संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या एकोनिसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजच्या अध्यायाची सुरुवात महर्षी अगस्तिंच्या यज्ञाने होते. देवांच्या प्रेरणेने अगस्तिऋषी दक्षिणेकडे प्रयाण करतात. वाटेत विंध्याचल पर्वत लागतो. पर्वतीय लोक मुनिवरांचे आदरातिथ्य करतात आणि त्यांना दुर्गम अशा विंध्याचलातून दक्षिणेकडे जाण्यासाठी वाटाड्याचे काम करतात आणि महर्षी गौतमीतटी पोहोचतात. गोदेकाठच्या प्रसन्न वातावरणात ते एका वर्षभर चालणाऱ्या यज्ञाचे आयोजन करतात. जेणेकरुन स्थानिक जनता सहभागी होऊन विचारांचे आदानप्रदान वाढेल आणि तसेच झाले. महर्षी अगस्तिंच्या आगमनाने आनंदित झालेले गोदाकाठचे लोक मोठ्या प्रमाणात यज्ञकार्यात सहभागी झाले. त्याच वेळी कैटभासुराचे दोन मुलगे ‘अश्वस्थ’आणि ‘पिप्पल’ तेथे आले आणि

पिप्पलाने ऋषिवेष घेतला। साम शिकवू लागला। जमवून ऋषींच्या मुला। आपल्या पर्णकुटीमध्ये।।
पोरे वेद शिकावयास। येता पिप्पल सदनास। तो त्यातून एकेकास। पिप्पल भक्षु लागला।।
राहिला वृक्ष रुपे अश्वत्थ। त्याचाही क्रम ऐसाच सत्य। कोणी प्रदक्षिणा घालायाप्रत।येता तो त्या भक्षितसे।।

हा प्रकार लोकांच्या लक्षात आला. त्यांनी तो ऋषीपर्यंत पोहोचवला आणि ऋषींनी शनिदेवांकडे प्रार्थना केली की,  शनिदेवांनी या राक्षस कुमारांचा बंदोबस्त करावा. तेव्हा शनिदेवांनी सांगितले त्यांनी जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्ण झाले की, मग ते या कार्यास हाती घेतील. यावर ऋषींनी शनिदेवाचे कार्य स्वतः पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आणि शनिदेवांना सत्वर मदत करण्याची विनंती केली.

ते शनीस मान्य झाले। तत्काळ द्विजरुप घेतले। गौतमीचे स्नान केले। आणि गेला घालाया प्रदक्षिणा।।
तो नेहमीप्रमाणे अश्वत्थ। भक्षू लागला शनीप्रत। शनीनेच त्याचा अंत। केला नुसत्या नेत्रपाते।।
मग तो शनीदेव दुसरे दिनी। गेला पिप्पलाचे सदनी। तेथेही नेत्रकटाक्षांनी। केला नाश पिप्पलाचा।। 

अशाप्रकारे शनीदेवाने  अश्वत्थ आणि पिप्पल या नरभक्षक राक्षसांचा नाश केला. तेव्हा ऋषींनी शनीचा जयजयकार केला,  हे स्थान

पिप्पल अश्वत्य आणि सौरी। ही गोदावरीच्या दक्षिणतीरी। तीर्थे आहेत निर्धारी। राक्षसभुवनासन्निधी।।

पुढे वनस्पती आणि सोम यांच्या विवाहाचे रुपक आहे. त्याचा अर्थ असा की, गौतमीतटी च्या वनस्पती वर जो काही चंद्रकिरणांचा परिणाम होतो. त्याने त्या अधिक पुष्ट होतात. हे गौतमीचे वैशिष्ट्य आहे.

