संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या चौदाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजची कथा पुरुरवातीर्थाने सुरू होते. एकदा पौरवांचा राजा पुरुरवा उर्वशीसह देवसभेत गेला. तिथे बसलेल्या रुपसंपन्न सरस्वतीला पाहून त्याचे मन विचलित झाले. उर्वशीला मध्यस्थी करायला लावून त्याने सरस्वतीच्या जीवनात प्रवेश मिळवला आणि सरस्वतीला मुलगा झाला. त्याचे नाव सरस्वान! हा सर्व प्रकार ब्रह्मदेवांस कळला आणि त्यांनी सरस्वतीला मृत्यूलोकी जाण्याची शिक्षा फर्मावली. भयभीत सरस्वती गौतमीतटी आश्रयाला आली.

तिथे तिने गोदेची। प्रार्थना केली असे साची। ज्यायोगी तीर्थांची। जननी प्रसन्न जाहली।
वृद्धा गौतमी गोदावरी। ब्रह्मलोकास आली खरी। थोराने हाती धरल्यावरी। काय एक न होय।।

अशाप्रकारे गौतमीच्या मध्यस्थीने सरस्वतीला उःशाप मिळाला की, मृत्यूलोकी ती अदृश्य होऊन राहील.

नारदा या स्थानाप्रत। सरस्वतीसंगम म्हणतात। आणि हेच पुरुरवा क्षेत्र। सकल कामना पुरविते।।
हा सरस्वतीसंगम निर्धारी। मातुल स्थानाच्या समोरी। तीर्थजननी गोदावरी। कोणा न घे उदरात?।

आता महाराज पंचतीर्थाकडे वळतात. संपूर्ण सृष्टी ही ब्रह्माचीच संतान आहे. मग तो मानव असो की, पशू असो! वनस्पती, पर्वत असो की नद्या. अशाच ब्रह्मनिर्मित पाच नद्या. श्रध्दा, मेधा,सावित्री, सरस्वती आणि गायत्री.

या पंच नद्यांचे संगम। अन्य अन्य ठिकाणी अत्युत्तम।।
श्रध्देने ते धरिले नाम। कात-ओढा म्हणून। ही पुण्यस्तंभापाशी। मिळाली गोदावरीशी। याच काताच्या उत्तरेसी। शिर्डी नामे ग्राम एक।।

आता महाराज शिर्डीकडे वळले आहेत.

श्रीसाईबाबांचे परम भक्त असलेले महाराज बाबांना कबिराचा अवतार मानतात. हे सांगतांना त्यांचे गोदाप्रेम पहा कसे येते.

त्या कबिरावतारी। हे राहिले जान्हवीतीरी। ये अवतारी गोदातीरी। राहिले येवून श्रध्देजवळ।।

श्रीसाईबाबांचा ‘श्रध्दा-सबुरी’ हा मंत्र आणि श्रध्दानदीकाठी (कात-ओढा) शिर्डीस त्यांचे वास्तव्य हे महाराजांना पूर्वसंचित वाटते आणि श्रध्देचे गोदामाईस मिळणे हे अहोभाग्य वाटते! पुढे…

मेधा पुरणगावाशी। येऊन मिळाली गोदेसी। सावित्रीच्या संगमापाशी। बाभूळगाव खेडे असे।। 

 या बाभूळगावात राजाराम नावाचे महंत रहात असल्याचे सांगतात. तसेच त्यांचा मठ मोडकळीला आल्याचेही वर्णन आहे. या ठिकाणी…

हा द्वितीय संगम सरस्वतीचा। नायगावापाशी साचा। पवित्र ओघ गायत्रीचा। नाऊर वांजर गावाजवळ।।
वांजर गावी बेटात। साधु गंगागीर विख्यात। झाले अठराव्या शतकात। कंठमणि हरीचे।।

असे सदगुरू गंगागीर महाराजांचे वर्णन करुन महाराज प्रियव्रत नावाच्या राजाने केलेल्या यज्ञाबध्दल सांगतात.

नारदा प्रियव्रत नावाचा। राजा होऊन गेला साचा। त्याने समारंभ यज्ञाचा। मांडिला गोदेच्या दक्षिणतटा।।
त्या यज्ञालागून। अवघी ऋषी मंडळी देवगण। 
जमले होते घडेल स्नान। गोदावरीचे म्हणूनी।।

अशा मंगलसमयी हिरण्यक दैत्य यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आला आणि मग रंगाचा बेरंग झाला.

आता पौराणिक वर्णनाप्रमाणे सर्व देव वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले आणि महर्षी वसिष्ठांनी त्या दैत्याला पळवून लावले. याचा अर्थ जसे कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यास लावले तसेच येथे देवांनी वसिष्ठांच्या कामात ढवळाढवळ केली नाही आणि यज्ञासाठी अवतरलेल्या या दैवी शक्ती जेथे वास्तव्यास राहिल्या ती ठिकाणे तीर्थक्षेत्रे झाली.

प्रियव्रततीर्थ अमरापुरी। वसिष्ठ नेवरगावावरी। ब्रह्मतीर्थ खानापुरी। पिंपळगावी विष्णुतीर्थ।।
डाग अश्वत्थपणाचा। विष्णुस लागला साचा। डाग पिंपळगाव नावाचा। गाव आहे ते ठाई।।
सूर्य सुरेगावात। चांदेगावी निशानाथ। सराळेगावी पार्वतीकांत। वटरुपाने राहिला।
यज्ञगोधन गोवर्धनी। यम बगडीच्या ठिकाणी। बेल पांढरी ज्या स्थानी। तेथे अश्विनीकुमार।।
महाकाळ वडगावी भैरव। जैनपुरी गंधर्व। ममदापुरी समुदाव। लपला अवांतर ऋषींचा।।
अवलगावी देव वाहने। लपले घोगरगावी भयाने। हिरण्यकाच्या घोराने। उपदेव नारदा।।

पुढे सांगतात की, कमालपुराला यज्ञविध्वंसक शक्ती राहिल्या होत्या. म्हणून आजही याठिकाणी मुलांना गोदास्नानास जावू देत नाहीत, असो!

आता शुनःशेप, हरिश्चंद्रतीर्थ। वरुणतीर्थ परम पवित्र। यांचा इतिहास एकत्र। ऐक तुज सांगतो।। 

आणि सांगतात की, राजा हरिश्चंद्राला भेटायला पर्वत येतो. राजाला संतती नसल्यामुळे पर्वत चिंता व्यक्त करतो. त्याला वरुणाची उपासना करण्याचा सल्ला देतो. तेव्हा उपासनेसाठी राजा गौतमीतटी येतो. कालांतराने वरुण प्रसन्न होतो पण, एका अटीवर संतान होण्याचा आशिर्वाद देईन, असे म्हणतो.

त्याची अट अशी असते की, संतान होताच राजाने त्याला वरुणाला द्यायचे. राजा विचार करतो की, जर झालेले मुल वरुणाला द्यायचे तर अशा मुलाचा काय उपयोग? पुन्हा राजा विचार करतो की, संतती झाल्यास आपल्यावरीर निपुत्रिकपणाचा कलंक जाईल आणि पुढचे पुढे पाहता येईल. तो वरुणाची अट मान्य करतो. जेव्हा राजाला मुलगा होतो तेव्हा वरुण दारात हजर होतो. राजा वरुणाचा पाहूणचार करून म्हणतो,‘अरे मुलगा तुझाच आहे पण, ही काय त्याला नेण्याची वेळ आहे का? त्याला दात येवू दे. थोडे खाऊपिऊ दे. नंतर ने!’ वरुण निघून जातो. असे वारंवार घडते. मुलगा मोठा होतो. शेवटी राजाची नियत पाहून वरुण राजाला शाप देतो की,  ‘तुला जलोदर होईल आणि राजाला जलोदर होतो’ हा सारा वृत्तांत राजकुमार रोहितला कळतो. पित्याच्या दुःखनिवारणार्थ तो तीर्थयात्रेस निघतो. फिरतफिरत एका निर्धन ब्राह्मणाकडे पोहोचला. त्याला तीन मुले होती. यापैकी मधल्या मुलाचे नाव होते शुनःशेप.

हा ऋषी अजीगर्त। दरिद्री असे अत्यंत। त्याने द्रव्य घेऊन रोहिताप्रत। शुनःशेप विकिला की।।
शुनंशेपासी घेऊनी। रोहित आला निज सदनी। हरिश्चंद्रास वंदोनी। वृत्त अवघे कथन केले।।

पण हरिश्चंद्राला हे पटले नाही. तेव्हा काही जाणकारांनी त्याला गोदावरीकाठी जावून यज्ञ आरंभला तर विघ्न दूर होईल आणि शुनःशेपाला काही होणार नाही, असे समजावले. यज्ञाची तयारी झाली मान्यवरांसमवेत विश्वामित्रांसारखे दिग्गज ऋषी आले. शुनःशेपाला बली जाणाऱ्या पशूसारखे सजविण्यात आले. तेव्हा..

भय मृत्यूचे अतोनात। वाटले शुनःशेपाप्रत। त्याने देवऋषीस दंडवत। घालून ऐसे बोलला।
तुम्ही ज्ञाते अवघे मुनी। जाणता ब्रह्मालागोनी। तुम्ही दयेची प्रत्यक्ष खाणी। ऐसे शास्त्र सांगते।।
द्रव्यलोभ धरुनी। मायबापे मजलागुनी। ओपिले या त्यजुनी। वात्सल्यप्रेम मुनिवरा।।

हे ऐकून सर्वांचे मन द्रवले… या मुलाचा बळी घेतला तर मलाच पाप लागेल, असे वरुण म्हणाला. तर महर्षी विश्वामित्रांनी शुनःशेपाला स्वतःचा जेष्ठपुत्र घोषित केले. असा सर्व आनंदीआनंद झाला.

हे शुनःशेप विश्वामित्रतीर्थ। जांब गावा सन्निध सत्य। जेथे स्नान करिता जलात। उदरव्याधि निरसते।। 

असे सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या नव्या अध्यायासह भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *