गोदावरी परिक्रम हे एक ध्येय आहे. का करायची आहे हे मनात कुठेतरी सूक्तपणे त्याचं कारण दडलं आहे. पण आज, २८ नोव्हेंबरला आम्ही गोदा परिक्रमा केली. गोदा परिक्रमा म्हणजे गोदावरी नदीचा रामकुंड ते तपोवन अन् पुन्हा नदी ओलांडून रामकुंड हा साधारण आठ किलोमीटरची परिक्रम पूर्ण केली. अनुभव भन्नाट होता. परिक्रमा नियमित सुरू होईलही त्याबाबत सविस्तर सांगेलच. कारण तुम्हालाही या गोदा परिक्रमेत सहभागी व्हायचं आहे. या आजच्या अनुभवाविषयी…

खूप दिवसांपासून परिक्रमेचं धाडस करावं की, नाही हे समजत नव्हतं. कारण ती एकदा सुरू केली की, आयुष्यभर थांबवायची नसते, म्हणे. असं कुठे लिहून वगैरे ठेवलेलं नाही. पण गोदावरीची अवस्था पाहताना बहुदा प्रत्येकाला आपली गोदावरी कशी आहे हे दाखविण्यासाठी ती आयुष्यभर करावं लागण्याची शक्यता अधिक वाटते आहे. कारण महापालिका गोदावरीच्या सौंदर्यावर खर्च करायला असूसलेलं आहे. गोदावरीत प्रदूषण का होतयं अन् ते थांबवायला ते अजिबात इच्छूक असल्याचे दिसत नाहीत. तसं असतं तर कोट्यावधींचा खर्च करण्याची गरजच पडली नसती, असो. आम्ही नाशिककर गोदावरीपासून लांब जातो आहोत. आपलं जीवन ज्या गोदावरीवर आत्मनिर्भर आहे, त्या गोदावरीला आपण विसरत चाललो आहोत. आज गोदावरी कशी आहे (खूप आजारी आहे) हे पाहण्याची गरज आहे. म्हणून गोदावरीच्या आध्यात्मिक, धार्मिक, वारसा अन् जीवन या अर्थाने तीचं दर्शन घेण्याची गरज आहे. आपण जर नदीला सतत भेटत राहिलो तर तिचं दु:ख आपल्याला समजून घेता येईल अन् आपल्या सततच्या भेटीतून आपोआप उपायही समोर येतील. पण यासाठी थोड चालावं लागेल, जास्त नाही. फक्त सात-आठ किलोमीटर.
आज, २८ नोव्हेंबरला मी, निलेश, शिल्पा अन् सतीश ठिक साडेआठ वाजता. रामकुंडावरून नदीच्या कडेकडेने तपोवनाच्या दिशेने निघालो. रामकुंड परिसर धार्मिक विधींनी अन् भाविकांनी गजबजलेला होता. कुंडाच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे कर्मचारी सकाळी सकाळी आपले कर्तव्य पार पाडायला हजर होते. त्याचं काम सुरू होतं तेवढ्या आत्मियतेने भाविक म्हणा अथवा नाशिककरांनी आपलं गोदा अस्वच्छ करण्याचं कामही सुरू केलं होतं. रामकुंडाशेजारील अहिल्यादेवी महादेव मंदिरासमोर उभं राहून. कुंडांच्या अस्तित्वासाठी झगडणारे देवांग जानीच मला आठवले. ‘गोदापात्रातील अनेक धार्मिक अन् खऱ्या अर्थाने गोदेला जीवंत ठेवणारी कुंडे सुरूंग लावून फोडली या महापालिकेने,’ असं तळमळीनं सांगताना ते डोळ्यासमोरून तरळले. एखादा माणूस इतक्या तळमळी कुंडासाठी झगडतोय हे देखील नाशिककरांना कळू नये, हे वाईटच. त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल अन् गोदापात्रातील जलस्त्रोत पुन्हा प्रवाहीत होतील, अशा अपेक्षेने आम्ही दुतोंड्या मारूतीपाशी आलो. ‘मला का शिक्षा करण्यासाठी येथे उभं केलं आहे’ असे तो म्हणाल्यावर मी गडबडलोच. ‘वाईट वाटत रे गोदेकडे पाहताना, कितेक दिवस मला तिचा आशिर्वादही मिळत नाही. पूर्वी मी कायम बुडालेला असायचो. आता तिला पहायलाही मी तरसून जातो.’ दुतोंड्याचे हे दु:ख मला माझ्या दु:खापेक्षा कितीतरी मोठ वाटलं कारण गोदा माझ्या घरात थेट नळातून येते. किती नशीबवान आहोत आपण. हा दुतोंड्या तिच्या काठावर राहून पूराची वाट पाहत बसावं लागतं. दुतोंड्याबरोबर एक सेल्फी घेऊन पुढे जाताना दुतोंड्याने पुन्हा हाक दिली, ‘मला नाही जमणार तुमच्याबरोबर यायला. पुन्हा याल ना मला भेटायला.’ उगाच डोळ्यात गोदा साठल्यासारखं झालं. तेथून नारोशंकरापर्यंत जाताना भिकाऱ्यांनी भरलेला घाट नकोनकोसा झाला. नारोशंकरासमोरून पूल ओलांडताना प्रातविधीच्या वासाने मन भनभनलं. हे महापालिकेच अपयश की, घाट सजविणाऱ्या नाशिककरांचं यश हे काही उलगडलं नाही. तेथून रामसेतू पुल ओलांडून गाडगेमहाराज पुलापर्यंत घाटावरील अस्वच्छ अन् दुर्लक्ष मनाला खटकतं. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांच्या गाड्यांनी हा परिसर गजबजलेला आहे. खरे तर येथे पार्किंग नकोच. ही पार्किंग गाडगे महाराज पुला ओलांडून गेल्यावर समोरच्या मैदानावर हवी. मात्र हा परिसर भिकारी अन् गर्दूल्यांनी हा परिसर माखलेला असतो. वयोवृद्ध अन् सर्व वयातील भिकाऱ्यांसाठी सुधारगृहाची व्यवस्था महापालिकेने करायला हवी, असं सहज वाटून गेलं. अनेकदा घाटावर यांचीच गर्दी अधिक दिसते. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर या सुंदर घाटांपासून लांब राहत असल्याचं दिसतं. कारण मग त्यांच्या सकाळ पासून रात्रीपर्यंतच्या सर्व घडामोडी घाटाभवती घडत असल्याने घाटाची अवस्थाही त्यांच्यासारखीच होते. असो.
गोदा परिक्रमेचा हा प्रवास पुन्हा नव्या दमाने सुरू होतो. नाशिकच्या इतिहासाच्या अन् हेरिटेजच्या गप्पा रंगू लागतात. नदीच्या अवस्थेत काय काय बदल होऊ शकतात. यावरही चर्चा रंगते. मातीच्या गढीपर्यंत आल्यावर नदीशेजारून सुरू असलेला प्रवास तुटतो. अमरधाम पुलापासून तपोवनाकडे जाणारा नदीकडेचा रस्ता झाडीझुडप आणि घाणीच्या साम्राज्यांनी गायब झाल्याने अमरधामकडे जावे लागते. अमरधामकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्याआधी नावेसाठीचा त्रिकोणी चबुतरा पहायला मिळतो. त्याच्या शेजारी आता जय बजरंगबली नावाचे मंदिर झाले आहे. त्यामुळे हा त्रिकोणी नाव बांधण्याचा चबुतरा झाकोळला गेला आहे. असाच एक चबुतरा जुन्या नाशिकच्या बाजूच्या अमरधामशेजारीही आहे. चबुतऱ्यांचे बांधकाम पाहून रस्ता ओलांडला अन् अमरधामच्या शेजारील रस्त्याने पुन्हा तपोवनाच्या दिशेने निघालो. अमरधाम_पंचवटी रस्त्याने निघाल्यावर थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की, नदीच्या लगत महापालिकेने बांधलेली पायवाट हरवली आहे. येथील स्मृतीउद्यान तर महापालिकेच्या विस्मृतीत गेल्यासारखं दिसलं. बहुतेक हे दर बारावर्षांनीच सुरू होत असावं. तेथून पुढे महामार्गाचा पूलाखालून आम्ही तपोवनाकडे पुन्हा निघालो. पुढे कृषी गौ सेवा ट्रस्टची गोशाळा पहायला मिळाली अन् थोड बरं वाटलं. गोदा आणि गाय यांचं आपल्या प्रत्येकाशी एक वेगळं नातं यानिमित्ताने पुढे आलं. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयापासून उजव्या हाताना तपोवनाकडे जाताना पुढच्याच चौकात पुन्हा महापालिकेने नाशिककरांसाठी केलेली बारमाही (बारावर्षांनी वापरात येईल. या हेतूने) बाग पहायला मिळाली. येथील हम्पी थेएटर येथील लोकवस्तीला खूपच उपयोगात पडत असल्याचे तेथे रंगाळत असलेल्या एका जोडप्यान सांगितलं अन् नवलं वाटलं की, महापालिकेने बारमाही योजनेतून केलेला हा खर्च किती लोकउपयोगी ठरतो आहे. हा परिसर पाहत आम्ही पुन्हा गोदेच्या कुशीतून तपोवनाच्या कपिला संगमावर दाखल झालो.
हा साधारण तीन_साडेतीन किलोमीटरचा प्रवास गप्पागप्पांमध्ये कधी संपला हे लक्षात आलं नाही. पण एक प्रश्न समोर उभा राहिला. ही परिक्रमा आपल्याला काय देणार? खरं तर हा प्रश्न जगण्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. कारण ही परिक्रमा आपल्याला नदीची अवस्था दाखविणार आहे अन् तुम्ही या अवस्थेवर व्यक्त व्हायचं आहे. कोणी फोटोग्राफितून व्यक्त होईल कोणी एखाद्या लघुपटातून तर कोणी सोशल मीडियातून. आपण सगळेच गोदावरीशी दररोज भेटतो का? नाही. त्यामुळे आपण गोदावरीचा विचार करत नाही. पण महिन्यातून एकदा तीन तास गोदावरीला दिले तर आपण आपली मुलं अन् त्यांच्या संवेदना नदीबद्दल नेहमीच जीवंत राहतील. त्यामुळे नदीचे प्रदूषण, पाण्याचा वापर अन् तिची आपल्याला असलेली गरज आपल्याला लक्षात येईल. तपोवनातील सीटीपी प्लँट आहे. हा प्लँट चांगला म्हणजे ज्ञानवर्धक असल्याने तो पाहणेही गरजेचे ठरते. नदीचा आणि आपला सहवास वाढावा म्हणून परिक्रम आहे. हा सहवास वाढला की, नदी आपल्याला खूप काही शिकवते आहे हेही लक्षात यायला लागेल. नाही का?
तपोवनातील वातावरण मंत्रमुग्ध करते. तपोवनातील ‘तो’ लाकडी पुल ओलांडून आम्ही पलीकडे तर गेलो पण आता कसे जायचे असा प्रश्न होता. तपोवनापासून तपोवन रोड पुलापर्यंत महापालिकेने किमान नदीभवती चालण्यासाठी पायवाटही न केल्याने आता काय करायचे असा प्रश्न होता. शेवटी आम्ही टेकडावर चढलो आणी राम, ‌सीता अन् लक्ष्मणाचे दर्शन घेऊन समोरच्या एका मोठ्या रहिवाशी इमारतीला वेढा मारून तपोवन रोडवरील मारूती चिप्सच्या दुकानासमोर दाखल झालो. पुन्हा गोदेची ओढ लागली होती. आम्ही झपझप पुलाकडे झेपावलो पण नदीपात्राकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुन्हा निराशा हाती आली. आता काय करायचं. तेथून पुन्हा मारूती चिप्समागील रस्त्याने एका बंद केलेल्या रस्त्यातील काटेरी कंपाऊंडमधून गोदापात्रात दाखल झालो. तपोवन ते तपोवन रोड पुलापर्यंत चांगली पायवाट झाली तर गोदेशी परिक्रमेचं नात कायम ठेवला येईल. यासाठी महापालिका प्रयत्न करेल, अशी अपेक्षा करूयात. तपोवन पुलापासून महापालिकेने बनविलेल्या चकचकीत घाटावरून प्रवास थोडा अल्हादायक वाटला पण परिसरात वृक्षारोपण होणे गरजेचे आहे तर अनेक जागी नाले फुटल्याने त्याचे पाणी थेट नदीत जात असल्याचे पहायला मिळाले. थोडे पुढे गेल्यावर महामार्ग पुलाआधी नदीच्या सीमाभिंतीवर चितारलेले रामायणातील प्रसंग मनाला भावतात मात्र घाटावरील अस्वच्छता निराश करते.
लांबूनच तपोवनपुलाखालील टाळकुटेश्वर मंदिराच्या घंटेचा नाद कानात घुमतो. पाय झपझप मंदिराच्या दिशेन पडतात. मंदिराचे सौंदर्यपाहून पुन्हा मातीची गढी अन् तिच्या इतिहासाबरोबर गाडगे महाराज धर्मशाळेची इमारत न्याहाळत अन् गोदेतील प्रदूषण अनुभवत आम्ही गाडगे महाराज पथाचे पथकरी झालो होतो. मध्येच जागोजागी महापालिकेचे कर्मचारी गोदेतील शेवाळ काढण्यात दंग असल्याचे पहायला मिळाले. जमिनीखाली सिमेंटचा स्लॅब असल्यावर पाण्यात शेवाळच साठणार. महापालिकेने नदी सुधारणेच्या नावाखाली नदीचे व घाटांचे केलेले ‌सीमेंटीकरण अत्यंत दुदैवी आहे. ते काढण्याचा निर्णय झाल्याचे कळते मात्र अनेकदा चांगले निर्णय पुढे पुर्ण होताना दिसत नाहीत. यात हा निर्णय नसावा, अशी अपेक्षा करूयात. गोदेने सकारात्मक विचारांची पोतडी भरून दिल्याने सर्वकाही सकारात्मकच होईल, या अपेक्षेसह आम्ही मोदकेश्वरापासून रोकडोबा मंदिरापाशी आलो. गाडगेमहाराज पुल ओलांडून पूर्वी कुंड कोठे कोठे असतील यावर मंथन करीत तारकेश्वर, कपूरथळा, नीळकंठेश्वर आणि पुढे यशवंतराव महाराज पटांगणात पोहचलो. परिक्रमा संपली नव्हती. इतिहासाचे अनेक पैलू अजूनही बाकी होते. एकमुखी दत्त मंदिर व कला विद्यालयाकडून व्हिक्टोरिया पुलाखाली त्याच्या शिलालेख पाहून पुढे गेल्यावर सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कष्टणाऱ्या कारागिराच्या वर्कशॉपमध्ये त्याचे काम प‌ाहिले. हा गोंगाट मन विचलित करीत नाही. कारण आपलं लक्ष त्यांच्या कलेच्या पैलूंवर विसावलेलं असतं. हा सोहळा अनुभवून धर्मवीर संभाजी राजे उद्यानाची दुर्लक्षा अनुभवत पुन्हा रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वराच्या मंदिराच्या ओढीने चालू लागलो. रस्त्यात मंदिरांचे अवशेष पहायला मिळाले. तर शुलेश्वर महादेव मंदिर पाहत सिद्धेश्वराच्या चरणी दाखल झालो. घारपुरे घाटाचा हा परिसर रम्यच आहे. या परिसरातील नदी आपलं सुंदर रूप घेऊन पहुडलेली पाहताना मनाला दिलासा मिळतो. मात्र रामवाडी पुलावर नाशिककरांना शिस्त लावण्यासाठी लावलेले नळे पडते मनाला त्रास देतात. पण काय करणार नदी घाण टाकू नका असे सांगूनही नाशिककर ऐकत नाहीत, असे हा पूल सांगू लागला. पुलाशी गप्पामारत पुल ओलांडला पुढे बायजाबाई भेटल्या. त्यांच्याशीही मनमुराद गप्पा झाल्या. त्यांनी मात्र एक कानमंत्र दिला. ‘राजकारणात सर्वकाही माफ असतं’ असं सांगण्यामागे त्यांना नेमकं काय सांगायचं होतं माहीत नाही. पण हा अनुभव गोदापार्कमधून रामकुंडातील प्रवासादरम्यान मिळाला. पुढे गोपिकाबाई भेटल्या. ‘पुन्हा अन् वारंवार भेटत जा’ असं त्या म्हणाल्यावर पेशवाईतील त्यांची शान अन् आताची अवस्था यावर मंथन करावं वाटलं. असो.
परिक्रमा संपली होती. पुन्हा नव्या दमाने सुरू होण्यासाठी परिक्रमेनिमित्त गोदेला आपल्या गोदावरी गंगेला नेहमी भेटत राहण्याचा हा संकल्प आपल्याला वेगळं काही देईल…. ते अध्यात्मरूपात असेल वा नवविचारांच्या किरणांमध्ये हे कळेलच. पण विसरू नका पुढच्या गोदा परिक्रमेला नक्की या.. याचे नियोजन लवकरच आपल्याला कळेल.

धन्यवाद
रमेश पडवळ
8380098107 | Facebook

 

News Reporter
I am a Software engineer turned research photographer. Worked for almost 12 years in a software industry, experience in designing and developing large scale open source applications for various Fortune 500 companies in India and abroad. Left IT career to pursue passion of Photography. Currently based in Nashik as a Professional Industrial, Architectural, Heritage and Research Photographer. Runs a small NGO Shikshanaayan Foundation Nashik registered under Societies and Trust Acts, working in the field of Education, Youth Empowerment, Heritage Documentation and Nature Conservation.

2 thoughts on “गोदा परिक्रमेच्या निमित्तानं.. एक अनुभव – रमेश पडवळ

  1. गोदा परिक्रमेचे अतिशय सुंदर, सुरेख वर्णन केले आहे.आपले नाशिककरांना त्याचा बोध घेऊन गोदावरी निर्मळ,स्वच्छ ठेवण्याची परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो.
    अतिशय उत्कट लिहिले आहे.चागंल्या एखाद्या पेपरला लेख द्दावा ही अपेक्षा.

    – Ashok Kakad, Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.