संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठराव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

अठराव्या अध्यायात ब्रह्मतीर्थाची कथा येते. एकदा देवदानवांमध्ये प्रचंड कलह माजला त्यात ब्रह्मदेव देवांच्या बाजूने बोलण्याऐवजी त्यांचीच (देवांची)निर्भत्सना करु लागले. विष्णुंनी ब्रह्मांना गप्प करण्याचे खुप प्रयत्न केले पण व्यर्थ! तेव्हा सर्व देवांनी गौतमीतटी धाव घेतली जेथे महादेवांचे वास्तव्य होते. देवांचे म्हणणे ऐकल्यावर महादेवांनी ब्रह्मदेवांना शांत केले व त्यांच्या वतीने देवांशी बोलण्याची जबाबदारी स्वतः घेतली..तेव्हा ब्रह्मदेव शांत झाले आणि देवांना आनंद झाला

पणव मृदंग आणि भेरी। देव वाजविती नानापरी। अप्सरा त्या अतिकुसरी। नृत्य करु लागल्या।।
शिर जेथे झाले स्थिर। ते ब्रह्मतीर्थ साचार। या तीर्थाचा अपार। महिमा आहे नारदा।।
रुद्रतीर्थ आणि सौरीतीर्थ। या तीर्थाच्या सन्निध सत्य। येथे स्नान केल्या जलात। ब्रह्मज्ञान प्राप्त होई।।
गोदावरीचे तीरी। वडवाळी नामे एक नगरी। रुद्रतीर्थ आणि सौरी।त्या ग्रामाच्या संनिध।।
तैसे अपेगाव म्हणून। उत्तर तटाकी गाव सान। या गावी शोभायमान। ब्रह्मतीर्थ असे की।।

हे अपेगाव श्रीसंत ज्ञानेश्वरांचे गाव आहे.

दासगणु महाराज म्हणतात की, ज्ञानदेवांच्या पुर्वजांना गोदेतील ब्रह्मतीर्थाचे स्नान घडत होते म्हणूनच त्यांच्या कुळात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांसारखी शक्ती जन्मास आली आणि असे सांगून तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करतात,

निवृत्ती ज्ञानेशांचे सदन। एका टेकडीवरी जाण। आता घराची न राहीली खूण। मठ झाला ते ठाई।।
ज्ञानेश्वरांच्या भक्तांनी। अवश्य जावे त्या स्थानी। ब्रह्मतीर्थी स्नान करोनी। ज्ञानेश्वरी वाचावी।।
ही ज्ञानेश्वरादी भावंडे चार। गोदावरीचीच आहे पोर। धन्य गौतमीचे तीर।किती सांगू श्रोतेहो।।           

असे गोदामाईचे महिमान गाऊन आता अविघ्नतीर्थाचे महत्त्व सांगतात. एकदा देवांनी एका यज्ञाचे आयोजन केले, पण यज्ञात सतत विघ्नं येवून यज्ञ काही पूर्णत्वास जात नव्हता तेव्हा देवमंडळी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मांनी चिंतन करुन देवांना विचारले की, यज्ञाच्या प्रारंभी गणेशपूजन केले का? तेव्हा देवाची ते विसरल्याचे मान्य केले. मग ब्रह्मदेवांनी त्यांना गणपतींना प्रसन्न करण्यासाठी गौतमीतटी जाण्यास सांगितले. अर्थातच भगवान गणेश प्रसन्न झाले व देवांचा यज्ञ पूर्णत्वास गेला. जेथे गणपती प्रसन्न झाले ते स्थान.

या अविघ्नतीर्थी केल्या स्नान। विघ्नाचे होय निरसन। हल्ली मुंगी नामे करून। गाव या तीर्थाजवळ असे।।

अशाप्रकारे अविघ्नतीर्थाचे माहात्म्य सांगितल्यावर महाराज आता शेषतीर्थाचे महिमान सांगत आहेत.

