संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या चोवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आजच्या कथेची सुरुवात करताना, असे वाटते की आजच्या काळात या पौराणिक इतिहासाची पुनरावृत्तीच घडत आहे. त्यामुळे आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारी ही ‘वेन’ राजाची कथा..

नारदा एक सम्राट वेन। राज्य करित होता जाण। खगोल भूगोल शोधून। नाना युक्ती चालविल्या।।
वेन जितुका बुध्दिमान। तितुकाच होता दुष्ट जाण। चहू वर्णांचे एकीबंधन। समूळ तोडू इच्छितसे।।

हा वेन स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर सर्व लोकांमध्ये भांडणे लावायचा. क्षत्रियांना म्हणायचा की, काय या ब्राह्मणांच्या पायावर डोके ठेवता? यांच्या उत्पत्तीचा इतिहास वाचाल तर कळेल की, हे हीन आहेत. चार ज्ञानाच्या गोष्टी सांगून समाजावर वर्चस्व गाजवतात पण, राष्ट्र उभे आणि सुरक्षित आहे ते तुमच्या तलवारीवर! एवढे पराक्रमी असून, त्या मूर्ख ब्राह्मणांना डोक्यावर घेता. काय म्हणावे तुम्हाला?” याच पध्दतीने त्याने वैश्यांचा बुद्धी-भेद केला. त्यांना म्हणायचा, ‘तुमच्या पैशावर ब्राह्मण आणि क्षत्रियांची घरे चालतात आणि तुम्ही इतके मुर्ख की, त्यांच्यासमोर नमून राहता. तुम्ही तर त्यांचे पोशिंदे आहात, असेच शूद्रांकडे जावून म्हणायचा. तुम्ही त्रिवर्गाचा आधार आहात. पण त्यांना त्याची जाणीव आहे का? जरा त्यांच्यापासून बाजूला व्हा म्हणजे त्यांना तुमची किंमत कळेल.’ असे करून या वेन राजाने अख्या समाजाचे तुकडे केले. राज्यात अंदाधुंदी माजली. आपआपल्या कामांकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष झाल्याने आर्थिक अडचणी सूरू झाल्या. शेतीकडे दुर्लक्ष झाल्याने जमिनी पडीक झाल्या. अशा वेळी…

तै वामदेवादि ऋषि। येवूनिया वेनापाशी। वदले पापराशि। असशी की तू  मूर्तिमंत।।
पहा पहा तुझी रयत। दुःखी आहे अत्यंत। पहा तुझा अवघा प्रांत। दुष्काळे पिडीत जाहला।।
राजा कालाचा कारण। ऐसे आहे शास्त्रवचन। ऐसे ऋषींचे भाषण। ऐकता राजा संतापला।।

आणि राजा संतापला तरी घाबरतील ते ऋषी कसले? त्यांनी राजाला मृत्यूदंड दिला. आता राजा निपुत्रिक असल्याने आणि त्याला कोणी आप्त नसल्यामुळे, पुढचा वारस गादीवर बसल्याशिवाय राजाचा अंत्यविधी होऊ शकत नव्हता. तेव्हा यावर मार्ग काढण्यासाठी ऋषीगण कपिलमुनींच्या आश्रमी गेले तेव्हा..

तै कपिल बोलले वचन। वेन-मांडीचे मंथन। करुन करा निर्माण। पुरुष बसाया सिंहासनी।।

अर्थात जे लोक वेनाच्या जवळचे आहेत ते सतत मांडीला मांडी लावून बसतात, अशांपैकी कुणाचा मुलगा असेल तर पहा, असे म्हटल्यावर एक ‘निषाद’नावाचा युवक मिळाला पण, नीट चौकशी करता कळले की, तो महाक्रूर आहे. मग वेनाबरोबर काम करणाऱ्यापैकी एकाचा चारित्र्यवान असा ‘पृथु’ नावाचा मुलगा निवडण्यात आला. त्याला गादीवर बसवण्यात आले आणि वेनाचा अंत्यविधी झाला. पुढे पृथुने शेतीव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला पण, वेनाने मानवी मनात इतके विष पेरून ठेवले होते. शेतीचे काम हलके वाटून कोणी शेतीकडे वळेना. राजा पृथुने आक्रमक पावित्रा घेताच प्रजेने सांगितले की, बऱ्याच वर्षांच्या नापिकीने जमीन पडीक झाली. तेव्हा पृथु कपिलाश्रमी गेला आणि त्याने मुनिवरांना मार्ग विचारला.

कपिलमहामुनी म्हणाले, ‘जर लोकामध्ये कष्ट करण्याविषयी आणि कुठलेच काम हलके नसते याविषयी जागृकता आणायची असेल तर प्रथम तुला नांगर हाती घ्यावा लागेल. तरच प्रजेची मानसिकता बदलेल’ असे ऋषीवचन ऐकताच राजाने भागिरथीपासून गोदावरीपर्यंत पृथ्वीची आणि जनमानसाची मशागत केली.

तेणे पृथ्वी समृद्ध जाहली। औषधी पिके बहुत आली। अखेर कपिला मिळाली। गोदेप्रति नारदा।।

कपिलांकडून निघालेली विचारधारा गोदेपर्यंत येवून मिळाली म्हणून गोदेला मिळणाऱ्या नदीला कपिला नाव देण्यात आले.

तेच कपिला संगम तीर्थ। स्नान जे का करिती येथ। त्यांच्या दैन्यपाशाप्रत। तोडील साच परमात्मा।।
गंगाखेडच्या पश्चिमेसी। हे तीर्थ आहे परियेसी। कपिला दक्षिण तटाशी। मिळाली श्रीगौतमीला।।

हेच गंगाखेड संत जनाबाईंचे जन्मगाव असल्याचे सांगतात. तसेच हे व्यंकटेश बालाजीचे ही स्थान असल्याचे नमूद करतात.

आता देवतीर्थाची कथा येते. राहू दैत्याला देवांनी मारले ही कथा आपण मागे पाहिली. याच राहू दैत्याचा ‘मेघहास’ नावाचा मुलगा होता. त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याने गौतमीतटी उग्र तप करण्यास प्रारंभ केला. हे पाहून देवांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी मेघहासाचे मतपरिवर्तन करण्याचे ठरविले. त्यायाठी त्यांनी त्याला जे लोक राक्षसकुलांत जन्मास येवूनही दैवी विचारधारेकडे वळले आणि किर्तीरुपे अमर झाले, अशी काही उदाहरणे सांगितली.

प्रल्हाद राक्षस असून। गेला किर्ती करून। वैष्णवाग्रणी म्हणून। गाजला या जगामध्ये।।
बिभीषणही रामाला। द्वेष टाकून शरण गेला। तूही ऐशाच कृत्याला। काही तरी करावे।।
आम्ही नैर्ऋतीचा अधिपती। करितो मेघहासा तुजप्रती। आता द्वेष आपुल्या चित्ती। आम्हाविषयी ठेवू नको।।

आणि मेघहासाने देवांचे म्हणणे मान्य केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे कृत्य जेथे झाले। ते देवतीर्थ बनले। हे नागठाण्यापाशी भले। गोदावरीच्या उत्तरतटी।।

या ठिकाणचे माहात्म्य असे सांगतात की, येथे सर्प दंश करीत नाहीत आणि चूकून दंश केलाच तर त्याने कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

आता सिध्देश्वर महादेवाची कथा येते. एकदा रावण सोमराजाबरोबर युद्ध करण्यास गेला. तेव्हा त्याच्या निवारणार्थ ब्रह्मांनी रावणाला शंकराच्या एकशेआठ नामजपाचा मंत्र दिला व हा जप करण्यासाठी गौतमीतटी जाण्यास सांगितले. जेथे हा मंत्र सिद्ध झाला तेथे सिद्धेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली.

हे सिद्धेश्वर तीर्थ। नागठाण्याच्या पूर्वेस सत्य। कळगाव नामे येथ। ग्राम आहे लहानसे।।

पुढे परुष्णीसंगमतीर्थाची कथा येते. अग्निपुत्र ‘अंगिरस’ आणि अत्रिकन्या आणि सोम, दुर्वास, आणि दत्त यांची बहिण ‘परुष्णी’ यांचा विवाह होतो. पूढे तिला मूलबाळही होते पण तिचा पति अंगिरस हा तिच्याशी कायम कटूच बोलतो. त्याने तिला नैराश्य येते व हे सर्व ती आपल्या सासऱ्यांना सांगते तेव्हा अग्नि म्हणतात, ‘त्याचा स्वभाव बदलण्यासाठी तुलाच आर्द्र व्हावे लागेल. प्रेमळ व्हावे लागेल आणि परुष्णी आत्मचिंतन करून स्वतःला बदलते आणि अंगिरस तिच्या प्रेमात पडतो आणि पुढे कधीही त्यांच्या प्रेमात अंतर पडत नाही. हे सर्व जेथे घडले तेथील नदीला ‘परुष्णी’चे नाव देण्यात आले आणि त्यांनी दोघांनी जो महादेव पुजला त्याला कंठेश्वर महादेव असे नाव देण्यात आले. कारण न आवडणारी परुष्णीनंतर अंगिरसाने प्रेमाने कंठी बांधली म्हणून कंठेश्वर महादेव!!

परुष्णीसंगमानंतर आपण पूर्णासंगमी जावूया. ब्रह्मदेव म्हणतात,

एकदा मार्कंड भरद्वाज गौतम। वसिष्ठ अत्रि शांतिधाम। याज्ञवल्क्य अत्युत्तम। धरामर महीचे।
ऐसे थोर थोर ऋषि। वाद करून माझेपाशी। आले नारदा विचारावयासी। कर्म श्रेष्ठ वा ज्ञान श्रेष्ठ।।

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ब्रह्मदेव मंडळीना घेऊन श्रीविष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, इतक्या गहन विषयाची चर्चा करायला गौतमीतीर हेच स्थान योग्य आहे तेव्हा मंडळी गौतमीतटी आली आणि सर्वांनी शिवाला आवाहन केले. शिवतत्व प्रकट होताच त्याने सांगितले की, ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ!!

सुखदुःखे कर्माधीन। पाप-पुण्य कर्माधीन। मोक्षबंध कर्माधीन। अवघेच हाती कर्माच्या।।
ऐसे वदता शंकर। ऋषि करिती जयजयकार। गजबजले गोदातीर। त्या जय शब्देकरून।। 

आणि पुढे ही सभा पूर्णासंगमी झाल्याचे सांगतात. मार्कंड ऋषी प्रमुखपदी होते. त्यांच्या नावाचे गाव गोदेच्या दक्षिणेकडे आहे. तसेच हा संपूर्ण गोदातीरच तीर्थरुप असल्याचे सांगतात..

दुरके टाकळी अंतेश्वर। रूंज गुंज पेनूर। रहाटी आणि मोहनपूर। ऐशी गावे ते ठाया।।

असे सांगून हा अध्याय येथेच थांबतो…तेव्हा उद्या भेटूच!

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.