संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या बावीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…

आज महर्षी वसिष्ठांनी गोदातटी सुरू केलेल्या यज्ञाने कथारंभ होत आहे. तर महर्षींनी सुरू केलेल्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात. व्यथित झालेले ऋषीगण देवांचे सहाय्य मागतात. देव यज्ञरक्षणासाठी ‘अजैका’नावाच्या प्रमदेला पाठवतात जी राक्षसांचे चित्त विचलित करु शकेल, अशाप्रकारे पुन्हा यज्ञ सुरू झाला तोच राक्षस पुन्हा धावून आले. अजैकाने पुष्कळ प्रयत्न केले पण, शंभरासूर दैत्याने अजैकाला गायब केले आणि एकच गोंधळ माजला. मग ऋषींनी श्रीविष्णूंचे ध्यान केले आणि भक्तांच्या हाकेला भगवान धावून आले. हाती चक्र घेऊन त्यांनी शंभरासूराचे मुंडके उडवले आणि दैत्यांची दाणादाण उडवली. हे सर्व जेथे घडले ते ठिकाण म्हणजे,

राक्षस वधानंतर। ऋषींनी पूजिला चक्रधर।

षोडषोपचारे साचार। त्याच गोदातटाकी।।

विष्णूचक्र जेथे धुतले। ते चक्रतीर्थ झाले।।

हे तीर्थ सांप्रत भले। मोगरे ग्रामासंन्निध।।

आता पौराणिक कथेप्रमाणे शंभरासूर मरताच त्याने भक्षण केलेली अजैका त्याचे पोट फोडून बाहेर आली. याचा अर्थ अजैका गोड बोलून शंभरासूराच्या गोटात शिरली आणि त्याचे विश्वासू लोक फोडले! असो… ही अजैका विष्णूंना म्हणाली की, ‘देवा, जरी तुम्ही दैत्याला मारले तरी मी ही माझे योगदान दिले आहे!’ तेव्हा विष्णुंनी स्मितहास्य केले आणि अजैकाला गोदातटी मानाचे स्थान दिले.

गौड गावी अजैका। अजूनपर्यंत आहे देखा।

इची भिल्ली भद्रा कालिका। मुक्तकेशा नावे ऐशी।।

याच मोगरे गावच्या गोदाघाटावरील विष्णूमंदीर ओस पडल्याचे महाराज सां

गतात एवढेच नव्हे; तर या मंदिरात हरीची मूर्तीही राहिली नसल्याचे सांगतात याच गावात ‘रंगनाथ स्वामी’ होऊन गेल्याचे सांगतात. या रंगनाथ स्वामी मोगरेकरांनी ‘योगवासिष्ठ’ लिहिल्याचे सांगतात. हे रंगनाथस्वामी योगवासिष्ठची रचना केल्यावर कृष्णातटी मुलीकडे राहण्यास गेले. तिकडे त्यांनी योगवासिष्ठ्यावर प्रवचने केली असता अवघे कृष्णातीर माना डोलावू लागले असे महाराज सांगतात. रंगनाथ स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी समकालीन असल्याचे सांगतात आणि दोघेही गोदापुत्र असल्याचा महाराजांना अभिमान वाटतो. या दोन्ही गोदापूत्रांनी कृष्णातीरी खुप कर्तृत्व केल्याचे आणि उभयतांना भेटल्यावर एकमेकांच्यात जणु गोदेलाच पाहिल्याचा आनंद घेतल्याचे सांगतात.

आता वाणी संगमाचे महत्त्व सांगतात, एकदा ब्रह्मा-विष्णू यांच्यात कुठल्याशा विषयावर वाद सुरु होता तेव्हा तेथे अचानक एक असे शिवलिंग निर्माण झाले की, त्याचा आदि-अंत लागत नव्हता. तोच आकाशवाणी होते की, ‘ज्याला शिवलिंगाचा अंत लागेल तो श्रेष्ठ ! ‘ब्रह्मांनी त्यात हरिहर एकत्र दिसत असल्याचे सांगितले. त्यांच्या मुखातुन ही वाक् गंगा जेथे निघाली ते वाणीसंगम. या वाणीसंगमासमीप सोनपेठ शहर आहे आणि शंकराचे मंदिर आहे.

या तीर्थी जे करिती स्नान। ते बोलके बृहस्पती समान।

होतील जाय तोत्रेपण। वाणीचिया ठाईचे।।

असा या वाणीसंगमाचा महिमा सांगून आता मुद्ग्लतीर्थाचा महिमा येतो.

नारदा मुद्ग्ल ऋषीचा। पुत्र मौद्गल्य नामे साचा।

परमभक्त विष्णूचा। कांता जया जाबाला।।

हा गोदेच्या उत्तर तीरी। रहात होता निर्धारी।

महा कर्मठ वेदावरी। पूर्ण श्रध्दा जयाची।। 

असा विष्णूभक्त की, त्याच्याबरोबर प्रत्यक्ष विष्णू बोलत असे. फक्त एकच गोष्ट अशी की, तो परिस्थितीने अत्यंत गरीब होता. त्याची धर्मपरायण पत्नी या दारिद्रयाला कंटाळून एके दिवशी आपल्या पतीला म्हणाली, ‘तुम्ही साक्षात लक्ष्मीकांताचे भक्त असूनही हे दारिद्रय आपला पिच्छा सोडत नाही. काय उपयोग त्या भक्तीचा?’ ही गोष्ट मौद्ग्ल्याला फार मनाला लागते व तो विष्णूंना विचारतो की, ‘देवा, माझ्या अशा परिस्थितीने तुझीच इज्जत जाते तेव्हा तु पहा काय ते!’ तेव्हा दानधर्म केल्याने घरात द्रव्य येते असे देव म्हणतात… हे एकून मौद्ग्ल्य म्हणतात…

 

विष्णूचे वचन ऐकिले। मौद्गल्य ऋषी हसून वदले।

वाहवा फार उत्तम कथिले। ज्ञान मशी नारायणा।।

आधी धर्म करा म्हणशी। आणि दारिद्रय सदनी ठेविशी।

रवि पूजाया सांगशी। आणि करीशी रात्र मात्र।। 

ऋषींचे हे बोलणे ऐकून नारायण खुश झाला. त्याने गरुडाला पाचारण करुन मौद्गल्यांच्या घरी सर्व सुबत्ता करण्यास सांगितले. पुढे ऋषीवर अखंड दानधर्म करीत राहीलेआणि जीवन संपताच वैकुंठी नारायणाकडे गेले. असे हे मुद्गलतीर्थ मुद्गल या गावी आहे, असे सांगून हा अध्याय येथेच थांबतो तेव्हा उद्या भेटूच!

– मधुमालती जोशी

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.