आता शेषतीर्थाचे। कथन नारदा ऐक साचे। रसातली राक्षसाचे। प्राबल्य झाले अनावर।।
त्यांनी रसातलपति शेषाला। बाहेर हाकून लाविला। तेणे महानाग त्रस्त झाला। आणि आला शरण मज।। 

असा रसातलाचा राजा शेष स्वतःचे राज्य गमावल्यावर ब्रह्मदेवांस शरण गेला. तेव्हा ब्रह्मांनी त्याला गौतमीतटी महादेवांस शरण जाण्यास लावले. महादेवांनी त्याला राक्षसांचे हनन करण्यासाठी त्रिशुल दिले! पुढे..

ते शेषाने ऐकून। शिवासी केले वंदन। महीस विवर करून। निघून गेला रसातला।।
विवरावाटे गोदावरी। गेली रसातलामाझारी। तेणे नागाच्या अंतरी। अत्यानंद जाहला।।
शूलाघाते राक्षस मेले। नागा निजस्थान मिळाले। मग शेषे पुनरपि केले। आगमन शिवाकडे।।

आणि शेषामागे रसातलात गेलेली गोदामाई पुन्हा भुमीवर येवून मूळ प्रवाहाला मिळाली. त्यास्थानी शेषाने यज्ञ केला आणि ते स्थान शेषतीर्थ म्हणून ओळखले गेले. पुढे वडवातीर्थाची कथा येते. शमितार नावाचा मृत्यूचा अधिकारी नैमिष्यारण्यात यज्ञ आरंभतो. ऋषींचा आशिर्वाद त्याच्या पाठीशी असतो. या शमिताराचे वैशिष्टय असे की, तो कुणाचा वध करीत नाही. याने देवांना चिंता वाटते की, अशातोंड सृष्टीचे चक्र कसे चालणार? पण यावर उपाय करण्यासाठी ते चुकीचा मार्ग अवलंबतात. ते राक्षसांना शमिताराच्या यज्ञाचा विध्वंस करायला सांगतात. त्यामुळे चिडलेले ऋषी महादेवांना शरण येतात. तेव्हा शंकर त्यांना गोदातटी यज्ञ केला तर तो पूर्णत्वास जाईल, असा आशिर्वाद देतात. जेव्हा यज्ञ सूरू होऊन देवांना हविर्भाग द्यायची वेळ येते तेव्हा देव यज्ञस्थळाकडे निघतात आणि त्यांच्यावर चिडलेले ऋषी त्यांना शाप देतात की, ‘ज्या दानवांची मदत घेऊन देवांनी शमिताराच्या यज्ञाचा विध्वंस केला त्यांच्या बरोबर देवांचे कधीच सौख्य होणार नाही.’ हे सर्व जेथे घडले ते स्थान म्हणजे ‘वडवासंगम’!

पुढे आत्मतीर्थाची कथा येते. एकदा दत्तात्रयांनी अत्रिऋषींना ‘आत्मज्ञान मिळण्यासाठी काय करावे’ असे विचारले तेव्हा ऋषींनी त्यांना शंभुमहादेवांना शरण जाण्यास लावले.

दत्त आले गौतमीतीरी। वंदावया मन्मथारि। शिव म्हणाले गोदेमाझारी। स्नान करावे दत्तात्रेया।।

 त्याप्रमाणे दत्तात्रयानी श्रध्दापूर्वक गौतमीस्नान करताच त्यांना आत्मज्ञान झाले आणि ते स्थान आत्मतीर्थ म्हणून गौरविले गेले. आता ही सर्व तीर्थे कोठे आहेत? तर सांगतात.

शेषतीर्थ नऊगावापाशी। बोरगावच्या उत्तरेसी। वडवातीर्थ सुराळ्याशी। हिरडपुरीशी आत्मतीर्थ।।

आणि अशी या स्थानांची महती सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.