शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी पौष शुध्द एकादशी, पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस श्री संतकवी दासगणु महाराज यांची दीडशेवावी जयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राला लाभलेला हा संतरत्न आपल्या वेगळ्या कार्यामुळे आपल्याला अधिक जवळचा वाटतो. दासगणु महाराजांनी केलेले काव्यात्मक चरित्र लेखन घराघरात पोहोचले अन् हा संतही त्यानिमित्त महाराष्ट्राला कळाला. जवळपास पन्नास चरित्रांना त्यांनी ओवीबध्द करून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे काय दोनशे वर्षांपूर्वी केले. मात्र दासगणु आपल्याला गोदावरीशी असलेल्या एका वेगळ्या नात्यामुळे अधिक जवळचे वाटतात. त्यांनी त्र्यंबकेश्वर ते पैठण ही कंठप्रदक्षिणा करून गोदावरी नदीचे महात्म्य लिहिले. त्याला ‘गोदामहात्म्य’ असे म्हणतात. हे फारसे कोणाला ठाऊक नाही किंवा ठाऊक असूनही ते अनेकांपासून दुर्लक्षितच राहिल्याने त्याचे महात्म्य कोणाला कळालेले नाही. शिवाय त्यांची गोदामहात्म्याची रचना ओवीबध्द रचना असल्याने या पिढीला ते कळणेही अवघडच आहे. असे म्हटले जाते की, दासगणुंच्या जयंतीच्या ठिक एक महिन्यानंतर गोदामाईचा वाढदिवस तिथीप्रमाणे येतो. यंदा तो २७ जानेवारी २०१८ रोजी येत आहे. दासगणुंची जयंती अन् त्यानंतर महिन्याभरानंतर येणारी गोदामाईची जयंती हे औचित्य साधून शुक्रवारपासून दासगणुंच्या गोदामहात्म्यातील रोज एक अध्याय अभ्यासला तर खऱ्या अर्थाने दासगणु महाराजांनी गोदामाईचे गायलेले महात्म्य अनुभवायला मिळेल अन् लाखोवर्ष माणसासोबत असलेल्या गोदामाईचे खरे रूप जाणलेल्या दासगणुंना दोनशे वर्षांपूर्वी ही गोदामाई कशी दिसली हे अनुभवायलाही मिळेल. अर्थात हा सगळा घोषवारा देणार आहेत गोदावरी नदीच्या ज्येष्ठ अभ्यासिका व मी गौतमी गोदावरी या पुस्तकाच्या लेखिका मधुमालती नंदकिशोर जोशी. त्यांच्या शब्दात अन् आत्मध्यात्मिक वैचारिक शैलीत दासगणुंच्या गोदामहात्म्यातील अध्यायांचा आनंद घेऊया…
(अधिक माहितीसाठी मधुमालती नंदकिशोर जोशी : ९४२१५८२५०२
मधुमालती जोशी Reconnecting With Godavari उपक्रमाच्या मानद सल्लागार सभासद आहेत.