हे असे सोमतीर्थ। सावळेश्वराजवळ सत्य। त्याच्या पूढे धान्यतीर्थ। शहागडाजवळ असे।।

आता धन्वंतरी राजाची कथा येते. या राजाने अत्यंत न्यायप्रियतेने राज्य केले. प्रजेला पुत्रवत् सांभाळले आणि सर्व वैभवाचा उपभोगही घेतला पण, नंतर राजाला विरक्ती येते. आता आपण मोक्ष प्राप्तीसाठी काही करावे असे वाटू लागते तेव्हा सर्व वैभवाचा त्याग करून तो गंगेकिनारी जातो. अत्यंत संयमी, धर्मपरायण असे जीवन जगतो. तेव्हा ‘तम’नावाचा असुर जो राजाचा जुना वैरी असतो तो अतिसुंदर स्त्रीचे रुप घेऊन राजासमोर येतो आणि राजाचे चित्त गढूळ होते. पुढच्याच क्षणी तो भानावर येतो, पण चूक ती चूक! नेमके तेव्हाच ब्रह्मदेव राजाला वर देण्यासाठी येतात आणि झाल्या प्रकाराबद्दल राजाला दोष देतात तसेच सांगतात की, राजाने तप करण्यासाठी हिमालयात जावे. तेथे कुठली बाधा येण्याची शक्यता नाही. आता राजा धन्वंतरी हिमालयाकडे जातो. तेथे साधना करून विष्णुंना प्रसन्न करून घेतो आणि विष्णुंनी त्याला देवांचा राजा करावे, अशी मागणी करतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते; पण त्याचबरोबर इंद्राचे इंद्रपद जाते म्हणून दुःखी झालेला इंद्र देवगुरू बृहस्पतींकडे येतो. त्यांना सर्व वृत्तांत सांगतो आणि इंद्र आणि बृहस्पती समस्या घेऊन ब्रह्मदेवांकडे येतात. त्यावेळी ब्रह्मदेव इंद्राला सांगतात की, “तुझ्या अकर्मण्यतेमुळे तुझ्यावर वारंवार अशी वेळ येते” इंद्र लाजिरवाणा होतो. ब्रह्मदेव त्याला गौतमीतीरी जावून विष्णू आणि महादेव दोन्ही देवांना प्रसन्न करून घेतले तर पुन्हा इंद्रपद मिळेल असे सांगतात. इंद्र गोदेकाठी जातो आणि हरीहराची उपासना करतो. कर्मयोग करतो तेव्हा हरीहर प्रसन्न होऊन बृहस्पतींना म्हणतात की, त्यांनी इंद्राला गौतमीजलाने स्नान घालावे आणि मग इंद्राला इंद्रपद मिळेल. हे सर्व मंगला-गोदा संगमी घडले. या तीर्थाला पूर्णतीर्थ म्हणतात.

श्रोते हे पूर्णतीर्थ। पाथरवाल्यासंनिध सत्य। दुसरे ते गोविंदतीर्थ। गोंदीजवळ असे की।
संगमजळगावापाशी भली। मंगला नदी गोदेस मिळाली। गंगावाडीचिये जवळी।इंद्रतीर्थ असे की।।

 

आता दासगणु महाराज प्रभू रामचंद्रांचे पिता राजा दशरथ यांच्या अंत्यसमयीचा प्रसंग सांगतात. राजा दशरथांच्या अंत्यसमयी त्यांच्या चारही पुत्रांपैकी एकही पुत्र त्यांच्याजवळ नव्हता तेव्हा पुत्रवियोगाने या धर्मपरायण राजाला मृत्यूनंतर देवलोक प्राप्त होण्याऐवजी यमलोक प्राप्त झाला; पण जेव्हा गोदेकाठी रामचंद्रांनी वडिलांना पिंडदान दिले. तेव्हा गोदेच्या शक्तीने राजा दशरथ पिंड स्विकारण्यासाठी सदेह भूमीवर आले. त्यांचे राम लक्ष्मण सीतेने दर्शन घेतले आणि मग दशरथांनी नश्वर देहाचा त्याग करून वैकुंठी प्रयाण केले. हे सर्व जेथे घडले त्याविषयी महाराज म्हणतात.

शव जेथे पडले। ते शेवतेतीर्थ झाले। रमजगावी अर्पिले। पिंड रामे ते रामतीर्थ।। 

असे सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *