संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या पंधराव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

ब्रह्मदेव नारदांना सांगतात की,,एकदा गंधर्वांनी तपोबलाने सोमाला ताब्यात घेतले. तेव्हा सर्व देव चिंतीत झाले. त्यावेळी सरस्वतीने उपाय सुचविला की, ‘देवहो, मला तुम्ही गंधर्वांना देऊन टाका आणि त्याच्या बदल्यात सोमाला सोडवा’ हे ऐकून देवांना प्रश्न पडला की, ‘सरस्वती’ गंधर्वांना देण्यात आपले नुकसान आहे. तेव्हा सरस्वती हसत म्हणाली, ‘सद्यस्थितीत मी सांगते तसे करा. मी काही युक्ती करुन गंधर्वाकडून पुन्हा येईन आणि देवांनी तसेच केले.’

ही अदलाबदल निर्धारी। गोदावरीच्या दक्षिण तीरी। घडली यज्ञामाझारी। देव गंधर्व जमले असता।।

पुढे यज्ञीय अमृत जे देवांजवळ होते ते गंधर्वांना मिळेना तेव्हा ते अस्वस्थ झाले तेव्हा सरस्वतीने सुचवले की, जर गंधर्वांनी तिला देवांच्या स्वाधीन केले तर त्याबदल्यात त्यांच्याकडून अमृत घेता येईल आणि गंधर्वांनी तसेच केले. हे सर्व जेथे घडले ते ठिकाण म्हणजे सोमतीर्थ. पुराणातील लिखाण रुपकात्मक असते. येथे सरस्वतीने सुचविले याचा अर्थ बुध्दीपूर्वक निर्णय घेण्यात आला आणि अमृत म्हणजे यज्ञकाळात जे ज्ञानांमृत देण्यात येते ते. तिथे प्रवेश न मिळाल्याने गंधर्वांनी स्वतःजवळील विद्या देवांना दिली असा त्याचा अर्थ. हे सोमतीर्थ कोठे आहे? तर सांगतात.

या सोमतीर्थाशेजारी। कायगाव एक नगरी। जी सांप्रत जहागीर खरी। पेशव्यांच्या उपाध्याया।।

आणि आता महाराज प्रवरा-संगम तीर्थाकडे निघालेत!

येथे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाची कथा येते. पुन्हा रुपक! हे समुद्रमंथन म्हणजे समुद्रापेक्षाही खोल असलेल्या मन आणि बुध्दीचे चिंतन. सात्विक आणि भोगवादी वृत्तीच्या लोकांनी एकत्र येवून केलेले.त्यातून जे सृष्टीच्या भल्यासाठी बाहेर आले ते अमृत आणि सृष्टीसाठी घातक ठरलेले ते विष. जे ज्ञानाच्या देवतेने म्हणजेच महादेवाने पिऊन टाकले अर्थात या देवदानवांच्या चिंतनमंथनातून बाहेर पडलेल्या विघातक गोष्टी महादेवांनी बाहेर येऊच दिल्या नाहीत. असो! आता देवगुरू बृहस्पतीने देवांना सांगितले की, अमृत दानवांना द्यायचे नाही. असे का?तर देव ज्या शक्तीचा सदुपयोग करु शकतात त्याच शक्तीचा दानव दुरूपयोग करू शकतात. म्हणून ते दानवांना द्यायचे नाही. तेव्हा राहु नावाचा दानव हुशारीने देवांमध्ये मिसळून जातो आणि त्याला पूर्ण ज्ञान मिळायच्या आत देवांच्या हे देवांच्या लक्षात येते.

तेव्हा नाईलाजास्तव राहूचा शिरच्छेद करावा लागतो आणि राहूचे शिर जेथे जाऊन पडले तेथे आज राहुरी शहर आहे. या राहूरीला गोदामाई नाही. पण तेथून गोदेला भेटायला येणारी प्रवरा ही राहूच्या कर्तृत्वाने आलेली आहे, असा इतिहास आहे.

ज्या भूमीस जावूनी। अमृत प्राशिले देवांनी। ती भूमी त्रिभूवनी। श्रेष्ठ आहे सहजची।।
चतुःसीमा त्या भूमीची। साधारणतः कथितो साची। अमृतस्पर्शे या स्थलाची। योग्यता वाढली विशेष।।
उत्तर पूर्व गोदावरी। पश्चिमेसी सह्यगिरी। दक्षिणेस भीमा साजिरी। आहे जया प्रांताच्या।।

आता प्रवरेमुळे महाराजांचे मन पुन्हा नगर जिल्ह्यात गेले आणि या जिल्ह्यात अमृताचा सडा पडल्यामुळेच अनेक ज्ञानीजन जन्मास आले, असे ते म्हणतात. पुन्हा प्रवरासंगमी येतात.

प्रवरा गोदेस मिळाली। सर्व नद्यात श्रेष्ठ झाली। त्या प्रवरेच्या संगमस्थली। पिनाकी सिध्देश्वर स्थित असे।।
तो सिध्दीचा दाता। म्हणून सिध्देश्वर सर्वथा। या प्रवरासंगमी स्नान करिता। चारही पुरुषार्थ साधती।। 

आता महाराज नेवासे विषयी सांगतात.

प्रवरा-संगमापासून जरी। एक योजन निवासपुरी। तरी ते क्षेत्र गोदातीरी। आहे ऐसेच मानावे।।
ह्या निवासपुरीकारण। हल्ली नेवासे म्हणती जन। येथेची झाला निर्माण। ग्रंथराज ज्ञानेश्वरी।।
वैष्णवाग्रणी ज्ञानेश्वर। येथे होते बहुत काळ साचार। ही चंद्रचूडांची जहागीर। होती सातव्या शतकामध्ये।। 

आता पुन्हा प्रवरासंगमाकडे येवून महाराज म्हणतात.

या प्रवरासंगमतीर्थाचा। महिमा आहे अगाध साचा। पश्चिमेस टोके नावाचा। गाव एक टोकावर।।
येथे श्रीमंत पेशव्यांनी। तसे अन्य अन्य सरदारांनी। भव्य घाट बांधोनी। ठेविले आहेत गोदेस।।

आता ही ओवी लक्षपूर्वक वाचा.

या घाटासी पाहता। हिंदू वैभवाची आठवण चित्ता। होऊनिया देशभक्ता। रडे कोसळे निःसंशय।।
बांधणी सिध्देश्वर मंदिराची। अतिशय उत्तम असे साची। ज्यायोगी पूर्वीची। कारागिरी ये कळून।।     

पुढे गावे ओस पडली आणि प्रचंड धर्मांतर होत आहे, अशी समस्या मांडतात.

हाय हाय हे गोदावरी। डोळे उघड आतातरी। तुझ्या पवित्र तीरावरी। धर्मांतर होऊ नये।।   

 आणि हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *