न झाला गोदेत देख।

ज्याचे नाव अब्जक। शूलचक्र करी ज्याचे।।

नारदा या पुरुषानी। मारिला तो महाशनि।

हर्षली इंद्रइंद्रायणी। तैसेच अवघे दिवौकस।।

त्या अब्जक देवाची। देवांनी पुजा केली साची।

मूर्ति गोमटी अब्जकाची। हरिहरात्मक नारदा।।

ही गोष्ट घडली जेथ। तेच नारदा अब्जक तीर्थ।

हृदय स्थान म्हणतात। गोदेचे याच तीर्था।। 

याच स्थानाला मंजरथ म्हणतात, असे सांगून येथे अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधल्याचा उल्लेख करतात. शिवाय  तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती फारशी बरी नसल्याचे सांगून पुन्हा इतिहासाकडे वळतात.

आता कशाचा शालिवाहन। हेमाद्रि गुणनिधान।

रामराजा सुलक्षण। आता न अनागोंदीचा।।

छत्रपती राजा शिवाजी। विश्वनाथहृदयरत्न बाजी।

अहिल्या होळकरीण धर्म गाजी। गेली हाय रे गत दैवा।।

अशी खंत व्यक्त करतात.

पुढे आपस्तंब ब्राह्मणाची कथा येते. या ब्राह्मणाला सुलक्षणी ही अक्षसुत्रा नामक पत्नी व कर्कि नामक पुत्र होता. एकदा अचानक त्यांच्या घरी अगस्ति ऋषी आले. आपस्तंबाला खुप आनंद झाला. त्याने महर्षींचे स्वागत, पाद्यपूजन करून उत्तम आदरातिथ्य केले. नंतर त्यांना विचारले की, ‘ब्रह्मा विष्णू महेशांपैकी कोणता देव श्रेष्ठ आहे. हे कृपया सांगावे!’ तेव्हा महर्षी अगस्ति म्हणाले,

    तुला इहपर सुखाची। इच्छा असल्या जाण साची।

     तु उपासना शिवाची। गोदावरीस जावून करी।।

त्याप्रमाणे महर्षी अगस्ति गेल्यावर आपस्तंब गोदेकाठी एकांत पाहून शिवोपासना करू लागला. त्याचे तपोबल पाहून महादेव प्रसन्न झाले आणि आपस्तंबाला इहपर सुखाची प्राप्ती झाली. हे स्थान मंजरथतीर्थाच्या पूर्वेला आहे. पुढे यमाच्या आश्रयाने राहणाऱ्या ‘सरमेची’ कथा येते.

यमाश्रित सरमा देवकिंकरी। होती एक नारदा खरी।

तिला देवांनी पहा-यावरी। ठेविली यज्ञधेनूच्या।।

ते यज्ञाचे गोधन। घेतले असुरांनी हिरावून।

ते सांगावया वर्तमान। सरमा गेली इंद्राकडे।।

असुरे गोधनाचे हरण। केले हे शब्द ऐकून।

बृहस्पति बोलला गर्जून। इंद्रा हे कृत्य सरमेचे।।

तेव्हा इंद्राने सरमेला शाप दिला की, तु पृथ्वीवर कुत्र्यासारखी वणवण हिंडशील. त्याप्रमाणे सरमा मृत्यूलोकी आली. इकडे यज्ञीय धेनू सोडविण्यासाठी देव श्रीविष्णूंना शरण गेले. विष्णुंनी आपल्या शार्ङ्गधनुष्याने असुरांचा निःपात करून गोधन सोडवले. आता यम आपल्या पित्याकडे म्हणजे सूर्याकडे सरमेच्या मुक्तीचा उपाय विचारण्यासाठी गेला तेव्हा सूर्याने त्याला गौतमीतटी जावून ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिदेवांची उपासना करण्यास सुचवले. यमाने ते आमलात आणले आणि पुढे त्रिदेव प्रसन्न होऊन सरमेचा उध्दार झाला. हे यमतीर्थ यमाचीवाडी येथे आहे तर जेथे विष्णुंनी राक्षसांना बाण मारले ते बाणेगाव. येथे विष्णुंचे शक्तीस्थान आहे. जेथे यज्ञीय गोधन ठेवले होते ते ठिकाण म्हणजे छत्रबोरगाव! असा स्थान महिमा सांगून कथा पुढे जाते.

विश्ववसूची भगिनी पिप्पला अत्यंत उनाड असते. यज्ञकर्म करणाऱ्या ऋषी-मुनींची टिंगल टवाळी करणे हा तिचा छंद असतो आणि विश्ववसूची बहिण म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने ती वाहावत जाते. विश्ववसूंनी महादेवांना प्रार्थना करून यावर उपाय विचारला. तेव्हा महादेवांनी तिला गौतमीच्या शुद्ध, संस्कारी वातावरणात आणून ठेवण्यास सांगितले आणि गौतमीच्या प्रासादिक वातावरणाने तिचे जीवन बदलले. येथे यक्षिणी-गोदा संगम आहे. या संगमस्थळी रत्नेश्वर रामपुरी नावाचे गाव आहे. पुढे भारद्वाज मुनींनी गौतमीतटी आरंभलेल्या यज्ञाचा ‘पुरोडाश’ भक्षिण्यासाठी यज्ञधूरामधून ‘हव्यघ्न’ नावाचा असुर आला. तेव्हा भारद्वाजाने त्याला सांगितले की, असुराने देवांचा भाग खाऊ नये. त्यावर हव्यघ्न म्हणाला, ‘तसे असेल तर माझ्यावर अमृतसिंचन करा. ज्याने माझी या असुरयोनितून सुटका होईल’ तेव्हा मुनिवर म्हणाले की, ‘आता अमृत कोठून आणू?’ आणि गौतमीजल हे साक्षात अमृत असल्याचे असुराने सांगितले. ऋषींनी त्यावर गौतमीजलाचे सिंचन केले तेव्हा त्याच्या शरीराचा रंग पालटला. त्याला सुस्वरुप प्राप्त झाले आणि हे स्थान शुक्लतीर्थ म्हणून ओळखले गेले जे लिंबगावासमोर आणि मोगरे गावाच्या पश्चिमेस आहे, असे सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

– मधुमालती जोशी

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *