संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सोळाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

प्रवरासंगमानंतर आपण आता वृद्धासंगमाकडे निघालो आहोत. ही वृद्ध गौतममुनिची कथा आहे. हे वृद्धगौतम अतिशय कुरुप होते. जणु सर्व जगातील कुरुपता एकत्र होऊन त्यांच्या वाट्याला आली होती. त्यामुळे ते एकटे एकटेच राहात. असेच फिरत फिरत ते एका गुहेत आले. तेथे एक वृद्धा बसली होती. ती त्यांच्यापेक्षाही कुरुप होती. गौतम तिला नमस्कार करु लागले तेव्हा ती म्हणाली,‘तुम्ही मला नमस्कार करु नका. कारण तुम्ही माझे पति आहात. मी ऋतुध्वज राजाची कन्या आहे. माझी माता सुश्यामा ही गंधर्वलोकीची अप्सरा होती. प्रदीर्घकाळपर्यंत राज्य करून माझे मातापिता वैकुंठी गेले. जातांना माझी माता असे सांगून गेली की,  या गुहेत स्वतःहून जो येईल तोच माझा पति असेल. त्यानुसार कित्येक वर्षे मी येथेच आहे. तेव्हा आपण माझ्याशी विवाह करावा. तसेच तुमचे कुरुपत्व जाण्यासाठी सरस्वती अनुष्ठान करावे.’ तिने सांगितले तसे केल्याने वृद्ध गौतम रुपवान झाले आणि त्या कुरुप वृद्धेशी विवाह करुन तेथून पुढे निघाले. या अशा वेगळ्याच दांपत्याला पाहून काही ऋषीकुमार हसले. तेव्हा गौतम अगस्ति ऋषींना शरण गेले आणि स्वतःच्या पत्नीच्या वृद्धत्व निवारणार्थ काही उपाय विचारला. तेव्हा

अगस्ति बोलले त्यावरी। तू वृध्देसह जा गौतमीतीरी। गोदाजलाचे सिंचन करी। या तव भार्येवर।।     

अगस्ति ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गौतमांनी केले आणि त्या वृद्धेचे वृद्धत्व जावून तिला तारुण्य प्राप्त झाले. ही घटना ढोरा नदी जवळ घडली. ढोरा नदी औषधी वनस्पतींनी युक्त अशा गर्भगिरीच्या डोंगरातून वाहते. कदाचित त्यामुळे त्या पाण्यात काही औषधी गुण असावेत. पुढील ओव्या वाचल्यावर तरी असेच वाटते.

सिंचन होता वृद्धत्वाची। नदी तेथेच झाली साची। नामाभिधा ख्यात इची। जगी ढोरा म्हणून।।
वृद्धेश्वराकारण। म्हातारदेव म्हणती जन। हे म्हातारदेवाचे स्थान। पाथर्डीच्या सन्निध असे।।
ही वृध्दा गोदेस। मिळाली रामडोहाच्या सान्निध्यास। वृद्धासंगमी स्नान केल्यास। वृद्धत्व निमे मानवाचे।।

आता शिवशक्ती जेथे निवास करतात अशा अंबिकावनाची कथा येते. वैवस्वतकुलोत्पन्न ‘इल’ नावाचा राजा मृगया करीत असता त्या अंबिकावनी आला. त्या वनात कुणालाही प्रवेश नव्हता आणि जर कुणी चुकून आलाच तर त्याचे स्त्रीमध्ये रुपांतर होई. या इल राजाबरोबर तेच घडले. पुढे या इलेचा विवाह बुधाबरोबर झाला आणि तिला पुरुरवा नावाचा पुत्र झाला. हा पुत्र समजदार झाल्यावर तिने पुत्राला आपली मूळकथा सांगितली. पुरुरवा खुप दुःखी झाला त्याने पित्याला मातेच्या दुःखाचे कारण सांगितले.त्यावरील उपाय विचारला. तेव्हा

बुध सांगे प्रेमेकरून। पार्वतीपतीचे अनुष्ठान। केल्या इलेलागून। पुरुषत्व लाघेल निश्चये।।
पुसे पुरु त्यावरी। कोठे तो मन्मथारि। बुध सांगे गौतमीतीरी। आहे वास हराचा।।
गौतमीचे सोडून तीर। कोठे न राहे शंकर। जा पुत्रा तू झडकर। त्या गौतमी तीराते।।   

 

पुढे अर्थातच पुरुरवा मातेसहीत गौतमीतीरी आला आणि महादेव अन् गोदामाईच्या कृपेने इलेला मूळरुप प्राप्त झाले.

