संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या तेराव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आता आपण कोपरगाव, संवत्सरच्या पुढे निघतो आहोत. महाराज धनदतीर्थाची कथा सांगत आहेत.

आता नारदा धनदतीर्थ। पौलस्त्य म्हणती जयाप्रत। जेथे सर्व सौभाग्याप्रत। कुबेर पावला शिववरे।।
हा कुबेर पुर्वीचा। अधिपती होय लंकेचा। धनी पुष्पक विमानाचा।बंधु रावण कुंभकर्ण ज्या।।

 हा कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता. हे सर्व बंधू एकमेकांशी प्रेमाने राहात होते. ते स्वतःच्या मालकीच्या पुष्पक विमानात बसून ब्रह्मदेवांना नमस्कार करण्यासाठी ब्रह्मलोकी जात असत. पण, रावणाच्या आईला सावत्र मुलगा कुबेर सहन होत नव्हता. तिने रावणाचे मन कलुषित केले. कुबेरासोबत भांडायला लावले. शेवटी त्याच्याकडून लंकेचे राज्य काढून घेतले आणि पुष्पक विमानाची मालकीही स्वतःकडेच घेतली. मग कुबेर वडिलांकडे म्हणजे पुलस्त्य ऋषींकडे गेला. त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा…

मग तो महात्मा पुलस्ती ऋषी। बोलता झाला पुत्रासी। की तु जावून गौतमीसी। शिवार्थ तप आचरावे।।
मग तो पुलस्तीपुत्र कुबेर। येता झाला गौतमीवर। तप करूनी शंकर। आपणापुढे उभा केला।।

 आणि मग महादेवाने कुबेराला श्रीमंत तर केलेच त्याचबरोबर आपले मित्रत्व बहाल केले. शंकराने ज्याला ‘सखा’ म्हटले असा एकमेव भक्त म्हणजे ‘कुबेर’ होय. आता जेथे कुबेराला महादेव प्रसन्न झाले ते ठिकाण

धनदतीर्थ वारीपाशी। शिंगवे पैल तटासी। पुलस्ती कान्हेगावासी। तीर्थरुपे राहिला।।

 

आता आपण अग्नितीर्थाकडे निघालो…

अग्निचा भाऊ ‘जातवेद’ जो मानव आणि देवता यांना जोडणारं माध्यम म्हणून प्रसिध्द आहे. तो मधुदैत्याकडून मारला गेला. म्हणजेच जातवेद अग्निची उपासना मधुदैत्याने बंद पाडली. तेव्हा अग्निने गोदाजलात उडी मारली. म्हणजेच अग्निउपासना देखील बुडली. तेव्हा वैदिक ऋषींनी अथक परिश्रम करुन तेजस्वी अग्निउपासना पुन्हा उभी केली.

अग्नितीर्थाचे पवित्र स्थान। ते हे पुण्यस्तंभ क्षेत्र जाण। एथे चांगदेव म्हणून। प्रसिध्द साधु जाहले।।
हे पुण्यस्तंभ क्षेत्र। आले आहे मोडकळीप्रत। ब्राह्मण अग्निहोत्राविरहीत। झाले म्हणून ऐसे घडले।।
एथे साध्वी अहिल्येचा। घाट गोदेस भव्य साचा। महिमा या क्षेत्राचा। विशेष गोदा-महात्म्यामधे।।

आता ऋणमोचन तीर्थाची कथा येते.

कक्षीवत विप्राचा पृथुश्रवा नामक पुत्र होता. घरच्या कंगालीमुळे तो विवाह करत नव्हता. तेव्हा एकदा पित्याने त्याला विचारले की, ‘जर तू विवाह केला नाही तर माझे पितृऋण कसे फेडशील? ‘यावर पृथुश्रवा उत्तरला की,‘विवाह न करताही पितृऋण फेडता येईल’ असा काही उपाय सांगा. तेव्हा…

हे पुत्रा पृथुश्रवा। हा उपाय ऐक बरवा। त्वा स्नानयोग साधावा। आदरे जावून गौतमीसी।
त्या गौतमी स्नानेकरुन। तू फेडशील तिन्ही ऋण। श्री गोदावरीसमान। कोणी न देवता जागृत।।

याप्रमाणे पृथुश्रव्याने पितृऋण फेडले.

हे ऋणमोचनतीर्थ। बापतऱ्याच्या सन्निध सत्य। येथे गोचरस्वामी ब्रह्मीभूत। होऊनिया राहिले।।

आता महाराज कद्रूसुपर्णा संगमतीर्थाविषयी सांगतात…

आता कद्रूसुपर्णासंगमतीर्थ। ऐकणे तु सावचित्त। पुरंदराच्या नाशार्थ। वालखिल्ये कश्यप प्रार्थिला।।
त्यांच्या प्रार्थनेकरुन। कद्रूसुपर्णाठायी जाण। गर्भ केले स्थापन। नारदा कश्यप मुनीने।
पुढे तीर्थयात्रेसी। कश्यप गेला परायेसी। ते पाहून आश्रमासी। त्यागिता झाल्या तद्वधू।। 

अशा या संस्कारहीन कद्रू-सुपर्णा गोदेकाठी यज्ञकर्म सुरू होते. त्या ठिकाणी आल्या आणि त्यांच्या स्वैरवर्तनाने ऋषींकडून अपमानित, शापित झाल्या. जेव्हा कश्यपांना हा प्रकार कळाला. तेव्हा आपल्या स्त्रियांना शापमुक्त करण्यासाठी त्यांनी तप केले आणि गोदाकृपेने त्या शापमुक्त झाल्या. गोदेला मिळणाऱ्या दोन नद्यांना यांची नावे देण्यात आली.

यापैकी कद्रू भली। कादवा नाम पावली। श्वेततीर्थाजवळ मिळाली। कटो-यासंनिध गंगेला।।

आणि

ही सुपर्णा गोदेस। मिळाली लाखेच्या सनिध्यास। येथे स्नानदान करिता विशेष। पुण्य लाघे मानवा।। 

असे सांगून हा अध्याय येथे थांबतो. तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *