संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सतरावा अध्यायाला नमस्कार करुयात…

आपण आता प्रतिष्ठान नगरीत म्हणजेच पैठण गावी चाललो आहोत. पैठणात आजही नागघाट, नागतीर्थ ही ठिकाणे आहेत. येथे कथा येते शूरसेन राजाची! ज्याला सर्परुपी पुत्र झाला, असे पुराण सांगते. आता सर्परुपी म्हणजे राणी नागकुळातील असली पाहिजे किंवा राजपुत्र सापाच्या स्वभावाचा असू शकतो. दोन्हीही परिस्थितीत तो समाजापासून दूर ठेवणे गरजेचे ठरते. पुढे त्याचा विवाह दूरदेशीची राजकन्या भोगावती हिच्या बरोबर होतो आणि तेही प्रत्यक्ष राजकुमाराला न नेता त्याच्या तलवारीबरोबर लावले जाते. आता राजकन्या त्याची उत्तम सेवा करते तेव्हा तिच्या सानिध्याने त्याचा स्वभाव बदलतो. आपण आजच्या जगातही लबाड माणसाला लांडगा, कोल्हा म्हणतो तर मूर्खाला बैल, गाढव म्हणतो. शूर माणसाला वाघ, सिंह तर शांत, स्वभावाच्या स्त्रीला गरीब गाय म्हणतो, तसेच आयते खातो त्याला नागोबा म्हणतो. पण,  पुराणातील रुपकांना धक्का लावत नाही. असो!

अशा या बदललेल्या, सुधारलेल्या राजकुमाराला राज्यभिषेकाच्या वेळी गोदावरीत स्नान करून शुध्द केले जाते. तेव्हा तो म्हणतो की, नक्कीच गतजन्मात त्याच्याकडून काही पातक घडले आहे. म्हणून या जन्मी तो जनसंपर्कापासून लांब राह‌िला. पण, गौतमी कृपेने सारे काही ठीक होते! आजही त्या तीर्थास नागतीर्थ म्हणतात.

आता महाराज तत्कालीन वर्तमानात तसेच माऊलींच्या काळात जातात..

श्रोते या नागतीर्थावरी। हल्ली मशीद आहे खरी। येथेच वदविले वेद चारी। ज्ञानेश्वरे रेड्यामुखे।।
आता मातृतीर्थाचा। इतिहास नारदा ऐक साचा। एकदा देव दानवांचा। युद्धप्रसंग जुंपला असे।।

अशाप्रकारे आता मातृकांचे महिमान सांगतात. एकदा देवदानवांचे युद्ध जुंपले. दानव काही केल्या आटोक्यात येईना तेव्हा देव महादेवांना शरण गेले. आता पौराणिक कथेप्रमाणे महादेव क्रोधाने दैत्यांवर धावून गेले. तेव्हा झालेल्या श्रमाने त्यांना जो घाम आला. ते घर्मबिंदू जेथे पडले त्यातून मातृका निर्माण झाल्या आणि त्या मातृकांनी दैत्यांना सळो की, पळो करून सोडले.

आता हे रुपक उलगडून पाहू. शेतात आलेल्या धान्याला आपण काय म्हणतो? ‘घामातून मोती पिकले!’ आता घाम म्हणजे परिश्रम आणि मोती म्हणजे धान्य! तसेच नदीला संरक्षण मिळावे यासाठी मातृका या देवतेची निर्मिती झाली. गावोगावच्या नद्यांमध्ये हे मातृकापूजन केले जाते. लहान मुलांना मातृकांच्या दर्शनासाठी नेले जाते. मानव आणि नदीचे नाते घट्ट करण्यासाठी या मातृका आल्या. पण, आज आपण नदी आणि मातृका सर्वांनाच कोळून प्यालो. असो!

आता गोदामाईतील विशेष मातृकास्थानाचे वर्णन करतात.

अवघे मिळून निर्जर। मातृकांचा जयजयकार। करून स्थापिल्या अखेर। मिरवत नेऊन प्रतिष्ठानी।
मातृकांची प्रतिष्ठा झाली। या क्षेत्रामाजी भली। म्हणून नामाभिधा मिळाली। याते नारदा प्रतिष्ठान।।
श्रोते मातृकांचे विश्रांतीस्थान। कोकमठाण मातुलठाण। भामाठाण नागठाण। बादाठाण इत्यादि।।
येथे विश्रांती घेऊन। मग आल्या पैठणाकारण। ही मातृकास्थाने परम पावन। इहपर सौख्य देणारी।।

आता पुढच्या ओवींमध्ये पैठणात होऊन गेलेल्या महापुरुषांची आठवण करत आहेत.

येथे नृप शालिवाहन। शककर्ता झाला जाण। हेमाद्री नामे करुन । प्रधान येथेच जाहला ।।
गुणाढ्य आणि चिंतामणी । येथेच गेले होवोनी। भानुदास पुण्य- खाणी। येथेच आला जन्माला ।।
जनार्दनाचे शिष्यरत्न । याच पैठन- खाणीतुन । एकनाथ नाम पावून । उदय पावते जाहले ।।
शिवदिनकेसरी मुक्तेश्वर।। कृष्णादयार्णव साधुवर । येथेच झाले साचार । ज्यांची महती न वर्णवे ।।

अशाप्रकारे पैठणातील महापुरुषांची आठवण केल्यावर पैठण ही महाराष्ट्राची एकेकाळी राजधानी होती, असे सांगतात आणि तत्कालीन परिस्थितीचे महाराज वर्णन करतात आणि व्यथित होतात.

मठमंदिरे पडून गेली। मशीद-थडगी उदया आली। गोदाही वाहू लागली । पलिकडच्या काठाने।
धर्मसंस्था सुव्यवस्थित। तोवरीच चालते सत्य । की जोवरी हातात। तद्धर्मियांच्या राजसत्ता।। 

आणि आता पुढील दोन ओवी वाचकांनी लक्षपूर्वक वाचल्या तर अशा भीषण परिस्थितीतही महाराजांची बौध्दिक स्थिरता आणि विशाल मन दिसते.

पहा मशीदी ज्या झाल्या। त्या यवनसत्तेकरून भल्या। त्या आपण होऊन नाही झाल्या। हे ध्यानात ठेवावे।।
यवनांकडेही बोल नाही। ते निजधर्मे वर्तती पाही। 
म्हणून कोणा येत नाही। दोष लावावया विबुध हो।।
हे गौतमी गंगे गोदावरी । तु ज्या धर्माची देवता खरी। त्याच धर्माची देवता खरी। त्याच धर्माची तव तीरी । मंदीरे व्हावी का नामशेष ?।।
आम्हात द्वेष बळावला। 
ऐक्याचा ठाव मोडला। आता तूच राख धर्माला। ऐक्य अवघ्यांचे करवून।। 

गोदामाईकडे अशी मनोभावे प्रार्थना करून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या आपण भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.