स्त्रीपणाची नदी झाली। गोदावरीस मिळाली। ही गोष्ट जेथे घडली। तेच इलासंगमतीर्थ।।
या तीर्थाचिया आसमंतात। तीर्थे आहेत अगणित। ऐल राजाने स्थापित। इलेश्वर देवळासन्निध।।
पुरुरव्याने जो पूजिला। तो काळेश्वर काळेगावाला। बुधतीर्थ कृष्णापुराला। गोदावरीचे उत्तरतटी।
जोगलीचिये शेजारी। सौभाग्यतीर्थ निर्धारी। या तीर्थी स्नान केल्यावरी। पाप ताप दैन्य नुरे।।

आता दक्ष प्रजापतिची कथा येते जी सर्वश्रुत आहे. पार्वतीचा पिता दक्ष खुप मोठ्या यज्ञाचे आयोजन करतो. सर्व देवदेवतांना आमंत्रणे जातात. पण महादेवांना मुद्दाम बोलविले जात नाही. असे का केले असेल असा विचार करुन पार्वती पित्याकडे येते. दक्ष प्रजापतिने कन्येचे स्वागत करणे तर दूर साधे संभाषणही कन्येसोबत करत नाही. शिवाय यज्ञात महादेवांना हविभागही देत नाही. आता मात्र दाक्षायणी कोपायमान होते आणि गर्जना करीत ती शिवगणांना म्हणते.

हा दक्ष प्रजापति माजला। वैभवाने अंध झाला। वंचोनिया जमाताला। आरंभिला हा यज्ञ याने।।
जे देवाचे अधिदैवत। ओंकाररुप भोलानाथ। तयासी या यज्ञात। हविभाग न देई हा।।
व्यर्थ मी याच्या उदरी आले। दाक्षायणी नाव पावले। आता हे टाकीते भले। शरीर मी या दुष्टाचे।।
ऐसे बोलून वेदीवरी। उभी राहिली त्रिपुरसुंदरी। उडी कुंडात टाकली खरी। ॐनमः शिवाय म्हणून।। 

 आणि मग काय हाहाकार माजला त्याची कल्पना न केलेलीच बरी. शिवगणांनी यज्ञमंडप उध्वस्त केला आणि शंकराने कोपायमान होऊन रुद्रावतार धारण केला. शिवगण तर कोणालाच आटोपत नव्हते. तेव्हा त्यांना आटोक्यात आणण्यासाठी श्रीविष्णुंनी सुदर्शन चक्र सोडले. तर महादेवाने ते चक्क गिळून टाकले. शेवटी दक्ष शरण आला आणि त्याने शिवस्तवन सुरू केले आणि महादेवांनी त्याला क्षमा करून यज्ञ पुन्हा सुरू करायला परवानगी दिली. पुढे त्याच यज्ञात देवदानवांचे भांडण जुंपले. देवांनी दैत्यांच्या हननासाठी विष्णुंना प्रार्थना केली. तेव्हा आपण या कार्यासाठी असमर्थ असल्याचे विष्णुंनी सांगितले कारण त्यांचे चक्र शंकराने गिळून टाकले होते. म्हणून शिवआराधना करण्यासाठी विष्णू गौतमीतीरी गेले.

 विष्णु येवून गोदातीरी। खडतर तपश्चर्या करी। तेणे प्रसन्न होऊन मन्मथारि। चक्र देता झाला ।।   

महादेवाने हे चक्र जेथे श्रीविष्णुंना दिले ते स्थान सावखेड्याच्या समीप गोदापात्रात आहे. असो!

आता ऐके पिप्पलतीर्थ। नारदा तू सावचित्त। गोदावरीचे महत्त्व। त्रिभुवनात आगळे।।   

 असे म्हणून दधिची ऋषींची कथा येते. पूर्वी जान्हवीच्या तीरावर दधिची ऋषी रहात असत. एकदा देवांनी स्वतःची शस्त्रे दधिचींकडे सांभळण्यास आणून दिली. पुढे वर्षानुवर्षे लोटली तरी देव काही शस्त्रे नेण्यास येईनात. तेव्हा त्या शस्त्रांचे पाणी करून दधिची ऋषींनी ते जल पिऊन टाकले जेणेकरून त्यांचा देहच शस्त्ररुप झाला. कालांतराने देव आपली शस्त्रे मागण्यासाठी आले. तेव्हा तपस्वी दधिची ऋषी म्हणाले,

तै झालेले वर्तमान। ऋषि सांगे त्याकारण। आता अस्त्रांचे प्रयोजन । असल्या अस्थि न्या माझ्या।।
तात्काळ समाधि लावून। देह केला विसर्जन। देव अस्थि घेऊन। जाते झाले दधिचीच्या।। 

जेव्हा दधिचीऋषींनी दैवी कार्यात झोकून देतांना स्वतःच्या हाडांची पर्वा केली नाही आणि संस्कृतीसाठी स्वतःचे बलिदान दिले. तेव्हा त्यांची पत्नी लोपामुद्रा ही गर्भवती होती. ज्या क्षणी ती प्रसूत झाली त्याक्षणी तिने ते नवजात बालक वृक्षवेलींच्या स्वाधीन करून देहत्याग केला. पुढे हे बाळ झाडाझुडपातच मोठे झाले. ज्या वनवासींनी त्याला मोठे केले. त्यांना त्याने विचारले की, ‘मी पुत्र कवणाचा?’ तेव्हा त्यांनी त्याला सर्व हकीकत सांगितली.

पित्याची अवघी हकीकत। वनस्पती मुखे कळता सत्य। कुमार कोपला अत्यंत। नारदा देवकृत्यांनी।।
पिप्पलाद नाव होते त्याचे। औषधीने ठेविले साचे। उसने घ्याया पित्याचे। विचार करी रात्रंदिन।। 

या देवांचा बदला घेण्यासाठी तो कुणाकुणाशी विचारविमर्श करु लागला. अखेरीस सोमराजाने त्याला गौतमीतटी जावून शिवोपासना करण्याचे सुचवले आणि पिप्पलादाने ते आमलांत आणले. शंकर प्रसन्न होताच त्याने देवांना नष्ट करण्याचा वर मागितला. त्याचा हेतू ओळखून महादेव म्हणाले,

पिप्पलादाचा हेतू ऐकिला। भगवान शंकर बोलला। आणिक करी तपाला। काही दिवस वत्सा तू।।
म्हणजे माझ्या तृतीय नेत्राचे। दर्शन तुला होईल साचे। ते होताच कृत्येचे। जनन होईल देवनाशा।।
शिवाज्ञेप्रमाणे। तप केले पिप्पलादाने। घेतले साक्षात दर्शन त्याने। शिवाच्या तृतीय नेत्राचे।।
नेत्रदर्शन होता क्षणी। कृत्या उपजली नेत्रापासुनी। उभी राहीली कर जोडूनी। पिप्पलादासमोर।।  

आणि अशा तपोबलाने निर्माण झालेल्या कृत्येला पिप्पलादाने देवांना नष्ट करण्याची आज्ञा दिली आणि ती कार्यसिध्दीसाठी निघाली तेव्हा सर्व देव महादेवांना शरण आले. आता महादेवाने पिप्पलादाला बोलावून, असे संस्कृतीविघातक कृत्य न करण्यास सांगितले. तेव्हा

पिप्पलाद म्हणे जोडूनी कर। माझा पिता हे निर्जर। वधिते झाले त्यांचेवर। मी कृपा कैसी करु।। 

हे ऐकल्यावर महादेवांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे.

शिव म्हणे ठीक ठीक। तू पिप्पलाद व्यावहारिक। खराच दधिची श्रेष्ठ एक। या त्रिभुवनी जाहला।।
ज्याने देवकार्यासाठी। अस्थि दिधल्या शेवटी। ऐशा उदाराच्या पोटी। तू घुंघूर्टा आलास।। 

 हे शिवाचे वचन ऐकून पिप्पलाद काय समजायचे ते समजला आणि त्याने सांगितले की, ‘जर देवांनी मला माझ्या मातापित्याचे दर्शन घडवले तर मी कृत्या मागे घेईन’ आणि देवांनी ते आनंदाने मान्य केले. पिप्पलादाला मातृ-पितृ दर्शन घडले. त्या क्षणाचे काय वर्णन करावे.

पुढे दधिचीऋषींनी त्याला देवकार्यासाठी कटिबद्ध राहाण्यातच मानव देहाचे सार्थक असल्याचे सांगितले आणि त्याने ते विनयपूर्वक मान्य केले. आता कृत्या शांत झाली आणि ती गोदेत विलीन झाली. हे पिप्पलेश्वरतीर्थ गौतमीतटी वडवासंगमी आहे. जे पैठणजवळच्या कावसन गावी आहे. या अध्यायातील जवळजवळ सर्व गावे जायकवाडी धरणात गेली आहेत. असो!

आजचा अध्याय येथेच थांबतो….तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.